मराठ्यांचा चक्का जाम

मराठ्यांचा चक्का जाम

कोल्हापूर - मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी हजारोंच्या संख्येने आज पुणे-बंगळूर महामार्गासह जिल्ह्यात पन्नासहून अधिक ठिकाणी चक्का जाम आंदोलन झाले. सकल मराठा समाजाच्या वतीने याचे आयोजन झाले. कणेरीवाडी रस्त्यावर काही तरुणांनी वेळेपूर्वीच रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांनी त्यांना अटकाव केला. या किरकोळ घटनेव्यतिरिक्त जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन शांततेत झाले. रुग्णवाहिका, परीक्षार्थी, नोकरदारांना चक्का जाममधून तातडीने वाट दिली. राष्ट्रगीताने आंदोलनाची सांगता झाली. ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त होता.

सुमारे दोन हजार पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या फौजफाट्यात आज राज्यभर चक्का जाम झाले. त्याचाच भाग म्हणून जिल्ह्यातील सकल मराठा समाजातर्फे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर गोकुळ शिरगाव, उजळाईवाडी, पेठवडगाव परिसरात चक्का जाम केला. ठिकठिकाणी शे-चारशे कार्यकर्त्यांनी गटागटाने थांबून ‘एक मराठा, लाख मराठा’ आशा घोषणा देत चक्का जाम केला. गोकुळ शिरगावजवळ सकाळी साडेअकराच्या सुमारास वसंत मुळीक यांच्यासह सुमारे तीन-चारशे कार्यकर्ते जमले होते. त्यांनी दोन्ही बाजूंनी महामार्ग रोखला. पोलिसांच्या फौजफाट्यात सुरू असलेले आंदोलन अर्धा तास सुरू राहिले. यानंतर पोलिसांनी विनंती केल्यावर तातडीने राष्ट्रगीताने आंदोलनाची सांगता झाली.

सर्व प्रवेश मार्गांवर चक्का जाम 
सकाळी साडेअकरा ते दुपारी बारा अशा एकाच वेळ सर्व ठिकाणी चक्का जाम करण्यात आले. काही ठिकाणी पोलिसांना बळाचा वापर करून वाहतूक सुरळीत करावी लागली. शहरात शिरोली टोल नाका, शिवाजी पूल, कसबा बावडा न्याय संकुल, दसरा चौक, मंगळवार पेठ, शिवाजी पेठ आदी ठिकाणी चक्का जाम करण्यात आले. हातात भगवे झेंडे, ‘एक मराठा लाख मराठा’ असे लिहिलेले टी शर्ट कार्यकर्त्यांच्या अंगावर दिसत होते.

मोटारीस तातडीने वाट 
पुणे-बंगळूर महामार्गावरील गोकुळ शिरगाव येथे चक्का जाम होते. याचवेळी सिद्धगिरी हॉस्पिटलकडे जाण्यासाठी रुग्ण असलेली मोटार तेथे आली. पुढील सीटवरील रुग्ण पाहून कार्यकर्त्यांनी मोटारीस तातडीने वाट दिली. याच वेळी निवडणूक कामासाठी जाणाऱ्या नोकरदारालाही कार्यकर्त्यांनी त्यांच्या विनंतीनंतर वाट दिली.

पोलिसांकडून खबरदारी
महामार्गावर अधिक वेळ चक्का जाम होऊ नये, यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली होती. कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेऊन अर्ध्या तासात आंदोलन संपविण्याची विनंती केली होती, मात्र महामार्गावरील कणेरी मठाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नियोजित वेळेपूर्वीच काही मोजक्‍या कार्यकर्त्यांनी अचानक चक्का जाम केला. गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी त्यांना तातडीने ताब्यात घेऊन गोकुळ शिरगाव येथील नियोजित आंदोलनस्थळी सोडले.

