राज्यात पाणंद रस्ते विकास कार्यक्रम लवकरच - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

गडहिंग्लज - मुख्यमंत्री ग्राम पाणंद रस्ते विकास कार्यक्रम  राज्यात लवकरच सुरू होईल. या रस्ते विकासात येणारे अतिक्रमण बाजूला करून शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी या योजनेची अंमलबजावणी होईल, असे आश्वासन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.   

गडहिंग्लज - मुख्यमंत्री ग्राम पाणंद रस्ते विकास कार्यक्रम  राज्यात लवकरच सुरू होईल. या रस्ते विकासात येणारे अतिक्रमण बाजूला करून शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी या योजनेची अंमलबजावणी होईल, असे आश्वासन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.   

रमेशराव रेडेकर युवा फाऊंडेशनतर्फे भूमीनंदन महोत्सवातंर्गत आयोजित कृषी प्रदर्शन व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती.

शेतकरी आता पारंपारिक शेती पद्धतीतून सुखी होणार नाही. शेती उद्योगातील बदल स्वीकारून शेतकऱ्यांना आधुनिकतेच्या वाटेवरून मार्गक्रमण करावे लागेल. तरच शेती उद्योगातून चांगले उत्पादन मिळू शकते. कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणारी अशी संधी शेतकऱ्यांनी कधीच दवडू नये
- चंद्रकांत पाटील 

श्री. पाटील म्हणाले, ""कृषी प्रदर्शनातून नवीन तंत्रज्ञानाची ओळख होत असते. शासनही शेतकऱ्यांना सुरक्षितता देण्यासह सुखी व आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या. त्या केवळ कागदावर राहू नयेत याचीही खबरदारी घेतली. शासनाने कालपासूनच सुरू केलेले 2 लाख शेतकऱ्यांसाठीचे प्रशिक्षण हा त्यातलाच एक भाग आहे. गावागावात पगारी कार्यकर्ते नेमून योजना सामान्यापर्यंत नेता येतात. यासाठी स्वयंसेवी संस्था व तरूणांनी पुढे यायला हवेत."" 

एफआरपी द्यावीच लागेल
श्री. खोत म्हणाले, ""उसासाठी दरवर्षी लढा उभारला जातो. कारखान्यांनी 2900 रूपयाखाली साखर विकायची नाही असा कायदा शासनाने केला आहे. एफआरपी अजून शेतकऱ्यांना मिळालेली नाही. कारखान्यांना शंभर टक्के एफआरपी द्यावीच लागेल. या मुद्यावर शासन शेतकऱ्यांच्या सोबत आहे."

श्री. खोत म्हणाले, "" शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना राबवल्याने सामान्यांना हे सरकार आपलं आहे असा विश्‍वास बसला आहे. पाणी अडवण्याचे काम केले. यामुळे उत्पादनात वाढ झाली. आता शेतमालाला बाजारपेठ व पायाभूत सुविधा देण्याचे काम सुरू आहे. भाजपच्या डोक्‍यात सत्तेची हवा कधीच आली नाही. सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून कारभार सुरू आहे. कृषी प्रदर्शनातून तंत्रज्ञान बांधांपर्यंत पोहचते. याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा.""

फाऊंडेशनचे अध्यक्ष आदित्य रेडेकर, आमदार सुरेश हाळवणकर, रमेश रेडेकर, अमल महाडिक, डॉ. एकनाथ चाकूरकर यांची भाषणे झाली. नंदकुमार गोरूले यांनी सूत्रसंचालन केले. संजय कांबळे यांनी आभार मानले.

दरम्यान, सकाळी कृषी दिंडीचे उद्‌घाटन निडसोशी मठाचे जगद्‌गुरू शिवलिंगेश्‍वर महास्वामी यांच्या हस्ते झाले. यावेळी स्वामीजींचे आशिर्वचन झाले. जि. प. सदस्या सुनिता रेडेकर, प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार रामलिंग चव्हाण, शिवाजी पाटील, दशरथ तांभाळे, नामदेव पाटील, अरूण देसाई, डॉ. संजय चव्हाण, अनिता चौगुले, सुनिल गुरव, दिपक कुराडे, शशिकला पाटील, ज्योत्स्ना चराटी उपस्थित होते.

 

Web Title: Chandrakant Patil comment