नागपंचमी नियमांनुसार साजरी करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Celebrate Nagpanchami as per rules Collector Dr Raja Dayanidhi

नागपंचमी नियमांनुसार साजरी करा

सांगली - उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच शिराळा येथे नागपंचमी साजरी होईल. यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने नियोजन करावे. वन विभाग, पोलिस यंत्रणा व स्थानिक प्रशासन यांनी सण शांततेत व सुरळीत पार पडेल, यासाठी सर्वतोपरी दक्षता घ्यावी, आवश्यकता वाटेल तेथे जिल्हा प्रशासनाची तातडीने मदत घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज दिले. व्हिडिओ चित्रिकरणासह वन व पोलिस विभागातर्फे मोठा बंदोबस्त ठेवला आहे.

शिराळा येथे नागपंचमी मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. मंगळवारी (ता. २) नागपंचमी आहे. त्याच्या आयोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक झाली, त्या वेळी ते बोलत होते. यावेळी उपवनसंरक्षक नीता कट्टे, अपर पोलिस अधीक्षक मनीषा दुबुले, वाळवा उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, तहसीलदार गणेश शिंदे, सहायक वनसंरक्षक (वनीकरण) डॉ. अजित साजणे, शिराळा पोलिस निरीक्षक सुरेश चिल्लावार, मुख्याधिकारी योगेश पाटील, मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील, निसर्ग प्रतिष्ठानचे डॉ. रवींद्र होरा, अंबामाता मंदिराचे अध्यक्ष संभाजी गायकवाड आदी उपस्थित होते.

कोरोनाचे सर्वच निर्बंध शिथील झाल्यानंतर नागपंचमीचा सण साजरा होत असल्याने भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणे अपेक्षित आहे, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. दयानिधी म्हणाले, नगरपंचायतीने तातडीने साफसफाई करावी, साथरोग पसरू नये, याबाबत योग्य ती काळजी घ्यावी. येणाऱ्या भाविकांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध होईल, याचे नियोजन करावे.

फायर ब्रिगेड, रुग्णवाहिकांची उपलब्धता ठेवावी. वाहनांसाठी रस्ते मोकळे राहतील, याचेही नियोजन करावे. गर्दीत कोरोनाची लक्षणे जाणवतील अशांसाठी कोरोना तपासणी पथक तैनात ठेवावे. त्याचबरोबर औषधांचा साठा, सर्पदंशाची लस उपलब्ध ठेवावी. भाविकांसाठी मार्गदर्शनपर फलक लावावेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही अद्ययावत ठेवावेत.

नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर तयारी....

  • वन विभागाकडून १२५ अधिकारी-कर्मचारी नियुक्त

  • १० गस्ती पथके, ७ तपासणी नाके

  • शिराळ्यातील ३२ गल्ल्यांवर लक्ष

  • तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक तैनात

  • उपजिल्हा रुग्णालयात सुविध उपलब्ध

  • पोलिस विभाग-५०० अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती

  • सहा व्हिडिओ कॅमेऱ्यांद्वारे चित्रिकरण

  • ध्वनिमर्यादेवर नियंत्रणासाठी १२ यंत्रे

Web Title: Celebrate Nagpanchami As Per Rules Collector Dr Raja Dayanidhi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..