वाहनांच्या रांगा
महामार्गावर तीन-चार ठिकाणी एकाच वेळी चक्का जाम झाल्यामुळे गोकुळ शिरगाव, उजळाईवाडी, पेठवडगाव परिसरात  सकाळी अकरा ते दुपारी एकपर्यंत वाहने थांबून होती. ठिकठिकाणी हे आंदोलन सुरू असल्यामुळे फार रांग नसली तरीही रस्ते शांत होते. अनेक प्रवासी नातेवाइकांना, कुटुंबीयांना संपर्क साधून चक्का जामची माहिती आणि उशीर होण्याचा निरोप देत होते.

पोलिसच पोलिस
महामार्गाच्या आजूबाजूला असलेल्या काही फाट्यांवरही पोलिस सकाळी दहापासूनच थांबून होते. काही तरुण येऊन महामार्गावर चक्का जामचा प्रयत्न करताना पोलिस त्यांना रोखत होते. कारवाई न करताच त्यांना नियोजित ठिकाणीच चक्का जामसाठी जाण्याचा सल्ला देत होते. त्यामुळे अनेक ठिकाणी होणारे चक्का जाम होऊ शकले नाही.

विनंतीला मान
आंदोलनाला सुरवात झाल्यानंतर एक पोलिस अधिकारी तुम्हाला आंदोलन करता येणार नाही. या आंदोलनाला परवानगी नाही, असे म्हणून आंदोलकांना रस्त्यावरून हटवत होते; पण आंदोलनाला परवागी मिळाली आहे. वृत्तपत्र वाचत जा म्हणजे तुम्हाला समजेल, असे म्हणत कार्यकर्त्यांनी शिवाजी पुलावरच तळ ठोकला. दरम्यान, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या विनंतीला मात्र मान देत कार्यकर्त्यांनी वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली.

गोकुळ शिरगाव दणाणले 
गोकुळ शिरगाव ः विविध मागण्यांसाठी आज सकल मराठा समाजातर्फे येथे पुणे-बंगळूर महामार्गावरील चक्का जाम आंदोलन केले. कोंडुस्कर पेट्रोल पंपासमोर हे आंदोलन होऊन राष्ट्रीय महामार्ग रोखला. कार्यककर्त्यांनी घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. या वेळी दोन ते तीन कि.मी.पर्यंत वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. आंदोलनाचे नेतॄत्व मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, करवीर तालुकाप्रमुख शशिकांत पाटील-कणेरीकर, मराठा महासंघाच्या महिला आघाडीप्रमुख शैलजा भोसले, संतोष पाटील, सचिन पाटील, डॉ. विशाल पाटील, प्रशांत पाटील, कांचन सचिन पाटील, संदीप पाटील, शांताराम पाटील, संभाजी पाटील, सर्जेराव मिठारी, राजेंद्र खराडे, सुरेश पाटील, विजय पाटील, सुभाष जाधव, कमलकर जगताप, विनोद खोत, अभिजित करवते, संजय जाधव, अनिल पाटील, सरदार म्हाकवे, अमोल मोरे, साई खोत, सुरेश कदम, आदी उपस्थित होते.

गडहिंग्जला आंदोलनाद्वारे संताप 
गडहिंग्लज ः  शांततेच्या मार्गाने मराठा समाजाने आरक्षणासाठी राज्यभर लाखोंच्या सहभागाचे मोर्चे काढले. तरीही शासन या मागणीकडे गांभीर्याने पाहत नाही. मराठ्यांच्या मागण्या शासनाने तत्काळ मान्य कराव्यात, अन्यथा त्यांच्या संतापाचा उद्रेक होईल, असा इशारा आजच्या चक्का जाम येथे आंदोलनाद्वारे मराठा बांधवांनी दिला.
सकल मराठा समाजातर्फे आज येथील दसरा चौकातील शिवाजी पुतळ्याजवळ चक्का जाम आंदोलन केले. सकाळी साडेअकराला मराठा समाजासह इतर जाती-धर्मांतील प्रमुखांनी या आंदोलनात सहभाग घेतला. तासाहून अधिक काळ चंदगड, आजरा, संकेश्‍वर व गारगोटी मार्ग आंदोलकांनी रोखून धरला.

