फेक कॉल करणाऱ्या हॅकर्सवर बूमरॅंग! 

अशोक मुरूमकर
रविवार, 4 ऑगस्ट 2019

तुम कितने खाते ब्लॉक करेंगे? 
अमित यांनी हॅकर्सची माहिती हाती येताच पडताळणी केली आणि हे खाते ब्लॉक करत असल्याचे सांगितले. त्यावर त्याने पुन्हा "तुम अकाउंट ब्लॉक करोगे, मेरे पास ऐसे दस अकाउंट है,' असे सांगितले. तेव्हा अमित म्हणाले, "या नावाने तू खाते वापरू व खोलू शकणार नाहीस. केवायसीच्या आधारे तुझी सर्व खाती ब्लॉक करणार आहे. तुझा हा खेळ एक दिवस संपणार आहे.' मग काहीही न बोलता हॅकर्सने फोन बंद करून यातून माघार घेतली.

सोलापूर : वेळ सकाळी अकराची... फोनची रिंग खणाणते.., "अभिनंदन अमित!, तुम्हाला फ्लिपकार्टकडून कार लागली आहे. थोड्याच वेळात ती तुमच्या दारात येईल. मात्र त्यासाठी काही प्रोसेस फॉलो करावी लागतील', असे सांगितले जाते. तोच आनंद झाल्याचे दाखवत अमितने त्याला मागेल ती माहिती देऊन त्याच्यावरच बूमरॅंग उलटवला. अमित म्हणजे दुसरे कोणी नव्हते, तर ते होते बॅंकेचेच मॅनेजर! 

बॅंकेतून बोलत असल्याचे सांगून फसवणूक केल्याच्या घटना आपण अनेक ऐकल्या आहेत. असे कॉल फक्‍त सर्वसामान्य, ग्रामीण भागातील नागरिकांनाच येतात असं नाही, तर बॅंकेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांनाही येतात. असाच कॉल करमाळ्यातील बॅंक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापक अमित कुमार यांना आला होता. त्यांनी विचारलेली माहिती देत हॅकर्सला विश्‍वासात घेतले आणि त्याच्याकडूनही व्हेरिफिकेशनसाठी म्हणून माहिती घेतली. पैसे मिळणार या आशेने फेक कॉल करणाऱ्याने त्यांना माहिती दिली. 

हॅकर्सने अमित कुमार यांना फ्लिपकार्डमधून बोलत असल्याचे सांगितले. त्यानंतर तो म्हणाला, "क्रेडिट कार्डवरून तुम्ही खरेदी केली होती. त्याची तुम्हाला डिलिव्हरी मिळाली आहे का? त्यात कंपनीकडून 15 हजार 999 ग्राहकांमधून तुमची निवड झाली आहे. तुम्हाला कार लागली आहे. तुम्हाला कार पाहिजे आहे की, त्याचे पैसे? पाच मिनिटे 46 सेकंदात तुम्हाला कार किंवा त्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील'. त्यावर अमित म्हणाले, "मला कार हवी आहे. त्यावर हॅकर्सने पत्ता चेक करण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन व्हॉट्‌सऍपवर पाठवण्यास सांगितले. त्यावर त्यांचा पत्ता बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेचा असल्याचे हॅकर्सच्या लक्षात आले. त्यानंतर अमित यांनी "मी त्याच्या बाजूला नोकरी करतो,' असे सांगत वेळ मारून नेली. पुढे हॅकर्सने त्यांना खात्यात 25 हजार रुपये टाकण्यास सांगितले. त्यावर अमित यांनी मला "ऑनलाइन पैसे पाठवायला येत नाहीत. मी तुमच्या खात्यात टाकतो,' असे सांगत खाते क्रमांक, आयएफसी कोड, आधार, आयडेंटी व पॅन कार्ड मागितले. तोच व्यवस्थापकाने त्याला, "केवायसीच्या आधारे तुझे सर्व अकाउंट ब्लॉक करत आहे,' असे हॅकर्सला सांगितले. 

तुम कितने खाते ब्लॉक करेंगे? 
अमित यांनी हॅकर्सची माहिती हाती येताच पडताळणी केली आणि हे खाते ब्लॉक करत असल्याचे सांगितले. त्यावर त्याने पुन्हा "तुम अकाउंट ब्लॉक करोगे, मेरे पास ऐसे दस अकाउंट है,' असे सांगितले. तेव्हा अमित म्हणाले, "या नावाने तू खाते वापरू व खोलू शकणार नाहीस. केवायसीच्या आधारे तुझी सर्व खाती ब्लॉक करणार आहे. तुझा हा खेळ एक दिवस संपणार आहे.' मग काहीही न बोलता हॅकर्सने फोन बंद करून यातून माघार घेतली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cheating case in Solapur