'जेमस्टोन'मधील दुकान गाळ्यांचे आमिष दाखवून व्यापाऱ्याला गंडा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 November 2019

या प्रकरणी आशा श्रीचंद कुकरेजा, सूर्यकांत श्रीचंद कुकरेजा, अन्वेशा श्रीचंद कुकरेजा, जयप्रकाश श्रीचंद कुकरेजा (चौघेही रा. नेरूळ), जयकिशन गुमानसिंग मूलचंदानी (नवी मुंबई), सुजितकुमार दीनानाथ राय (बेलापूर), हरिराम राजाराम कुकरेजा (उल्हासनगर), अशोक राजाराम कुकरेजा, दीपक राजाराम कुकरेजा (दोघेही नेरूळ, नवी मुंबई), महेश राजाराम कुकरेजा (सानपाडा, नवी मुंबई) यांच्यावर गुन्हा दाखल केला. 

गांधीनगर ( कोल्हापूर ) - जेमस्टोन व्यापारी संकुलातील गाळे विकत देतो, असे सांगून कर्जाऊ रक्कम घेऊन ४ कोटी ११ लाख ५६ हजार ६५६ रुपयांची फसवणूक केल्या तक्रार व्यापारी सुरेश भगवानदास आहुजा (सिद्धिविनायक क्‍लासिक अपार्टमेंट, हिंमत बहादूर परिसर, ताराबाई पार्क) यांनी गांधीनगर पोलिस ठाण्यात दिली. ही फसवणूक भारत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स भारत उद्योग लिमिटेड (पूर्वीची जयहिंद कॉन्ट्रॅक्‍ट लि.) कंपनीचे अध्यक्ष श्रीचंद राजाराम कुकरेजा आणि करुर वैश्‍य बॅंकेचे अधिकारी यांनी संगनमताने केली असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून गांधीनगर पोलिस ठाण्यात कुकरेजा यांच्यासह १३ जणांवर गुन्हा दाखल केला.

या प्रकरणी आशा श्रीचंद कुकरेजा, सूर्यकांत श्रीचंद कुकरेजा, अन्वेशा श्रीचंद कुकरेजा, जयप्रकाश श्रीचंद कुकरेजा (चौघेही रा. नेरूळ), जयकिशन गुमानसिंग मूलचंदानी (नवी मुंबई), सुजितकुमार दीनानाथ राय (बेलापूर), हरिराम राजाराम कुकरेजा (उल्हासनगर), अशोक राजाराम कुकरेजा, दीपक राजाराम कुकरेजा (दोघेही नेरूळ, नवी मुंबई), महेश राजाराम कुकरेजा (सानपाडा, नवी मुंबई) यांच्यावर गुन्हा दाखल केला. 

हेही वाचा - कोल्हापुरातील या साखर कारखान्यांचे रोखले गाळप परवाने 

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत बिल्डर्सने कोल्हापुरातील महापालिकेच्या मालकीची मध्यवर्ती बसस्थानकाजवळील सि.स.नं.५१७/२ ही मिळकत विकसित करण्यासाठी ९९ वर्षांच्या कराराने भाडेपट्ट्याने घेतली. कंपनीने मिळकतीवर ‘जेमस्टोन’ नावाचे व्यापारी संकुल उभारले. त्यासाठी करूर वैश्‍य बॅंकेकडून कर्ज घेतले. दरम्यान, आर्थिक अडचण आल्याने मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या सुरेश भगवानदास आहुजा या व्यापाऱ्यांकडून भारत बिल्डर्सचे चेअरमन व कार्यकारी संचालक श्रीचंद कुकरेजा यांनी २५ लाख रुपये घेतले. त्याची परतफेड करण्यासाठी श्रीचंद कुकरेजा यांनी जेमस्टोनच्या पहिल्या मजल्यावरील दुकान गाळे विकत घेण्यास सांगितले. ते मान्य करत हा व्यवहार एक कोटी ७० लाखाला ठरविला व ही रक्कम चेकने अदा केली. नंतर हे दुकान गाळे लिहून देण्यास कुकरेजा टाळाटाळ करू लागले. चौकशी केली असता या इमारतीवर करूर वैश्‍य बॅंकेचे कर्ज असल्याचे समजले. ते फेडण्यासाठी कुकरेजा यांनी जेमस्टोनमधील उर्वरित दुकान गाळे घेण्यास सांगितले व त्या बदल्यात त्यांच्या नावावरील करूर वैश्‍य बॅंकेच्या कर्ज खात्यावर रक्कम भरण्यासाठी सांगितले. ही रक्कम भरल्यानंतर पूर्वी ठरलेले दुकान गाळे व उर्वरित गाळ्यांची ना हरकत बॅंकेकडून घेऊन तुम्हाला देतो, असे आश्वासन श्रीचंद कुकरेजा व सूर्यकांत कुकरेजा यांनी आहुजा यांना दिले.

