मुद्रा योजनेचे ऑडिट होणार - फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 ऑक्टोबर 2018

सांगली -जिल्ह्यातील मुद्रा योजनेच्या कर्जवाटपाबाबत लाभार्थीनिहाय यादी सर्व बॅंकांनी जिल्हा प्रशासनाला द्यावी. जुन्या कर्जदारांनाच नव्याने लाभ  दिल्या प्रकरणाची चौकशी केली जाईल. योजनेच्या साध्याबाबत शासनामार्फत सर्वंकष ऑडिट केले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  पत्रकार परिषदेत दिली.

सांगली -जिल्ह्यातील मुद्रा योजनेच्या कर्जवाटपाबाबत लाभार्थीनिहाय यादी सर्व बॅंकांनी जिल्हा प्रशासनाला द्यावी. जुन्या कर्जदारांनाच नव्याने लाभ  दिल्या प्रकरणाची चौकशी केली जाईल. योजनेच्या साध्याबाबत शासनामार्फत सर्वंकष ऑडिट केले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  पत्रकार परिषदेत दिली.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ तसेच पंतप्रधानांच्या ‘मुद्रा योजने’चा आढाव्यात बॅंकांच्या कामगिरीबाबत मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. बॅंक अधिकाऱ्यांना खडेबोलही सुनावल्याचे सांगण्यात आले. 

 दैनिक ‘सकाळ’ने मुद्रा आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्जबाबत सडेतोड वृत्त प्रसिद्ध केले आहे. 
‘जुन्या कर्जावरच उठवली ‘मुद्रा’; बेरोजगारांना आधार देणाऱ्या योजनेलाच बॅंकांचा खोडा’ या शीर्षकाखाली विषयाची मांडणी केली होती. ‘सकाळ’ने उपस्थित  केलेला हाच प्रश्‍न जिल्हा आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला. 

जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत, खासगी बॅंकांकडून केलेल्या दुर्लक्षाबाबतच्या तक्रारीचा पाढाच अनेकांनी वाचला.  अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ तसेच पंतप्रधानांच्या ‘मुद्रा योजने’चा आढाव्यात बॅंकांच्या कामगिरीबाबत मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. एका नामांकित बॅंकेने तर अण्णासाहेब पाटील महामंडळाचे एकमेव प्रकरणाला मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांला खडसावले.

माजी आमदार दिनकर पाटील यांच्यासह अनेकांनी मुद्राच्या अंमलबजावणीबाबतचा विषय चर्चेला आणला. मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक बॅंकांनी नोव्हेंबर अखेर उद्दिष्टपूर्तीचे आदेश दिले. जुन्या कर्जाबाबतची खास्त्री करण्यासाठी लाभार्थींची नावे घेवून त्यांची खातरजमाही करु, असेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मुद्रा योजनेसह अण्णासाहेब महामंडळाच्या प्रकरणांबाबत बॅंकांकडून प्रस्तावांच दाखल करुन घेण्यास होणारी टाळाटाळ, उडवाउडवीची उत्तरे, माहितीसाठी अनेक हेलपाटे, प्रस्तावांची न होणारी आवक-जावक नोंदणीबाबत तक्रारी केल्या. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी योजनेचे ऑडीट होईल असे सांगितले.

मुद्राचे लाभार्थी जाहीर होणार...
मुद्रा योजनेतील कर्जदारांची नावे प्रत्येक शाखेच्या नोटीस फलकावर लावावीत, असे मत अनेक तरुणांनी व्यक्त केले होते. यामुळे मुद्राचे खरे लाभार्थी कळतील, अशी मागणी होती. यावर मुख्यमंत्र्यांनी खात्री करण्यासाठी जिल्हा प्रशासन, सरकारला तातडीने लाभार्थी यादी देण्याचे आदेश दिले. त्यामुळे जुन्या कर्जदारांना या योजनेचा लाभ दिल्याचे स्पष्ट होण्यास मदत होणार आहे. 

Web Title: Chief Minister Devandra Phadanvis comment