LokSabha 2019 : पुढचा आठवडा महाराष्ट्रात खूप गाजणार

LokSabha 2019 : पुढचा आठवडा महाराष्ट्रात खूप गाजणार

कोल्हापूर - महाराष्ट्रात काही कुटुंबे संस्थांच्या जोरावर काँग्रेसच्या काळात मोठी झाली. त्यांना भविष्यात संस्थांची प्रगती करायची असेल तर शिवसेना-भारतीय जनता पक्षात आल्याशिवाय पर्याय नाही, हे त्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे पुढचा आठवडा महाराष्ट्रात खूप गाजणार आहे, असे सूचक विधान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. 
सेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांबरोबर त्यांनी तपोवन मैदानाची सभेसाठी पाहणी केली. या वेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.  

ते म्हणाले, की सभा मोठी होण्यातून प्रभाव निर्माण होतो, हा एक भाग झाला. कर्तृत्वातून प्रभाव निर्माण होतो, हा दुसरा भाग झाला. उमेदवारीच कोणी घ्यायला तयार नाही, अशी आघाडीची स्थिती झाली. अमरावतीत राणा यांच्या पत्नीला उमेदवारी दिली. ज्या ‘स्वाभिमानी’ने आयुष्यभर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली, त्या काँग्रेस-राष्ट्रवादीने स्वाभिमानी संघटनेला बरोबर घेऊन हातकणंगलेतून खासदार राजू शेट्टी यांना उमेदवारी दिली. वसंतदादांच्या सांगलीतून ‘स्वाभिमानी’ला जागा द्यावी लागली. ज्यांना उमेदवारी मिळत नाही, अशी मोठी यादी आहे. अशोक चव्हाण नाही म्हणत होते. पण, घोषित करून टाकले. त्यांना वाटत होते, की पत्नीने निवडणूक लढवावी. मध्ये दोन जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला देणार असल्याची चर्चा होती. वंचित आघाडीलाही जागा देणार होते. या जागा वाटता-वाटता ते स्वतः काही जागा लढविणार आहेत की नाहीत. त्यामुळे आघाडीला आपले उमेदवारच ठरविता येत नाहीत. 

युतीचा प्रारंभ प्रत्येक निवडणुकीत शानदार व्हावा, निवडणूकभर त्याचा प्रभाव राहावा यासाठी कोल्हापुरातून प्रचाराचा प्रारंभ करीत आहोत. गेल्या ३० वर्षांत मोठा प्रारंभ करण्याची पद्धत आहे. (कै.) बाळासाहेब ठाकरे यांची अंबाबाईवर प्रचंड श्रद्धा होती. त्यामुळे कोल्हापुरातूनच प्रचाराचा प्रारंभ करावा, अशी त्यांची इच्छा असायची. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचीही अंबाबाईवर श्रद्धा आहे. दोनवेळा त्यांचा दौरा रद्द झाला.

अजूनही त्यांना यायचे आहे. त्यामुळे सर्व जुने, नवे कार्यकर्ते कोल्हापुरातून प्रचाराचा प्रारंभ करण्यास आग्रही होते. ही सभा इतकी विराट होईल की अन्य कोणत्याही लोकसभा मतदारसंघात अशी सभा होणार नाही. सर्वजण या सभेच्या तयारीला लागले आहेत. गांधी मैदान अपुरे पडले असते. म्हणून तपोवन मैदानावर सभा घेणार आहोत. पण, ‘तपोवन’ही अपुरे पडेल, असे चित्र आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख चौकांत आम्ही सभेचे थेट प्रक्षेपण करणार आहोत.

शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार राजेश क्षीरसागर, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, विजय देवणे, संजय पवार, संदीप देसाई यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com