चंदगड नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक डिसेंबरमध्ये शक्य

सुनील कोंडुसकर
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

मे महिन्यात नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु, या भागात पडणारा पाऊस विचारात घेऊन नागरिकांनी निवडणूक कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिल्यानंतर निवडणूक विभागाने कार्यक्रम रद्द केला.

चंदगड ( कोल्हापूर ) - येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर तब्बल 111 हरकती नोंदवण्यात आल्या आहेत. यातून स्थानिक राजकारणातील संघर्ष स्पष्टपणे जाणवत आहे. ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर पहिलीच निवडणूक होत असून, राजकीय वर्चस्वासाठी स्थानिक गट वेगाने कार्यरत झाले आहेत. राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा पाहता डिसेंबरच्या अखेरपर्यंत निवडणूक कार्यक्रम लागण्याची शक्‍यता आहे. 

मे महिन्यात नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु, या भागात पडणारा पाऊस विचारात घेऊन नागरिकांनी निवडणूक कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिल्यानंतर निवडणूक विभागाने कार्यक्रम रद्द केला. त्यावेळी लोकसभा निवडणुकीची यादी विचारात घेऊन नगरपंचायतीची यादी निश्‍चित करण्यात आली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीदरम्यान सुमारे 1 हजार 900 मतदार यादीतून कमी झाले तर काही नव्याने नोंदवले गेले. त्यामुळे मतदारांचे अनुक्रम नंबर बदलले. यादी निश्‍चित करताना ऑनलाईन पध्दतीने अनुक्रम नंबर द्यावे लागतात. हे अनुक्रम नंबर दिल्यानंतर मूळ यादीत बदल झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. हरकतींबाबत मंडल अधिकाऱ्यांकडून स्थळ पाहणी करून त्यांचा योग्य त्या प्रभागात समावेश करण्यात येणार आहे. 

सत्तेसाठी रस्सीखेच

दरम्यान, 17 प्रभागांसाठी 7 हजार 834 मतदार मतदान करणार आहेत. नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने अनेकांच्या महत्त्वाकांक्षा उंचावल्या आहेत. स्वतःला नाही तर किमान पत्नीच्या माध्यमातून या पदाला गवसणी घालण्यासाठी अनेकांनी मनसुबे रचले आहेत. त्या दृष्टीने आता व्यूहरचना केली जात आहे. या निवडणुकीला नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीची पार्श्‍वभूमी असेल. त्यामुळे सत्तेसाठी रस्सीखेच पाहायला मिळेल. राज्यात सध्या सत्तास्थापनेचा तिढा आहे. ते पाहता डिसेंबर अखेरपर्यंत निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्‍यता आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandgad Nagarpanchayat First Election Possible In December