सातारा : लिपिकाने मारला पाण्याच्या लाखाे रुपयांवर डल्ला

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 February 2020

लिपिकास अधिकार नसताना सह्या करून पावत्या शेतकऱ्यांना दिल्या. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर जलसंपदा विभागाचे सुजित कोरे यांनी सातारा शहर पोलिसात जाऊन फिर्याद दिली आहे.
 

सातारा : बनावट पाणी परवाने वितरित करून दोन लाख 16 हजार रुपयांचा अपहार केल्याच्या आरोपावरून कृष्णानगर येथील सिंचन कार्यालयातील वरिष्ठ लिपिक संजय बापू कांबळे ( रा. राजगृह, सत्यमनगर, कोरेगाव रोड , खेड, ता. सातारा) यांच्यावर अपहाराचा गुन्हा सातारा शहर पोलिसात दाखल झाला आहे.

लिपिक संजय कांबळे याच्याकडे कृष्णानगर येथील सिंचन शाखेचा २०१६ ते २०१९ या कालावधीत पदभार असताना स्वत:च्या सह्या करून बनावट पाणी परवाने व नवीन विद्यूत यंत्र परवाने शेतकऱ्यांना देण्यात आलेले आहेत. ही बाब काही दिवसांपूर्वी कार्यालयात आलेल्या शेतकऱ्यांमुळे उघडकीस आली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी सर्व माहिती घेतली असता अनेक बाबी समोर आल्या. कांबळे याने पावती पुस्तक अनाधिकाराने आपल्या ताब्यात ठेवले. या पावती पुस्तकाद्वारे दोन लाख १६ हजार ४१ रुपये इतकी रक्कम वसूल करण्यात आली आहे. परंतु या रकमेचा भरणा शासनाच्या खात्यामध्ये केला गेला नसल्याचे निदर्शनास आले आहे. कांबळे याने शासनास फसविण्याच्या हेतूने खोटे व बनावट पाणी परवाने व पावत्या तयार करून लाभार्थी शेतकऱ्यांकडून रकमा स्वीकारल्या. अधिकार नसताना सह्या करून पावत्या शेतकऱ्यांना दिल्या आहेत. याबाबत कृणानगर येथील जलसंधारण विभागातील सुजित आंबादास कोरे (वय ५८, रा. वनवासवाडी, ता. सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

जरुर वाचा : नराधमांनी माझ्या मुलाचा घात केला; न्याय मिळावा; आईची आर्त हाक

हेही वाचा : Video : बाप हो देव पाहिला का देव ?

 
नेर तलावात मृतदेह आढळला 

खटाव (जि. सातारा)  : बुध (ता. खटाव) येथील शैलेश दिलीप सूर्यवंशी (वय 32) यांचा येथील नेर तलावामध्ये संशयास्पद अवस्थेतील मृतदेह आज आढळून आला. 
 
शैलेश यांचा चुलत भाऊ मंदार सूर्यवंशी याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, शैलेश मांजरवाडी (ता. खटाव) येथील विविध कार्यकारी सोसायटीमध्ये सचिव पदावर कार्यरत होते. शनिवारी (ता. 21) सकाळी 11 च्या सुमारास वडूजला सोसायटीच्या कामासाठी जातो, असे सांगून निघून गेले. त्यानंतर शैलेश सायंकाळ झाली तरी घरी परतले नाही, म्हणून त्यांची पत्नी गौरी यांनी मंदारकडे चौकशी केली. त्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्य नातेवाईकांकडे, गावात व त्यांच्या सहकारी मित्रांकडे फोनवरून चौकशी करू लागले. मात्र, त्यांच्याविषयी काहीच माहिती मिळू न शकल्याने सोमवारी (ता. 24) मंदार व चुलत भाऊ उदय सूर्यवंशी यांनी शैलेश हरवल्याबद्दलची तक्रार दाखल करण्यासाठी पुसेगाव पोलिस ठाण्यात आले असता तिथे त्यांना नेर तलाव्यात मृतदेह असल्याचे समजले. खात्री करण्याकरिता दोघेही नेर तलाव्याकडे गेले असता मृतदेह शैलेशचाच असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद पुसेगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, शवविच्छेदन अहवालानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी दिली.

अवश्य वाचा : राजे की राजकारणी ? जबाब द्या

हेही वाचा : ...अन्‌ तेजसचे लष्कर भरतीचे स्वप्न हवेत विरले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Case Register Against Clerk Of Irrigation Department Satara