आजऱ्यात रास्ता रोको 
आजरा ः  येथे सकल मराठा समाजातर्फे येथील संभाजी चौकात चक्का जाम झाले. तासभर रास्ता रोको झाला. मंगळवारी सकाळी शिवाजी पुतळ्यासमोर सकल मराठा समाजाचे पदाधिकारी जमले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला. मुख्य बाजारपेठेतून रॅली निघाली. संभाजी चौकात आल्यावर आंदोलकांनी रस्त्यात ठिय्या मारला. तासभर वाहतूक रोखली.

कोल्हापूर- रत्नागिरी मार्गावर भगवे वादळ
पन्हाळा ः कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर आज सकाळी ११ वाजता सकल मराठा समाजातर्फे चक्‍का ाम आंदोलन छेडले. सुमारे तासभर कार्यकर्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला हातात भगवे झेंडे घेऊ बसल्याने पन्हाळ्याडे येणाऱ्या रस्त्यासह कोल्हापूरकडे नि रत्नागिरीकडे जाणाऱ्या वाहनांची रस्त्यावर भली मोठी रांग लागली होती. शाहूवाडी विभागाचे पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांच्यासह पन्हाळ्याचे पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, उपनिरीक्षक शाशिकांत गिरी यांच्यासह कोडोलीचे पोलिस तसेच दंगल नियंत्रण पथकातील पोलिस असा ६० कर्मचाऱ्यांचा ताफा बंदोबस्तासाठी तैनात केला होता. शिवाजी खोत, राहुल पाटील, विनायक रेडेकर, संतोष मोरे, अक्षय पाटील, महेश चौगले, अनिकेत जगदाळे, मंदार नायकवडी, आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले.

बांबवडेत कार्यकर्ते आक्रमक
बांबवडे ः मराठा आरक्षणासाठी येथे महामार्गावर तासभर रास्ता रोको केल्याने वाहतूक कोंडी झाली. आज सकाळी अकराच्या सुमारास तालुक्‍यातील कार्यकर्ते येथे एकत्र आले. कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर रास्ता रोको केला. तालुक्‍यात एकाच ठिकाणी आंदोलन होत असताना निवेदन स्वीकारण्यासाठी तहसीलदार न आल्याने आंदोलनकर्ते आक्रमक झाले. आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडले. त्यानंतर पोलिस निरीक्षक अनिल गाडे व फौजदार राहुल पाटील यांनी त्यांची समजूत काढली.

युवा नेते कर्णसिंह गायकवाड, मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष सुनील पाटील (थेरगावकर) अमर पाटील, महादेवराव पाटील, विष्णू यादव, के. एन. लाड, उदय पाटील, किसन लोहार, प्रकाश पाटील आदींनी मागण्यांचे निवेदन मंडल अधिकारी आर. बी. माळी व पोलिस निरीक्षक अनिल गाडे यांच्याकडे दिले. 

यावेळी विजय बोरगे, संदीप पाटील, अभय चौगुले, सचिन मुडशिंगकर, रवींद्र फाटक, शशिकांत लाड, विजय घोडे-पाटील, सागर यादव, महेश पाटील, अविनाश वग्रे, रामचंद्र साळुंखे, नितीन कांबळे, जयवंत पाटील, दीपक यादव आदींसह मराठा बांधव उपस्थित होते.

राधानगरीला निवेदन
राधानगरी  ः येथे मराठा समाजाने आपल्या मागण्यांसाठी चक्‍का जाम आंदोलन केले. सुमारे अर्ध्या तासानंतर वाहतूक पूर्ववत झाली. याबाबत आंदोलनकर्त्यांच्या वतीने तहसीलदारांना मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष सुहास निंबाळकर, संभाजी आरडे, सुनील बडदारे यांनी निवेदन दिले.

