सांगली जिल्हा परिषदेतील सत्ताबदलासाठी 'यांच्याकडे' सुत्रे

सकाळ वृत्तसेवा
Monday, 16 December 2019

जिल्हा परिषदेतील सावळज गटाच्या रिक्त जागेवर राष्ट्रवादीच्या सागर चंद्रकांत पाटील यांनी मोठा विजय मिळवला. त्यानिमित्त राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांनी श्री. नाईक यांची भेट घेतली. भेटीचे निमित्त सावळजच्या विजयाचे असले तरी छुपा अजेंडा जिल्हा परिषदेतील सत्ताकारणाचा होता.

सांगली - जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाला धक्का देऊन ‘राष्ट्रवादी’च्या नेतृत्वाखालील काँग्रेस, शिवसेना, रयत विकास आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मोट बांधण्याची प्राथमिक सूत्रे शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. त्याबाबत काँग्रेसचे प्रतोद जितेंद्र पाटील, ‘राष्ट्रवादी’चे विरोधी पक्षनेते शरद लाड यांनी काल (ता. १४) शिराळा येथे आमदार नाईक यांची भेट घेऊन प्राथमिक चर्चा केली. 

जिल्हा परिषदेतील सावळज गटाच्या रिक्त जागेवर राष्ट्रवादीच्या सागर चंद्रकांत पाटील यांनी मोठा विजय मिळवला. त्यानिमित्त राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांनी श्री. नाईक यांची भेट घेतली. भेटीचे निमित्त सावळजच्या विजयाचे असले तरी छुपा अजेंडा जिल्हा परिषदेतील सत्ताकारणाचा होता. जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी ओबीसी महिला संवर्गासाठी आरक्षण पडले आहे. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखालील सत्ता आली तर सहाजिकच राष्ट्रवादीच्या सदस्या अश्‍विनी नाईक यांचा त्यावर दावा असेल. राष्ट्रवादीकडून ते एकमेव नाव आहे. त्या शिराळ्याच्या असून, मानसिंगराव नाईक समर्थक आहेत. त्यामुळे मानसिंगरावांनीच या घडामोडीत पहिल्या टप्प्यात बांधणी करावी, यावर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सदस्यांचे एकमत झाले आहे. त्यानुसार या हालचाली आता गतीमान झाल्या आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा अर्थमंत्री जयंत पाटील यांनी मानसिंगराव नाईक यांच्याशी प्राथमिक चर्चा केली आहे. जिल्हा परिषदेतील सत्तेसाठीच्या गणिताची मांडणी करून घ्या, साऱ्यांशी बोला, अधिवेशनानंतर बैठक घेऊ, अशी सूचना केल्याचे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात आले. 

हेही वाचा - चित्री प्रकल्पात मोटार कोसळली अन्... 
 

विशाल पाटील मिरज पंचायतीत व्यस्त

काँग्रेसचे युवा नेते विशाल पाटील यांनी जिल्हा परिषद घडामोडीत लक्ष घातलेले नाही. ते मिरज पंचायत समितीच्या सत्ताकारणात व्यस्त आहेत. पुन्हा एकदा येथे काँग्रेस-‘राष्ट्रवादी’चे गणित जुळवण्याची त्यांची तयारी सुरू आहे. जिल्हा परिषदेत थेट त्यांचे समर्थक म्हणता येतील, असे सदस्य नसल्याने त्यांनी तिकडे फारसे लक्ष दिलेले नाही. त्यांनी ‘मी जिल्हा परिषदेबाबत काही विचार केलेला नाही’, असे स्पष्ट केले. 

हेही वाचा - रत्नागिरी नगराध्यक्षपदासाठी ही आहे मॅजिक फिगर 

राज्यस्तरावरील प्रयोग सांगलीसाठी मार्गदर्शक

होय, आम्ही मानसिंगराव नाईक यांच्याशी प्राथमिक चर्चा केली आहे. ते चर्चेत पुढाकार घेत आहेत. लवकरच या प्रक्रियेला गती येईल. राज्‍यस्‍तरावर झालेला प्रयोग सांगलीसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.
- शरद लाड, विरोधी पक्षनेते, जिल्हा परिषद


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Change In Power Of Sangli ZP Mansingrao Naik Formula