पहिल्या मजल्यावरील गाळ्यांचा ना हरकत दाखला

गाळे हस्तांतर करण्यासाठी महापालिकेकडे १९ लाख ८२ हजार ६५६ रुपये भरण्यासही सांगितले. शिवाय नवीन गाळ्यांची रक्कम करूर वैश्‍य बॅंकेच्या गहाण कर्ज खात्यावर भरा, असे कुकरेजा यांनी आहुजा यांना सांगितले. बॅंकेत अधिक चौकशी केली असता शाखाधिकारी जैना यांनी सांगितले की, तुम्ही कर्ज रक्‍कम भरल्यानंतर ना हरकत देऊ. त्यांच्यावर विश्वास ठेवून कंपनीच्या कर्ज खात्यावर ४ कोटी ११ लाख ५६ हजार ६५६ रुपये चेक व आरटीजीएसद्वारे जमा केले. त्यानंतर आहुजा यांनी श्रीचंद कुकरेजा यांना बॅंकेकडून ना हरकत दाखला घेण्यासाठी सांगितले. बॅंकेचे शाखाधिकारी जैना यांनी पहिल्या मजल्यावरील गाळ्यांचा ना हरकत दाखला दिला व उर्वरित गाळ्यांचा ना हरकत दाखला तीन-चार दिवसांत देतो, असे सांगितले. 

कंपनीवर २२ कोटींचे कर्ज ना हरकत दाखला देण्यास नकार

दरम्यान, कुकरेजा यांनी पाच गाळे खरेदी दिले; पण उर्वरित गाळ्यांचा ना हरकत दाखला बॅंकेकडून मिळाला नाही. त्यासाठी आहुजा यांनी कुकरेजा यांच्याकडे संपर्क साधूनही ते टाळाटाळ करू लागले. अखेर आहुजा बॅंकेत गेले. तेथे नवीन आलेल्या शाखाधिकाऱ्यांनी बॅंकेच्या मुख्य कार्यालयात जाण्यास सांगितले. तेथे कुकरेजा यांच्या कंपनीवर २२ कोटींचे कर्ज असल्याने ना हरकत दाखला देता येत नाही, असे सांगितले. त्यावेळी आहुजा यांना संगनमताने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी याबाबत प्रथमवर्ग न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने गांधीनगर पोलिस ठाण्याला तपासाचे आदेश दिल्याने भारत बिल्डर्स कंपनीच्या संचालकांसह १३ जणांवर गुन्हा दाखल केला. याबाबतची फिर्याद सुरेश आहुजा यांनी दिली आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अतुल कदम करीत आहेत.

हेही वाचा -  नशेत पत्नीचा खून करणाऱ्याला जन्मठेप 

बॅंकेचा सहभाग सिद्ध करण्याचे आव्हान
कुकरेजा आणि करूर वैश्‍य बॅंकेतील अधिकारी यांनी संगनमताने ही फसवणूक केली असल्याचा आरोप आहुजा यांनी केला आहे. मात्र, या फसवणुकीच्या प्रकारात बॅंकेचे अधिकारी आहेत का? हे तपासणे आणि ते सिद्ध करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cheating Case Against Shrichand Kukareja In Gandhinagar