देशात सत्तांतर होणार - पवार 

देशात सत्तांतर होणार - पवार 

सातारा - देशामध्ये परिवर्तनासाठी सोयीची व अनुकूल परिस्थिती आहे. पंतप्रधानपदापेक्षा परिवर्तनाला समर्थन देणारे सर्व घटक एक करून पाच वर्षे स्थिर सरकार देण्याला माझे प्राधान्य असल्याचे सांगत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज देशात सत्तांतर होणार असल्याचे सूतोवाच केले. 

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमानंतर रयत शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देशातील सध्याचे वातावरण पाहता महाराष्ट्राला पंतप्रधानपदाची संधी मिळेल का, असा प्रश्‍न श्री. पवार यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, ""पंतप्रधानपदाची संधी कोणत्या राज्याला मिळेल, कोणाला मिळेल, हा भाग सध्या आमच्या आघाडीच्या दृष्टीने गौण आहे. प्रथम आम्हाला परिवर्तन हवे आहे. परिवर्तनासाठी पोषक वातावरण आहे की नाही, हा खरा प्रश्‍न आहे. मला स्वत:ला असे जाणवत आहे, की देशात परिवर्तनासाठी सोयीची अशी अनुकूल परिस्थिती आहे. त्यासाठी परिवर्तनाला समर्थन देणाऱ्या सर्व घटक पक्षांना एकत्र करून त्यांच्यात एकवाक्‍यता घडवून आणणे महत्त्वाचे आहे. जोपर्यंत ही प्रक्रिया होत नाही, तोपर्यंत पंतप्रधान कोण, याची चर्चासुद्धा केली जाणार नाही. आम्हाला पहिल्यांदा बहुमत करून देशातील जनतेला पाच वर्षे स्थिर सरकार द्यायचे आहे. 

दुष्काळाचे गांभीर्य नाही 
दुष्काळाच्या कामासाठी आचारसंहितेची कोणतीही अडचण येत नाही. मी स्वत: अशा परिस्थितीत काम केले आहे. मागील दुष्काळावेळी आम्ही ऑक्‍टोबर, नोव्हेंबरपासून उपाययोजनांना सुरवात केली. परंतु, या सरकारने छावण्या उघडण्यासाठी मे उजाडला आहे. तातडीने निर्णय घेतले नाहीत. जे घेतले ते वास्तवापासून दूर आहेत. चाऱ्याचे दर विचारात घेता 90 रुपयांत जनावराचे कसे भागणार? आम्हाला दुष्काळाचे राजकारण करायचे नाही; परंतु सरकारने गांभीर्याने निर्णय घ्यावेत, एवढीच अपेक्षा आहे. टॅंकरही पुरेशा प्रमाणात दिले जात नाहीत. त्यासाठी केवळ सरकारवर अवलंबून न राहता आम्ही माण व खटाव तालुक्‍यांत प्रभाकर देशमुख यांच्या समन्वयाने 50 टॅंकर देणार आहे. संस्था व व्यक्तींनी आपल्या परीने दुष्काळग्रस्तांसाठी मदत करावी, असे आवाहनही श्री. पवार यांनी केले. 

राजीव गांधींवरील टीका अयोग्य 
माजी पंतप्रधान राजीव गांधी आज हयात नाहीत. ज्या कुटुंबातील दोन व्यक्ती देशाच्या पंतप्रधान झाल्या, त्यांच्या हत्या झाल्या. एवढा मोठा त्याग देशासाठी केलेल्यांबद्दल अशी भाषा वापरणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शोभत नाही. पंतप्रधान हे महत्त्वाचे पद आहे. त्या पदावरील व्यक्तीने अधिक काळजी घ्यायची असते. अशा प्रकारची भाषणे मोदींकडून केली जातात, हे चांगले लक्षण नाही, असे श्री. पवार म्हणाले. 

राज्यात मोठा आकडा गाठू 
पाच वर्षांपूर्वी निवडणुका झाल्या, त्यावेळी आम्हाला सहा जागा मिळाल्या होत्या. या वेळी त्यात फार सुधारणा होणार आहे. राज्यात आघाडीच्या जागांचा आकडा मोठा असेल. काही ठिकाणी यश मिळेल; पण मताधिक्‍य कमी असेल. तर, काही ठिकाणी मोठ्या मताधिक्‍याने जागा येतील. देशातही आघाडीला जास्त जागा मिळतील, असे सांगतानाच साताऱ्याची जागा नक्की मिळेल. केवळ मताधिक्‍य किती, हा प्रश्‍न असल्याचे ते म्हणाले. 

ईव्हीएमबाबत चिंता 
गुजरात व हैदराबाद येथील व्यक्तींनी माझ्यासमोर इव्हीएम मशिन ठेवत बटन दाबायला लावले. त्या वेळी राष्ट्रवादीचे बटन दाबल्यावर कमळाला मत मिळत असल्याचे दिसले. हे मी प्रत्यक्षात पाहिले आहे. त्यामुळे मला या प्रक्रियेची काळजी वाटत असल्याचा पुनरुच्चार श्री. पवार यांनी आज केला. त्यामुळेच आम्ही न्यायालयात गेलो. 5 ऐवजी 50 टक्के मते मोजली जावीत, अशी विनंती केली. दुर्दैवाने आमची मागणी न्यायालयाने फेटाळली, असे ते म्हणाले. 

लोकांमध्ये गेल्यावर मिळते ऊर्जा 
निवडणुकांमध्ये 78 सभा केल्या. त्यानंतर लगेच दुष्काळ दौरा. काल पंजाबमध्ये, आज साताऱ्यात. एवढे पळण्यामागे ऊर्जा कोणती, या प्रश्‍नावर बोलताना श्री. पवार म्हणाले, ""आम्ही आज जे काही आहोत, ते लोकांच्यामुळेच. त्यांच्यात गेल्यावरच मला ऊर्जा मिळते. आज लोकांची बिकट अवस्था आहे. अशा परिस्थितीत त्यांच्याकडे गेलो नाही, त्यांच्या अडचणी सोडविल्या नाहीत, तर आमच्यासारखे नतद्रष्ट कोणी नसेल.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com