नगरमध्ये 38 लाख 50 हजारांची रोकड जप्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

अनेकांची पोलिस ठाण्यात धाव
पोलिसांनी रोकड पकडल्याची माहिती कळताच अनेक प्रतिष्ठित व्यक्ती तोफखाना पोलिस ठाण्यात आल्या. त्यामुळे याप्रकरणाची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. पोलिसही काहीकाळ गोंधळात पडले होते. रात्री उशिरापर्यंत फोना-फोनी सुरू होती.

एक हजार व बनावट नोटांचा समावेश; तोफखाना पोलिसांची कारवाई

नगर : नगर-मनमाड रस्त्यावरील महावीरनगरमध्ये काल रात्री साडेअकरा वाजता एका दुचाकीस्वाराकडून पोलिसांनी 38 लाख 50 रुपयांच्या जुन्या नोटा जप्त केल्या. याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी नोटा जप्त करून राहुल कांतीलाल भंडारी (रा. सारसनगर) यांच्याविरुद्ध कारवाई केली.

याबाबतची अधिक माहिती अशी, तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस गस्त घालीत असताना त्यांना एक दुचाकीस्वाराकडे मोठ्याप्रमाणात रोकड असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तोफखाना पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अजित चिंतले यांचे पथक नगर-मनमाड रस्त्यावरील हॉटेल ओबोरॉय पाठीमागील महावीरनगर परिसरात गेले. त्यावेळी एका दुचाकीस्वाराकडे संशयित बॅग आणि अन्य दोघेजण दिसले. पोलिसांनी या तरुणाला हटकले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ जुन्या एक हजारांच्या नोटाची 38 लाख 50 हजार रुपयांची रक्कम सापडली. तसेच, लहान मुलांच्या खेळण्यातील बनावट नोटांचे तीन बंडल व नोटांच्या आकराचे कागदी बंडल पोलिसांनी जप्त केला.

पोलिसांनी या तरुणाला तातडीने तोफखाना पोलिस ठाण्यात आणले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याला समर्पक उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे पोलिस कॉन्स्टेबल दीपक रोहोकले यांच्या फिर्यादीवरून कारवाई करण्यात आली. रोकड जप्तीच्या कारवाईबाबत प्राप्तीकर विभागाच्या पुणे विभागालाकळवण्यात आले आहे. त्यांचे अधिकारी उद्या नगरमध्ये येवून चौकशी करणार असल्याचे चिंतले यांनी सांगितले.
दरम्यान, राहुल भंडारी किराणा दुकान व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडे एवढी मोठी रक्कम आली कशी आणि ते कोणाकडे घेऊन जात होते. याप्रकरणामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा पोलिस कसून शोध घेत आहेत.

अनेकांची पोलिस ठाण्यात धाव
पोलिसांनी रोकड पकडल्याची माहिती कळताच अनेक प्रतिष्ठित व्यक्ती तोफखाना पोलिस ठाण्यात आल्या. त्यामुळे याप्रकरणाची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. पोलिसही काहीकाळ गोंधळात पडले होते. रात्री उशिरापर्यंत फोना-फोनी सुरू होती.

Web Title: cash of 38 lac seized in nagar