इंडोनेशियात बोलावून काढून घेतले पैसे आणि पासपोर्ट!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

रोहित रामचंद्र बनसोडे (वय 27, रा. सन सिटी दमाणीनगर, सोलापूर) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो सध्या मुंबईत खासगी नोकरी करत आहे. शर्मा, सिमरनजीत सिंग व त्यांची पत्नी डिना अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी रोहितच्या फेसबुकवर नोकरीची खोटी जाहिरात दिली.

सोलापूर : इंडोनेशियात जहाजावर इंजिनिअर म्हणून नोकरीस लावतो, असे म्हणून सोलापूरच्या मरीन इंजिनिअर तरुणाची फसवणूक झाली आहे. त्याला इंडोनेशियात बोलावून घेऊन त्याच्याकडील पैसे आणि पासपोर्ट काढून घेतले होते. याप्रकरणी फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रोहित रामचंद्र बनसोडे (वय 27, रा. सन सिटी दमाणीनगर, सोलापूर) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो सध्या मुंबईत खासगी नोकरी करत आहे. शर्मा, सिमरनजीत सिंग व त्यांची पत्नी डिना अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी रोहितच्या फेसबुकवर नोकरीची खोटी जाहिरात दिली. इंडोनेशियात जहाजावर इंजिनियर पाहिजे असे सांगितले. नोकरीचे आमिष दाखवून याआधी दोन मुलांना नोकरी लावल्याचे कळविले. रोहितने खात्री करण्यासाठी त्या मुलांच्या व्हॉट्‌सऍपवर चॅट करून माहिती घेतली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारी संकेतस्थळावर जाऊन खात्री केली. दोन्ही मुलांचे अपडेट मिळाल्याने रोहितची खात्री पटली. त्यानुसार 2 एप्रिल 2019 रोजी रोहित विमानाने इंडोनेशियातील जकार्ता येथे पोचला. आरोपींनी त्याला तेथील हॉटेलात बोलावले. आरोपींनी साथीदारामार्फत नोकरीसाठी रोहित बनसोडे यांच्याकडून 300 ते 400 युएसडी डॉलर घेतले. नोकरी हवी असेल तर आणखीन पैसे द्यावे लागतील असे सांगितले. रोहितने सोलापुरात राहणाऱ्या आई-वडिलांशी संपर्क करून त्यांच्या बॅंक खात्यामधून एक लाख दहा हजार रुपये ऑनलाइन आरोपींना पाठवून दिले. 

3 एप्रिल रोजी रोहितला आपली फसवणूक झाल्याचे ईमेलच्या माध्यमातून कळाले. फसवणुकीची खात्री झाल्यानंतर त्याने आरोपींना संपर्क केला. पैसे आणि पासपोर्टची मागणी केली. त्यांनी टाळाटाळ केल्यानंतर रोहितने इंडोनेशियातील पोलिसांकडे तक्रार केली. शर्मा व त्याचे साथीदार हे गुन्हेगारी स्वरूपाचे असल्याचे समजले. आधीच्या गुन्ह्यांची माहिती दिली. त्यांनी रोहितला भारतीय दुतावासाकडे पाठविले. त्यांच्या मदतीने 10 एप्रिल रोजी रोहित भारतात परत आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय साळुंखे तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cheating case filed in Solapur