बेळगावचा आमदार म्हणून महाराष्ट्र विधानसभेत जायला आवडेल; कोणाची इच्छा ?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 डिसेंबर 2019

कर्नाटकी प्रशासानाने सत्कार कार्यक्रम होऊ नये यासाठी दबाव आणला होता. हा दबाव झुंगारुन टाकीत महाराष्ट्र एकिकरण युवा समितीतर्फे रविवारी अनगोळ येथील आदर्श सोसायटीच्या सभागृहात चंदगडचे आमदार पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

बेळगाव - काश्‍मिरमधील 370 कलम व राम मंदिराचा प्रश्‍न ज्या प्रमाणे निकालात काढण्यात आला त्याचप्रमाणे बेळगावसह सीमाप्रश्‍न निकालात काढावा, तसेच येत्या पाच वर्षात सीमाभाग महाराष्ट्रात आणुन बेळगावचा आमदार म्हणुन महाराष्ट्र विधान सभेत जायला आवडेल, असे प्रतिपादन चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी केले. 

कर्नाटकी प्रशासानाने सत्कार कार्यक्रम होऊ नये यासाठी दबाव आणला होता. हा दबाव झुंगारुन टाकीत महाराष्ट्र एकिकरण युवा समितीतर्फे रविवारी अनगोळ येथील आदर्श सोसायटीच्या सभागृहात चंदगडचे आमदार पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पाटील यांनी सीमाप्रश्‍नी महाराष्ट्र सरकारने दिरंगाई केली होती. मात्र विधानसभेत शपथ घेताना सीमाप्रश्‍नी आवाज उठविला त्यामुळे राज्यपालांच्या अभिभाषनावेळी सीमाप्रश्‍नी ठोस भुमिका घेण्यात येईल, असे आश्‍वासन दिले तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने तातडीने बैठक घेऊन सर्वोच्च न्यायालयातील दाव्याला गती देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सीमाप्रश्‍नी मंत्राची नेमणुक करण्यात आली आहे. त्यामुळे निश्‍चितच न्याय मिळणार आहे., असे सांगितले. 

हेही वाचा - भाजपच्या हातून सत्ता हस्तगत करण्यासाठी राष्ट्रवादीचा येथे  ऍक्‍शन प्लॅन 

यापुढेही शांततेच्या मार्गाने लढा

काळ्या दिनाच्या फेरीत तरुणांची गर्दी पाहुन सीमाभागात पुन्हा एकदा चैतन्य निर्माण झालेले पहावयास मिळाले असुन युवकांनी महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि सीमाप्रश्‍नाचा झेंडा पुढे घेऊन जाण्याचे काम केले पाहिजे. आतापर्यंत शांततेच्या मार्गानी लढा सुरु ठेवण्यात आला आहे. यापुढेही शांततेच्या मार्गाने लढा पुढे नेऊया यापुढे सीमावाशीयांचा प्रतिनिधी म्हणुन महाराष्ट्राच्या विधान सभेत काम करणार असुन राम मंदिराचा निकाल लवकर लागावा यासाठी ज्या प्रमाणे प्रयत्न करण्यात आले त्याचप्रमाणे सीमाप्रश्‍न लवकर सुटावा आणि येथील जनता सुख समाधानाने राहावी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे मत व्यक्‍त केले. प्रारंभी आमदार पाटील, मध्यवर्ती महाराष्ट्र एकिकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, माजी आमदार अरविंद पाटील, माजी महापौर मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. 

हेही वाचा - कोल्हापूर ते निपाणी दरम्यानची बससेवा बंद 

सीमावासियांचे स्मरण ठेऊन शपथ

मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी राजेश पाटील यांनी सीमावासियांना स्मरण करून शपथ घेत सर्वांचे लक्ष वेधुन घेतले त्याबाबत कृतज्ञता व्यक्‍त करण्यासाठी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले असुन बेळगावातील मराठी माणसे कशा प्रकारे जगत आहेत, याची जाणीव पाटील यांना आहे. महाराष्ट्रात जाण्यासाठी लढणाऱ्या सीमावाशीयांचा इतिहास पाहीला तर बेळगावकरांचा त्याग दिसुन येतो. सीमाप्रश्‍नासाठी युवा पिढी पुढे आली आहे हे बघुन समाधान वाटत आहे असे मत व्यक्‍त केले. आमदार अरविंद पाटील, शुभम शेळके यांनीही मनोगत व्यक्‍त केले. कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी युवा समितीच्या कार्याचा आढावा घेतला. श्रीकांत कदम यांनी सुत्रसंचालन केले. यावेळी मराठी भाषिक मोठ्‌या संख्येने उपस्थित होते. 

त्या सर्वांना सत्कार समर्पित

बेळगावात अनेक वर्षांपासुन वास्तव्य करीत असुन सीमाप्रश्‍न जवळुन पाहिलेला आहे. अनेकांनी प्रश्‍नासाठी लाठ्याकाठ्या खाल्या आहेत. तुरुंगवास भोगला आहे त्या सर्वांना आजचा सत्कार समर्पित करतो, असे उद्गार पाटील यांनी मनोगत व्यक्‍त करताना काढले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandgad MLA Rajesh Patil Wants Belgaum In Maharashtra