रोटेशन पद्धतीने होणार कांदालिलाव

दत्ता इंगळे
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

आपला कांदा सकाळी दहापर्यंत नेप्ती बाजारात विक्रीसाठी आणून मापाड्याकडून वजन करून तत्काळ काटापट्टीची एक प्रत ताब्यात घ्यावी. यामुळे अडते, व्यापारी व शेतकरी यांच्यात संशयाचे वातावरण राहणार नाही, असे संचालक हरिभाऊ कर्डिले, दिलीप भालसिंग व संतोष म्हस्के यांनी सांगितले. 

नगर तालुका ः तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात अडते, व्यापारी, हमाल, मापाडी व बाजार समितीचे कर्मचारी यांनी एकत्रितपणे रोटेशन पद्धतीने कांदालिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. आज बाजार समितीच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सभापती विलास शिंदे व उपसभापती रेवण चोभे यांनी ही माहिती दिली. 

अन्य बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव कशाप्रकारे चालतात, त्यात येणाऱ्या अडचणींबाबत नेवासे, घोडेगाव, राहुरी येथील बाजार समित्यांना भेटी देऊन कामकाजाची पद्धत समजून घेतली. त्यानुसार नेप्ती उपबाजारातील कांदा बाजारामध्ये उद्या (शनिवारी) रोटेशन पद्धतीने कांदालिलाव होणार आहेत. 

आपला कांदा सकाळी दहापर्यंत नेप्ती बाजारात विक्रीसाठी आणून मापाड्याकडून वजन करून तत्काळ काटापट्टीची एक प्रत ताब्यात घ्यावी. यामुळे अडते, व्यापारी व शेतकरी यांच्यात संशयाचे वातावरण राहणार नाही, असे संचालक हरिभाऊ कर्डिले, दिलीप भालसिंग व संतोष म्हस्के यांनी सांगितले. 

नेप्ती बाजारात सुमारे 80 अडते व शंभरावर कांदाव्यापारी परवानाधारक आहेत. कांद्याच्या आवक-जावकेनुसार त्यांची संख्या कमी-जास्त होऊ शकते. शक्‍यतो लिलाव सुरू असताना कांदाउत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित असणे अपेक्षित आहे.

या सर्व प्रक्रियेवर बाजार समितीचे संचालक देखरेख ठेवतील. स्वतःच्या अडतीवर अडत्याला बोली लावता येणार नाही, असा दावा बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांनी केला आहे. 

अशी आहे रोटेशन पद्धत 
नेप्ती बाजार समितीतील सर्व अडत्यांना चार गटांत विभागले जाणार आहे. एका वेळी एकाच गटातील अडतींवर लिलाव सुरू होतील. त्यानंतर दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या, अशा क्रमाने बोली लावली जाईल. असे केल्याने व्यापाऱ्यांमध्ये माल घेण्यासाठी स्पर्धा होईल. पूर्वी आपापल्या सोईनुसार लिलाव व्हायचे. कधी कधी एकाच वेळी बोली लावली जायची. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये विभाजन व्हायचे आणि जास्त स्पर्धा न झाल्याने वाटेल त्या भावात कांदा खरेदी केला जायचा. म्हणजेच भाव पडायचे. आता स्पर्धेमुळे सर्व व्यापाऱ्यांना सर्व अडतींवर लिलावात भाग घेता येईल. या पद्धतीला "रोटेशन' म्हणतात. नेवासे तालुक्‍यातील घोडेगाव बाजार समितीत ही पद्धत अवलंबिली जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Change in auction onion market