Sangli : गटबाजी करणाऱ्यांना थेट इशारा

नेत्यांचे मनोमीलन मनापासून की वरवर; ग्रामपंचायत निवडणुका बनणार ‘लिटमस टेस्ट’
chandrashekhar bawankule
chandrashekhar bawankuleesakal

सांगली : काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या सांगलीत गेली आठ वर्षे भाजप एक नंबर आहे, हे स्पष्ट आहे. मात्र याच भाजपला सध्या गटबाजीने ग्रासले आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगलीत आयोजित मेळाव्यात बोलताना सर्व नेत्यांसमोरच गटबाजी खपवून घेणार नाही, असे सांगत थेट इशारा दिला. त्यामुळे नेत्यांचे मनोमीलन मनापासून आहे की वरवरचे, हे ग्रामपंचायत निवडणुकीत स्पष्ट होईल.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. काल ते सांगलीत येऊन गेले. नेहमीप्रमाणेच राज्याचा नेता आला की सगळे मतभेद विसरून पक्षाचे आमदार, खासदार, पदाधिकारी एकत्र येतात आणि आपण कसे एक आहोत, याचे प्रदर्शन करून नेत्याला खूश करतात. याचे प्रत्यंतर या दौऱ्यातही दिसून आले. खासदार संजय पाटील, पालकमंत्री सुरेश खाडे, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार, दोन्ही जिल्हाध्यक्ष, महापालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक, भाजपचे ग्रामीण पदाधिकारी या सर्वांनी प्रदेशाध्यक्षांचा दौरा सायंकाळपर्यंत सुफळ संपूर्ण केला. बाईक रॅली, भावे नाट्य मंदिरातील मेळाव्यास गर्दी करून शक्तिप्रदर्शन करीत या सर्वांनी एकीचे दर्शन घडवले.

सकाळपासून सुरू झालेल्या या दौऱ्यात प्रदेशाध्यक्षांनी पत्रकार बैठक, तसेच मेळाव्यातही गटा-तटाचा वारंवार उल्लेख केला. २०१४ मध्ये राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या वजनदार नेत्यांची मांदियाळी आहे. याच नेत्यांचे पक्षावर वर्चस्व असल्याचेही दिसते. त्यामुळे जिल्ह्यात भाजपसाठी खस्ता खाऊन वर्षानुवर्षे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याला दूरच ठेवले जात आहे. त्याची खंत या निष्ठावंतांना असली, तरी त्यांची दखलही घेतली जात नाही, हे उघड आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी अशा काही निष्ठावंतांनी बैठक घेऊन जाहीरपणे नाराजी व्यक्तही केली होती. सध्या असा एक गटही पक्षात आहे. याशिवाय आयात केलेल्या नेत्यांमध्येही गटबाजी आहे, याची जाणीव असल्यामुळे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी गटा-तटाचे राजकारण खपवून घेणार नाही, गटबाजी करणाऱ्यांना पक्षात थारा नाही, असा मेळाव्यात जाहीरपणे इशारा देताना नेत्यांचे कान टोचले आहेत.

खासदार विरुद्ध सर्व

भाजपकडून सलग दुसऱ्यांदा संधी मिळालेले खासदार संजय पाटील यांचे जिल्ह्यातील भाजप नेत्यांशी फारसे सलोख्याचे संबंध नाहीत, हे उघड आहे. लोकसभेला संजयकाकांना मदत करूनही विधानसभेला त्यांनी पाठ फिरवल्याचा राग भाजपच्या नेत्यांना आहे. जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, विलासराव जगताप, अजितराव घोरपडे, आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी त्यांचे सख्य नाही. तसेच पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याशीही अधून-मधून कुरघोड्या सुरू असतात.

वरवरचे मनोमीलन

गोपीचंद पडळकर आणि संजयकाका यांच्यात काही दिवसांपूर्वी जाहीरपणे गळाभेट होऊन मनोमीलन झाल्याचे दिसून आले. तसेच विलासराव जगताप, सुरेश खाडे यांच्याशीही त्यांचे अधून-मधून मनोमीलन होत असते. पण पृथ्वीराज देशमुख यांच्यासोबत तितकेसे सख्य झालेले नाही, अशी भाजपमध्येच कुजबूज आहे.

ग्रामपंचायतीचा वादा

जिल्ह्यात ४५२ ग्रामपंचायतींसाठी रणधुमाळी सुरू झाली आहे. त्याचा धागा पकडून प्रदेशाध्यक्षांसमोर या नेत्यांनी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीसाठी दावा केला आहे. त्यामुळे या नेत्यांमधील मनोमीलन कितपत झाले आहे, हे ग्रामपंचायतीच्या निकालावरून दिसून येईल. थेट सरपंच निवड असल्याने भाजपचे किती सरपंच निवडून येतात, त्यावरून या नेत्यांची ताकद मोजली जाईल. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मेळाव्यात गटबाजीचा इशारा दिल्यामुळे त्यांची मात्रा किती लागू झाली, हे या निवडणुकीनंतरही स्पष्ट होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com