बघावे ते नवलच ! कडीसाठी हातकडीचा उपयोग!

सुनील कोंडुसकर
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

- चंदगड पोलिसांचा प्रकार
- जप्त मद्याचे बॉक्स भरलेल्या खोलीला हातकडीचे कुलूप

चंदगड : पोलिस आणि हातकडी म्हटले की अनेकांची भंबेरी उडते. चित्रपटांमध्ये फौजदाराचा भूमिकेतील हिरो जेव्हा खलनायकाला उद्देशून 'ये हथकडी तुम्हारे हाथ में पहनाकर पुरे मोहल्ले मे घूमाऊंगा समजे?' असे जोशपूर्ण डायलॉग फेकतो त्यावेळी त्याच्या हातातील लोंबकळणारी हातकडी लक्ष वेधून घेते. वाईट कृत्य करणाऱ्यांच्या मनावर दडपण निर्माण करणारी हीच हातकडी जर दरवाज्याची कडी म्हणून वापरली जात असेल तर? होय येथील पोलिसांनी दरवाजाची कडी खराब झाल्याने चक्क हातकडी चा वापर कडी आणि कुलूप म्हणून केला आहे. सोशल मीडियावर याबाबत चर्चा रंगली आहे.

ब्रिटिशकालीन इमारतीतून तहसील कार्यालय आणि पोलिस ठाण्याचे कामकाज चालायचे. दोन वर्षांपूर्वी तहसील कार्यालय नूतन प्रशासकीय इमारतीत स्थलांतरित झाले. जुन्या इमारतीतील खोल्या रिकाम्या आहेत. पूर्वी निवडणूक कामासाठी वापरली जाणारी खोली सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. गेल्या वर्षभरात पोलिसांनी तालुक्याच्या विविध भागात अवैध दारू व्यावसायिकावर छापे मारले. जप्त केलेली दारू या खोलीत जमा करण्यात आली आहे. जप्त मुद्दे मालाची सुरक्षितता महत्त्वाची आहे परंतु, या खोलीची कडी खराब झाल्याने त्या जागी आरोपींसाठी वापरल्या जाणाऱ्या हातकडी चा उपयोग केला आहे.

कडी आणि कुलूप असा दुहेरी वापर झाल्याने आपल्या कल्पकतेवर पोलिस खूश असले तरी जनतेत मात्र याची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर खोलीचा दरवाजा आणि त्यासाठी वापरलेल्या हातकडी चा फोटो व्हायरल झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. आरोपींच्या मनात धाक निर्माण करणाऱ्या या साधनाचे महत्त्व पोलिसांकडूनच कमी केले जात असल्याचे बोलले जात आहे. त्याच वेळी सार्वजनिक मालकीच्या इमारती व अन्य साहित्य तिच्या सुरक्षिततेबाबत सरकारी अधिकाऱ्यांकडूनच कशाप्रकारे हलगर्जीपणा केला जातो हेही दिसून येत आहे. कडी-कोयंडा खरेदी करण्याएवढे पैसे पोलिसांकडे नाहीत का? एखाद्या सुताराला बोलावून ते दरवाजे दरवाजे ची दुरुस्ती करू शकत नाहीत का? असे प्रश्न विचारले जात आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandgadh Police use handcuffs for lock