कोल्हापूर जिल्ह्यातील तीन माजी आमदारांना धक्का

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 December 2019

विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार जाऊन भाजप-शिवसेना युतीचे सरकार आले. या सरकारने महामंडळासह जिल्हा नियोजन समितीतही पक्षासाठी राबणाऱ्या कार्यकर्त्यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली.

कोल्हापूर - जिल्हा नियोजन समितीतील खासदार संभाजीराजे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, सत्यजित पाटील-सरूडकर, सुजित मिणचेकर यांच्यासह २४ विशेष निमंत्रित व नामनिर्देशित सदस्यांची निवड रद्द केली. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महामंडळापाठोपाठ जिल्हा नियोजन समितीतील भाजप पुरस्कृत झालेल्या सदस्यांच्या निवडी रद्द करून नव्या सरकारने भाजपला धक्का दिला. निवड रद्द झालेल्या अन्य सदस्यांमध्ये पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, गोकुळचे संचालक बाबा देसाई, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळेसह अन्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार जाऊन भाजप-शिवसेना युतीचे सरकार आले. या सरकारने महामंडळासह जिल्हा नियोजन समितीतही पक्षासाठी राबणाऱ्या कार्यकर्त्यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली. यामध्ये भाजपच्या घटक पक्षांचाही समावेश होता. गेली पाच वर्ष हे सदस्य या समितीवर कार्यरत होते. त्यात काही जिल्हा परिषद सदस्य आणि पक्षाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांचा समावेश होता.

हेही वाचा - सर्किट बेंच प्रश्‍नी मुख्यमंत्र्यांची ही ग्वाही 

पदांच्या खिरापतीवर शिवसेनेचा रोष

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात सत्तांतर झाले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार आले. नव्या सरकारचा अजून मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नसला तरीही भाजपने गेल्या पाच वर्षांत महामंडळासह समित्यांवर वाटप केलेल्या पदांच्या खिरापतीवर शिवसेनेचा रोष होता. त्यातून पहिल्यांदा महामंडळावरील अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या निवडी बरखास्त केल्या. त्यानंतर आज हिवाळी अधिवेशनाची सांगता होण्याच्या पूर्वसंध्येला जिल्हा नियोजन समितीतील विशेष निमंत्रित आणि नामनिर्देशित सदस्यांच्या निवडी रद्द केल्या.

हेही वाचा - सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपचा ‘K फॅक्‍टर’ 

डीपीडीसीतील यांचे पद झाले रद्द

खासदार संभाजीराजे, माजी आमदार सर्वश्री सुरेश हाळवणकर, सत्यजित पाटील-सरुडकर, डॉ. सुजित मिणचेकर, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबा देसाई, महेश जाधव, राजाराम शिपुगडे, आर. डी. पाटील, संभाजी पाटील, मारुती राक्षे, डॉ. देवानंद कांबळे, दाजी चौगुले, प्रतापसिंह पाटील, डॉ. अजय चौगुले, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, पद्माकर कापसे, कृष्णात पोवार, ‘रिपाइं’ (ए)चे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, जयशिवराय संघटनेचे शिवाजी माने यांच्यासह आप्पासाहेब मोहिते, मधुकर पाटील यांचा समावेश आहे. दरम्यान, संभाजीराजे खासदार असल्याने ते या समितीत सदस्य म्हणून राहू शकणार आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cancellation Of Selection Of BJP Sponsored Members Of District Planning Committee