पक्ष निधीची उमेदवारांना प्रतीक्षाच 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांना पक्ष निधीची अद्याप प्रतीक्षाच आहे. कुठल्याच पक्षाने या निवडणुकीसाठी पैसे पाठवलेले नाहीत. स्थानिक नेतृत्वावरच ही जबाबदारी सोपवल्याने त्यातही आपला व दुसऱ्याचा असा भेदभाव करून निधी दिला जात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. 

कोल्हापूर - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांना पक्ष निधीची अद्याप प्रतीक्षाच आहे. कुठल्याच पक्षाने या निवडणुकीसाठी पैसे पाठवलेले नाहीत. स्थानिक नेतृत्वावरच ही जबाबदारी सोपवल्याने त्यातही आपला व दुसऱ्याचा असा भेदभाव करून निधी दिला जात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. 

निवडणूक आणि पैसा हे अलीकडच्या काही निवडणुकीतील समीकरणच होऊन बसले आहे. जिल्हा परिषदेसाठी पाच लाख तर पंचायत समितीसाठी तीन लाख रुपये उमेदवारांसाठी मर्यादा असली तरी हा खर्च उमेदवारी मिळेपर्यंतच अनेकांचा झालेला आहे. फक्त कागदोपत्री तो दाखवताना दक्षता घेतली जाते. शेवटच्या टप्प्यात पैसा हाच विजयाचा "फॅक्‍टर' ठरत असल्याने शेवटच्या दोन-तीन दिवसांतच उमेदवारांना हात सैल सोडावा लागतो; पण त्यासाठीच लागणाऱ्या मोठ्या रकमेची प्रतीक्षा उमेदवारांना आहे. रिंगणातील जे धनदांडगे किंवा नेत्यांचे वारसदार आहेत, त्यांना पैशाची कमतरता कधी भासत नाही; पण सामान्य कार्यकर्त्याला मात्र पैशासाठी वणवण करावी लागणार आहे. 

कॉंग्रेसने कोल्हापूर व हातकणंगले या दोन लोकसभा मतदारसंघासाठी अनुक्रमे आमदार सतेज पाटील व माजी मंत्री प्रकाश आवाडे हे दोन "पालक' नेते नेमले. यापैकी श्री. आवाडे पक्षासोबत नाहीत तर श्री. पाटील यांनी आपल्या विधानसभा मतदारसंघापुरतेच लक्ष घालणे पसंत केले आहे. राष्ट्रवादीची सर्व मदार आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर आहे, त्यांना सर्व उमेदवारांना रसद पुरवण्यावर मर्यादा आहेत. या निवडणुकीसाठी शिवसेनेचे पाच आमदार सज्ज आहेत, त्यांनी आपापल्या परीने हातभार लावला आहे. सत्तेत असलेल्या भाजपने उमेदवार निवडतानाच ही अडचण दूर केली आहे. तरीही निवडून येण्याची क्षमता असलेल्या; पण पैशाअभावी मागे पडतील अशा उमेदवारांवर विशेष लक्ष ठेवले आहे. स्वाभिमानी व जनसुराज्य शक्ती पक्षानेही हेच तंत्र अवलंबले आहे. 

कुठल्याही पक्षाने राज्य पातळीवरून या निवडणुकीसाठी निधी दिलेला नसल्याचे समजते. त्यामुळे स्थानिक नेत्यांवरच उमेदवारांना अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. यात कोण बाजी मारणार आणि पैशाअभावी कोण नडणार, हे निकालात स्पष्ट होणार आहे. 

Web Title: Candidates party funds