साडेतीन हजार हेक्‍टर शेतीत सिमेंटचे जंगल 

सुनील पाटील - सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - शेती परवडत नाही, एकाच वेळी लाखो-करोडो रुपये मिळतात, पिढीच्या पिढी शेती करण्यात गेली; पण उत्पन्न म्हणावे तसे मिळत नाही म्हणणाऱ्या शेतकऱ्यांनी महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतींच्या हद्दीत व हद्दीशेजारी येणाऱ्या शेतजमिनींचा बाजार केला आहे. जेथे ऊस, भात, भुईमूग, ज्वारी, गहू घेतला जात असे, त्याच शेतीत आता सिमेंटचे जंगल दिसू लागले आहेत. पाच ते सहा वर्षांत जिल्ह्यातील सुमारे तीन ते साडेतीन हजार हेक्‍टर शेतजमिनीवर इमारतींनी कब्जा केला आहे. 

कोल्हापूर - शेती परवडत नाही, एकाच वेळी लाखो-करोडो रुपये मिळतात, पिढीच्या पिढी शेती करण्यात गेली; पण उत्पन्न म्हणावे तसे मिळत नाही म्हणणाऱ्या शेतकऱ्यांनी महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतींच्या हद्दीत व हद्दीशेजारी येणाऱ्या शेतजमिनींचा बाजार केला आहे. जेथे ऊस, भात, भुईमूग, ज्वारी, गहू घेतला जात असे, त्याच शेतीत आता सिमेंटचे जंगल दिसू लागले आहेत. पाच ते सहा वर्षांत जिल्ह्यातील सुमारे तीन ते साडेतीन हजार हेक्‍टर शेतजमिनीवर इमारतींनी कब्जा केला आहे. 

जिल्ह्यात चार ते पाच वर्षांत लागवडीखाली येणाऱ्या क्षेत्रात घट झाली आहे. प्रत्यक्षात शासकीय आकडेवारीत हा बदल दाखविला नसला तरीही महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या हद्दीतील शेतीचा बाजार झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्याचे 7 लाख 76 हजार 300 हेक्‍टर भौगोलिक क्षेत्र आहे. यापैकी 1 लाख 40 हजार हेक्‍टर जंगल असून 36 हजार 200 हेक्‍टर ओसाड आणि मशातीसाठी अयोग्य असणारी जमीन आहे. 41 हजार 100 हेक्‍टर जमीन कायमस्वरूपी चराऊ कुरण म्हणून आरक्षित ठेवली आहे. दरम्यान, 4 लाख 76 हजार 600 हेक्‍टर लागवडीखालील क्षेत्र आहे; मात्र पाच ते सहा वर्षापूर्वी शहराची हद्दवाढ होणार या हेतूने कोल्हापूर शहराशेजारी असणारी तसेच शहरापासून आठ ते दहा किलोमीटर अंतरावर असणारी शेतजमीन अनेक मार्गाने खरेदी करणाऱ्यांनी लयलूट केली. जमीन खरेदी करणाऱ्यांनाही तुमच्या शेतीवर आरक्षण पडेल, अशी भीती घालून सुपीक जमीन खरेदी करण्याचा धडाका लावला. अनेकांनी शेतकऱ्यांनी शेतीत काय मिळते म्हणून शेती विकून मोठी चूक केल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे. 

शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान, ठिबक सिंचन, जलयुक्त शिवार व सेंद्रिय शेती करून ओसाड जमीनही पिकविण्याचे प्रयत्न केले जात आहेत; तर दुसरीकडे सुपीक जमीन शासनाच्या सही, शिक्‍क्‍यानंतर नापीक करून घेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे, कोल्हापूर शहराभोवती फिरल्यानंतर याचा अंदाज येऊ शकतो. आजूबाजूला हिरवागार डोलणारा ऊस आणि मध्ये भव्य इमारती दिसत आहे. शेतकऱ्यांकडून कवडीमोलाने घेतलेली शेतजमीन दुसऱ्याला करोडो रुपयांना विकली जाते. यामध्ये दलाली करणारे कोट्यधीश झाले. ही परिस्थिती शहरापुरती किंवा एका तालुक्‍यात नाही, तर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यात हेच चित्र आहे. 

तालुकानिहाय गावांतील शेतात उभ्या असलेल्या इमारती 
करवीर तालुका : फुलेवाडी रिंगरोड, खुपिरे-वाकरे फाटा, कुडित्रे कारखाना परिसर, वडणगे, पाचगाव, गिरगाव, बालिंगा, नागदेववाडी, दोनवडे, पुईखडी, वाशी हद्द, पाडळी खुर्द, शिये, गांधीनगर, वळिवडे, चिंचवाड, मुडशिंगी, नेर्ली-तामगाव, उजळाईवाडी, सांगरूळ, गोकुळ शिरगाव, कंदलगाव, मोरेवाडी, भोगावती. 

पन्हाळा तालुका : पर्यटनदृष्ट्या विकसित होणाऱ्या पन्हाळ्याच्या पायथ्याशी असणारे वाघबीळ, जोतिबा परिसर, वारणानगर परिसर, रजपूतवाडी, बुधवार पेठ परिसर, बांबरवाडी, नेबापूर, कळे व कळे कॅंटीन परिसर, बाजार भोगाव व कोतोली. 

शाहुवाडी तालुका : मलकापूर, बांबवडे, डोनोली, सरूड, आंबा परिसर. 

हातकणंगले तालुका : हातकणंगले, इचलकरंजी परिसर, शिरोली, नागाव, टोप-संभापूर, पेठवडगाव, अंबप फाटा, वाठार, नरंदे, हर्ले, रुकडी, हुपरी, रेंदाळ. 

शिरोळ तालुका : शिरोळ, जयसिंगपूर, उदगाव, नांदणी. 

कागल तालुका : कागल, कसबा सांगाव व मौजे सांगाव हद्द, यळगूड, बिद्री कारखाना परिसर. 

राधानगरी तालुका : राधानगरी, तारळे, धामोड, आमजई-व्हरवडे. 

आजरा तालुका : आजरा, आंबोली रोड 

गडहिंग्लज तालुका : गडहिंग्लज, संकेश्‍वर रोड, चंदगड रोड, भैरी, वडरगे. 

कोल्हापूर जिल्ह्याचे दृष्टिक्षेपात क्षेत्र हेक्‍टरमध्ये (2015-16) 
जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र : 7 लाख 76 हजार 300 
जंगल : 1 लाख 40 हजार 
लागवडीखालील क्षेत्र : 4 लाख 76 हजार 600 
उसाचे क्षेत्र : 99 हजार 600 
बिगरशेती (उपयुक्त जमीन) : 36 हजार 200 
ओसाड व मशागती अयोग्य : 44 हजार 200 
चराऊ कुरण : 41 हजार 100 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cement forest