परितेत प्रतिसाद
राशिवडे बुद्रुक ः आज परिते येथे मराठा तरुणांनी चक्का जाम अंदोलन केले. कोल्हापूर, भोगावती, राशिवडे, म्हाळुंगे मार्गावरील सर्व वाहने दीड तास रोखून ठेवली होती. करवीरचे पोलिस यावेळी उपस्थित होते. लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आंदोलनाला पाठिंबा दिला. 

गारगोटीत वाहतूक ठप्प 
गारगोटी ः  मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, कोपर्डीतील मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी जोरदार घोषणा देत सकल मराठा समाजाच्या वतीने येथील बसस्थानकासमोर चक्का जाम आंदोलन झाले. आंदोलनकर्त्यांनी गारगोटी- कोल्हापूर रस्त्यावरील वाहतूक रोखली. यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. आज सकाळी कार्यकर्त्यांनी गारगोटी-कोल्हापूर रस्त्यावर बसस्थानकासमोर ठिय्या मांडला. जिल्हा परिषद सदस्य प्रा. अर्जुन आबिटकर, सम्राट मोरे, प्रवीणसिंह सावंत यांनी भविष्यात समाजाच्या आरक्षण मागणीसाठी आरपारची लढाई करावी लागणार असून, मुंबई येथील विराट मोर्चात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.

डॉ. राजीव चव्हाण, डॉ. जयश्री चव्हाण, रवी देसाई, सरपंच रुपाली राऊत यांची भाषणे झाली. अलकेश कांदळकर, उपसरपंच अरुण शिंदे, प्रकाश वास्कर, बजरंग कुरळे, नंदकुमार शिंदे, वैभव चौत्रे, संग्राम सावंत, युवराज येडुरे, भीमराव शिंदे, पापा देसाई, मानसिंग देसाई, विजय सारंग, यांच्यासह कार्यकर्ते  झाले होते.

बालिंगेत तीन तास आंदोलन
कुडित्रे -सकल मराठा कार्यकर्त्यांतर्फे कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील बालिंगा पूल येथे चक्का जाम आंदोलन केले. तीन तास आंदोलन झाले. घोषणांनी भोगावती नदी काठ दणाणून गेला. मराठा महासंघाचे वसंत मुळीक यांच्या उपस्थितीत आंदोलन झाले. सकाळी साडेदहा वाजता दोनवडे फाटा येथे परिसरातून कार्यकर्ते जमू लागले. उत्तम पवार, रामचंद्र पोवार, इंद्रजित शिरगावकर, इंद्रजित पाटील, दादा पाटील, सरदार पाटील, संतोष वाडकर, मारुती जांभळे, अमर जत्राटे, सूरज पालकर, सतेज पाटील, अभिजित कदम, नरेंद्र पाटील उपस्थित होते.

कसबा बावड्यातही एल्गार 
कसबा बावडा ः येथील राजाराम कारखाना रस्ता चौकात आज मराठा समाजातर्फे चक्का जाम झाले. बावडा-शिये रस्त्यावर दोन्हीकडे लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ‘आरक्षण आमच्या  हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, ‘आरक्षण मिळवल्याशिवाय राहणार  नाही’, ‘एक मराठा - लाख मराठा’ अशा घोषणांनी हा परिसर दुमदुमून गेला. राष्ट्रगीताने आंदोलनाची सांगता झाली.

सरवडेत शांततेत आंदोलन 
सोळांकूर : सरवडे येथे आज मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको करून चक्‍का जाम आंदोलन झाले. आज सकाळपासूनच तरुण चक्‍का जामसाठी जमा झाले. सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत शांततेने आंदोलन झाले. राधानगरी-निपाणी मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी २० आंदोलकांना ताब्यात घेतले व त्यानंतर सोडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com