सातारा : इको गणपती कार्यशाळेत रंगले बालचमू (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

कोणी सिंहासनावर आरूढ झालेला, तर कोणी नागावर आरूढ झालेला... कोणी ऐटीत बसून आशीर्वाद देणारा अशा वेगवेगळ्या रूपातील आणि आकारातील शाडू मातीपासून विद्येची देवता गणेशाची मूर्ती साकारात महाराजा सयाजीराव विद्यालयातील विद्यार्थी इकोफ्रेंडली गणेशमूर्ती कार्यशाळेत रंगून गेले. "सकाळ एनआयई'च्या वतीने आयोजिलेली कार्यशाळा उत्साहात झाली. 

सातारा : कोणी सिंहासनावर आरूढ झालेला, तर कोणी नागावर आरूढ झालेला... कोणी ऐटीत बसून आशीर्वाद देणारा अशा वेगवेगळ्या रूपातील आणि आकारातील शाडू मातीपासून विद्येची देवता गणेशाची मूर्ती साकारात महाराजा सयाजीराव विद्यालयातील विद्यार्थी इकोफ्रेंडली गणेशमूर्ती कार्यशाळेत रंगून गेले. "सकाळ एनआयई'च्या वतीने आयोजिलेली कार्यशाळा उत्साहात झाली. 

जल्लोषात उत्सव साजरा करतानादेखील पर्यावरणाचे जतन कसे करता येईल, हे या छोट्या दोस्तांनी शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती तयार करून दाखवून दिले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मुक्‍त व्यासपीठ उपलब्ध व्हावे, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण प्रेम रुजावे, त्यांच्यात निसर्गाची ओढ निर्माण व्हावी आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा प्रसार व्हावा, यासाठी सकाळ एनआयईच्या वतीने येथील महाराजा सयाजीराव विद्यालयात आज इको फ्रेंडली गणपती कार्यशाळा आयोजिली होती. या कार्यशाळेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यशाळेत सुमारे 600 विद्यार्थ्यांनी सुंदर मूर्ती तयार केल्या. त्यांना प्रशिक्षक किरण कुंभार, अजय लोहार आणि कला शिक्षक प्रदीप कुंभार आणि त्यांच्या सहकारी शिक्षकांनी मूर्ती तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले.

संजय अहिरेकर यांनी उपक्रमाचे नियोजन केले. त्या वेळी रयत शिक्षण संस्थेचे विभागीय अधिकारी कमलाकर महामुनी, प्राचार्य डी. जी. जाधव, सकाळ एनआयईचे समन्वयक विजय सुतार आणि शिक्षक उपस्थित होते. विद्यार्थ्यांना शाडूची माती उपलब्ध करून दिली होती. माती हातात मिळताच विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनेतून मूर्ती साकारण्यास सुरवात केली. माती मळताना तिला आकार देताना विद्यार्थी शाडूच्या मातीत आणि मूर्तींत साकारण्यात रंगून गेले.

स्वत:च्या हातातून गणेशमूर्ती तयार होताना बालचमू हरखून जात होता. त्यामध्ये कोणी सिंहासनावर आरूढ, तर कोणी नागावर आरूढ असलेल्या गणेशमूर्ती बनविल्या. या कार्यशाळेविषयी समाधान व्यक्‍त करतानाच या मूर्तीच गणेशोत्सवात घरी स्थापन करण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chidrens Involved in Eco Ganapati workshop in Satara