मुख्यमंत्री घेणार जिल्ह्याची झाडाझडती

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 29 January 2020

मुख्यमंत्री ठाकरे विभाग मुख्यालयाच्या ठिकाणी नगरसह धुळे, नंदुरबार, जळगाव व नाशिक या पाच जिल्ह्यांचा आढावा घेणार आहेत. मुख्यमंत्री ठाकरे संबंधित जिल्ह्यातील मंत्री, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि विविध यंत्रणांचे प्रमुख यांच्याशी चर्चा करणार आहेत.

नगर : नगरसह पाच जिल्ह्यांतील विविध विकास योजनांच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या (गुरुवार) झाडाझडती घेणार आहेत. नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी दहा वाजता बैठक होणार आहे.

हेही वाचा- नाशिकमधील माय-लेकरांचा कार अपघातात मृत्यू 

शुक्रवारी (ता. 31) उपमुख्यमंत्री अजित पवार नियोजन समितीच्या आराखड्याला अंतिम मंजुरी देण्यासाठी नाशिक येथे आढावा बैठक घेणार आहेत. त्यामुळे दोन दिवस जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचा घाम निघणार आहे. 

विभागप्रमुखांची पूर्वतयारी

उद्याच्या (गुरुवार) बैठकीसंदर्भात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध यंत्रणांच्या विभागप्रमुखांची पूर्वतयारी सुरू होती. मुख्यमंत्री ठाकरे विभाग मुख्यालयाच्या ठिकाणी नगरसह धुळे, नंदुरबार, जळगाव व नाशिक या पाच जिल्ह्यांचा आढावा घेणार आहेत. मुख्यमंत्री ठाकरे संबंधित जिल्ह्यातील मंत्री, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि विविध यंत्रणांचे प्रमुख यांच्याशी चर्चा करणार आहेत.

विविध मुद्द्यांवर प्रामुख्याने चर्चा

तीत प्रामुख्याने जिल्हा परिषदांच्या अंतर्गत रस्त्यांची स्थिती, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कामांची सद्यःस्थिती, अपूर्ण जलसिंचन प्रकल्प व प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, कृषिपंपांसाठी पुरेसा वीजपुरवठा, प्रलंबित वीजजोडणीसाठी प्राप्त अर्ज, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येणारी घरे, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना, आरोग्य सुविधा व राष्ट्रीय कार्यक्रम, आदिवासी विकास योजना या मुद्द्यांवर प्रामुख्याने चर्चा होणार आहे. 

नगरच्या पदरात किती निधी पडणार?

मुख्यमंत्री ठाकरे यांची आढावा बैठक झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता. 31) उपमुख्यमंत्री अजित पवार नियोजनाविषयी आढावा बैठक घेणार आहेत. नगर जिल्ह्याचा वार्षिक नियोजन योजनेचा आराखडा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली मंजूर झाला आहे. जिल्हा भौगोलिकदृष्ट्या विस्ताराने मोठा असल्याने 571 कोटींऐवजी 971 कोटी रुपये मिळावेत, अशी मागणी मुश्रीफ यांनी केली आहे. अजित पवार यांच्याकडेच महाविकास आघाडी सरकारची तिजोरीची चावी आहे. त्यामुळे नाशिक येथील बैठकीत नगरच्या पदरात किती निधी पडणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Chief Minister will interact with the officers