भाऊचा बड्डे, वाजले बारा...पोलिसांनी घेरलाय पुरा, आरारारा खतरनाक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 एप्रिल 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन असताना शिवनेरी गल्लीत रात्री उशिरा, कोणतीही खबरदारी न घेता, विनापरवाना एकत्र जमून वाढदिवस साजरा केला. त्यातून हा आजार पसरण्याचा धोका असल्याचे माहीत असतानाही स्वतःसह इतरांच्या जीवितास धोका निर्माण केला

श्रीरामपूर ः जिल्ह्यात संचारबंदी असताना, गर्दी करून साजरा केलेला भाऊचा "बर्थ-डे' बेलापूर येथील तरुणांना चांगलाच महागात पडला. पोलिसांनी "बर्थ-डे बॉय'सह त्याच्या सात मित्रांना चोप देऊन सर्वांवर गुन्हा नोंदविला. त्यांतील चौघांना अटक केली, तर इतर पळून गेले. 

बेलापूर येथील तरुणाचा काल (ता. 7) वाढदिवस होता. त्याच्या मित्रांनी शिवनेरी गल्ली परिसरात वाढदिवसाची जोरदार तयारीही केली. वाढदिवस साजरा झाल्यावर मित्रांनी फटाक्‍यांची आतषबाजी केली. रात्री आकाशात आतषबाजी पाहून पोलिस शिवनेरी गल्लीत आले. त्यांना पाहताच वाढदिवस साजरे करणाऱ्या तरुणांनी पळ काढला. मात्र, पोलिसांनी दोघांना पकडले. त्यांच्या मोबाईलमधील अन्य मित्रांची छायाचित्रे पाहून पोलिसांनी त्यांना घरा-घरांतून उचलले.

हेही वाचा - नगरमधील २१जणांना मरकजमुळेच बाधा

पोलिस चौकीत आणून चांगलाच चोप देत, गुन्हा दाखल केला. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून, अन्य आरोपी पसार झाले आहेत. याबाबत पोलिस नाईक बाळासाहेब गुंजाळ यांनी फिर्याद दिली. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन असताना शिवनेरी गल्लीत रात्री उशिरा, कोणतीही खबरदारी न घेता, विनापरवाना एकत्र जमून वाढदिवस साजरा केला. त्यातून हा आजार पसरण्याचा धोका असल्याचे माहीत असतानाही स्वतःसह इतरांच्या जीवितास धोका निर्माण केला, तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी सात जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Celebrating a birthday on the street brings crime