फुकट फौजदारीसाठीही सांगावी लागणार "जात' 

विजयकुमार सोनवणे
शनिवार, 8 डिसेंबर 2018

सोलापूर : सामाजिक भावनेतून मदत करण्यासाठी फुकट फौजदारी करण्याची तयारी असलेल्यांनाही आपली जात आणि पोटजात सांगावी लागणार आहे. महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समिती सदस्यत्वाच्या अर्जावर तसे नमूद करण्यात आले आहे. 

सोलापूर : सामाजिक भावनेतून मदत करण्यासाठी फुकट फौजदारी करण्याची तयारी असलेल्यांनाही आपली जात आणि पोटजात सांगावी लागणार आहे. महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समिती सदस्यत्वाच्या अर्जावर तसे नमूद करण्यात आले आहे. 

समितीचे सदस्य म्हणून कोणत्याही प्रकारचे मानधन अथवा भत्ते घेणार नाही असे प्रतिज्ञापत्रावर लिहून देणाऱ्या इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्जामध्ये जात लिहण्याची सक्ती करण्यात आल्याने वृक्षप्रेमीतून संताप आणि नाराजी व्यक्त होत आहे. वृक्ष प्राधिकरण समितीच्या स्थापनेला नोव्हेंबरच्या सभेत मुहुर्त मिळाला आणि ठराव झाला. महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीत अतिरीक्त आयुक्त, उद्यान अधीक्षक, सामाजिक वनीकरणाचे उपसंचालक, उपवनसंरक्षक, दयानंद आणि वालचंद महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक आणि आठ वृक्षप्रेमींचा सदस्य म्हणून समावेश असणार आहे. 

समिती सदस्यत्वासाठी करावयाच्या अर्जाचा नमुना महापालिकेने तयार केला आहे. त्यामध्ये अर्जदाराने लिहायचे नऊ कॉलम आहेत. नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, जन्मतारीख, वय, जात-पोटजात, शिक्षण, व्यवसाय आणि अनुभव अशी माहिती भरावी लागणार आहे. त्यानंतर समितीचे सदस्यत्व मिळणार आहे. मात्र अर्जात जातीचा उल्लेख आल्याने, जात पाहून सदस्य निवडणार का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. एखादा उत्कृष्ट वृक्षप्रेमी मागासवर्गीय असल्यास त्याला डावलणार का? पूर्णपणे सामाजिक भावनेतून करावयाच्या या कामासाठी जात ही पात्रता असू शकते का असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

उल्लेख योग्य असल्याचा दावा 
या संदर्भात सहायक वृक्षअधिकारी तथा उद्यान अधीक्षक निशीकांत कांबळे यांना विचारणा केली असता, शिपायाच्या भरतीवेळीही अर्जावर जातीचा उल्लेख असतो. त्यानुसार हा उल्लेख योग्य आहे, असे सांगितले. नोकरीत आरक्षण असते, पूर्णपणे मोफत सदस्यत्वासाठीही आरक्षण आहे का? आणि ही नोकरी आहे का? असे विचारल्यावर मात्र त्यानी वेळ मारून नेली. 

Web Title: cast shown compulsory in solapur mnc