वॉटर कप विजेत्या गावांची माणमध्ये जल्लोषी मिरवणूक

रुपेश कदम
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

मलवडी - सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2018 स्पर्धेत माण तालुक्याने विजेतेपद व संयुक्त उपविजेतेपद मिळविल्याने माणवासीयांच्या आनंदाला उधाण आले. आज वॉटर कप विजेत्या टाकेवाडीने दहिवडी येथे तर संयुक्त उपविजेत्या भांडवलीने मलवडी येथे जल्लोषी मिरवणूका काढल्या.

मलवडी - सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2018 स्पर्धेत माण तालुक्याने विजेतेपद व संयुक्त उपविजेतेपद मिळविल्याने माणवासीयांच्या आनंदाला उधाण आले. आज वॉटर कप विजेत्या टाकेवाडीने दहिवडी येथे तर संयुक्त उपविजेत्या भांडवलीने मलवडी येथे जल्लोषी मिरवणूका काढल्या.

मागील वर्षी संभाव्य विजेत्या बिदाल गावाला वॉटर कपने हुलकावणी दिली होती. त्याची सल बिदालसह तमाम माणवासीयांना सलत होती. यंदा वॉटर कप जिंकायचाच या इरेला पेटलेल्या माणवासीयांनी संपुर्ण महाराष्ट्रात जलसंधारणाचे अभूतपूर्व काम केले. त्याचेच फलित म्हणून अंतिम सोळा गावांमध्ये टाकेवाडी व भांडवली गावाने स्थान मिळवले होते. या दोन्ही गावांनी ही निवड सार्थ ठरवताना विजेतेपद व उपविजेतेपद मिळवून माणवासीयांना जल्लोषाची संधी दिली.

आज दहिवडी येथील सिध्दनाथ मंदीरापासून टाकेवाडी ग्रामस्थांनी मिरवणूकीस सुरुवात केली. धनगरी गजी नृत्य व जबरदस्त ध्वनी यंत्रणेच्या ठेक्यावर व भंडार्याची उधळण करीत फटाक्यांचा आतिशबाजीत मिरवणूक काढण्यात आली. सजवलेल्या जीपमध्ये झळाळता वॉटर कप घेवून आमदार जयकुमार गोरे, सोनिया गोरे, दहिवडीच्या नगराध्यक्षा साधना गुंडगे यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते.

उपविजेत्या भांडवलीने मलवडीत बस स्थानकापासून श्री खंडोबा मंदीरापर्यंत मिरवणूक काढली. बँड पथक व डी. जे. च्या दणदणाटात गुलालाची उधळण करत काढलेल्या या मिरवणूकीत मोठ्या प्रमाणात भांडवलीचे ग्रामस्थ सहभागी झाले होते. विशेष म्हणजे महिला व मुलींचा उत्साह अतिशय जबरदस्त होता. मलवडीत प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात एखाद्या मिरवणूकीत महिलांनी देहभान विसरुन नृत्य केलेले पाहायला मिळाले.

मिरवणूका सुरु असतानाच सुरु झालेल्या रिमझिम पावसाने लोकांच्या आनंदात भरच टाकली. पावासासोबतच यशाच्या धुंदीत सर्वजण चिंब भिजून गेले होते. दहिवडी येथील मिरवणूकीतील आमदार गोरे यांचा सहकुटुंब सहभाग लोकांचा उत्साह वाढवत होता. पाऊस पडत असतानासुध्दा आमदार गोरे यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत मिरवणूकीत सहभाग घेतला. तर सरपंच सुनिल सुर्यवंशी यांच्या जयघोषाने भांडवलीकर ग्रामस्थांनी मलवडी दुमदुमून टाकली.

या दोन्ही गावांच्या आनंदात समस्त माणवासीय सहभागी झाले होते. प्रत्येकाच्या चेहर्यावर आपण केलेल्या कष्टाचे फळ मिळाले अशीच भावना होती. वॉटर कपमधील या घवघवीत यशामुळे माणमधील जलसंधारणाच्या कामाला आणखी बळ मिळणार आहे.

Web Title: celebration of water cup winning villages