सांगलीतील शासकीय रुग्णालयात रुग्णांसाठी गरमागरम चपात्या (व्हिडिआे)

संतोष भिसे
बुधवार, 12 डिसेंबर 2018

सांगली - शासकीय रुग्णालयातील रुग्णांना आता यंत्राने  तयार केलेल्या चपात्या खायला मिळणार आहेत. त्यांना गरम चपात्या मिळाव्यात आणि स्वयंपाकघरातील कर्मचाऱ्यांवरील ताण कमी व्हावा, यासाठी येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात स्वयंचलित चपाती यंत्र बसवले आहे. खासदार संजय पाटील यांनी उद्‌घाटन केले. 

सांगली - शासकीय रुग्णालयातील रुग्णांना आता यंत्राने  तयार केलेल्या चपात्या खायला मिळणार आहेत. त्यांना गरम चपात्या मिळाव्यात आणि स्वयंपाकघरातील कर्मचाऱ्यांवरील ताण कमी व्हावा, यासाठी येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात स्वयंचलित चपाती यंत्र बसवले आहे. खासदार संजय पाटील यांनी उद्‌घाटन केले. 

कणीक मळणे, तिचे गोळे बनवणे आणि चपात्या लाटून भाजणे अशी कामे करणारी तीन स्वतंत्र यंत्रे बसवली आहेत. या संचाची एकूण किंमत तेरा लाख रुपये आहे. एका बाजुला कणकेचे गोळे टाकल्यानंतर दुसऱ्या बाजूने भाजून तयार गरमागरम चपाती मिळते. सरासरी तीस सेकंदाला एक चपाती बाहेर पडते; म्हणजे तासाला साडेतीन हजार चपात्या मिळू शकतात. 

रुग्णालयाची सकाळी व संध्याकाळची सध्याची दररोजची मागणी सुमारे दोन हजार चपात्या इतकी आहे. यापुर्वी महिला कर्मचारी हा चपात्यांचा ढिग लावायच्या. संपुर्ण स्वयंपाकात चपात्या बनवणे हीच वेळखाऊ प्रक्रिया होती. रुग्णांना गरमागरम चपात्या देईपर्यंत प्रशासनाची धावपळ व्हायची. स्वयंचलित यंत्रामुळे हे काम आता हलके झाले आहे. 

पुण्याहून मागवलेले हे यंत्र विजेवर चालते. कणकेचे गोळे टाकण्यासाठी कप्पा, चपाती लाटण्यासाठी रोलर, ती भाजण्यासाठी तिहेरी थरांची चेन असे त्याचे मुख्य भाग आहेत. गोळा टाकल्यानंतर रोलरमध्ये सरकतो. तेथे लाटून चपाती तयार होते. ती गॅसच्या ज्वालेवर गरम झालेल्या चेनवर पडते. एका बाजुने भाजल्यानंतर दुसऱ्या बाजुसाठी खालील चेनवर पडते. तेथे भाजून झाल्यानंतर सर्वांत तळाच्या चेनवर थेट जाळावर भाजली जाते. शिर्डीसारख्या काही मोठ्या देवस्थानांतील स्वयंपाकघरांत चपाती तयार करणारी मोठ-मोठी यंत्रे आहेत; त्यांचे लघुरुप सिव्हीलमध्ये बसवले आहे. रुग्णांना दररोज डायेटनुसार दोन चपात्या, भाजी, पातळ आमटी व भात दिला जातो. 

आंतररुग्ण विभागात डायेटनुसार वेगवेगळ्या संख्येने चपात्यांची मागणी असते. सकाळी व संध्याकाळी एकेक हजार चपात्या यंत्रातून पुरवल्या जातात. त्या तयार झाल्यानंतर लगेच वॉर्डात नेल्या जात असल्याने रुग्णांना गरमा-गरम चपात्या मिळतात. दररोजची वाढती रुग्णसंख्या पाहता या यंत्राची गरज होती. भविष्यात मिरज सिव्हीलमध्येही ते बसवण्याचा विचार होईल'. 
- डॉ सुबोध उगाणे,
अधिक्षक. 

Web Title: Chapati Preparation Machine in Sangli Civil Hospital