नाशिकमधील माय-लेकरांचा कार अपघातात मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020

कोपरगाव तालुक्‍यातील धारणगाव येथील सोनारवस्ती फाट्याजवळ रात्री साडे दहाच्या सुमारास चालक रवींद्र यांचे कारवरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगातील कार जोरात रस्त्याच्या कडेच्या असणाऱ्या लिंबाच्या झाडावर जाऊन आदळली

कोपरगाव : तालुक्‍यातील धारणगाव येथील सोनारवस्ती फाट्याजवळ मंगळवारी (ता.28) रात्री साडे दहाच्या सुमारास भरधाव वेगातील कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात नाशिकमधील दोन मुलांसह त्यांच्या आईचा मृत्यू झाला. प्रतीभा रवींद्र वानले (वय 30), मुलगा साई व मुलगी जान्हवी (वय 4, रा. मोहाडी, ता. दिंडोरी, नाशिक) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात कारचालक व मुलांचे वडील रवींद्र अशोक वानले (वय 35) हे जखमी झाले असून, त्यांची प्रकृतीही गंभीर आहे. 

हेही वाचा - "भारत बंद'ला संमिश्र प्रतिसाद

सविस्तर वृत्त असे : मोहाडी (ता. दिंडोरी) येथील रवींद्र वानले यांनी नुकतीच होंडा सिटी (एमएच 15, बी एक्‍स 5145) ही कार विकत घेतली होती. अद्याप ती त्यांच्या नावावर करण्याचे काम बाकी होते. काही कामानिमित्त मंगळवारी रात्री ते कुटुंबासह (दोन मुले व पत्नी) नव्या कारमधून मोहाडीवरून कोळपेवाडीमार्गे कोपरगावकडे जात होते. 

असा घडला अपघात

कोपरगाव तालुक्‍यातील धारणगाव येथील सोनारवस्ती फाट्याजवळ रात्री साडे दहाच्या सुमारास चालक रवींद्र यांचे कारवरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगातील कार जोरात रस्त्याच्या कडेच्या असणाऱ्या लिंबाच्या झाडावर जाऊन आदळली. अपघातानंतर लगेच कारने पेट घेतला. त्यात रवींद्र यांची पत्नी प्रतीभा, मुलगा साई व मुलगी जान्हवी वानले गंभीर जखमी झाले होते. अपघाताचा आवाज ऐकून ग्रामस्थ त्यांच्या मदतीसाठी धावले. त्यांनी कोपरगाव तालुका पोलिसांना व कोपरगाव तालुका पोलिसांनी नाशिक जिल्हा पोलिसांना अपघाताची माहिती दिली. 

उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू

मुलांना तातडीने आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. प्रतीभा यांचे शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. या अपघातात चालक रवींद्र वानले गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. अपघातात कारचा चक्काचूर झाला.

हेही वाचा - महाविकास आघाडी सरकारविरुद्ध सरपंच संतापले 

नातेवाईक कोपरगावात दाखल

वानले यांचे नातेवाईक बुधवारी (ता.29) दुपारी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात आले होते. मात्र, त्यांनाही हे कुटुंब कोठे जात होते, याबाबत माहिती नव्हती. चालक रवींद्र काहीतरी तणावात असावेत, असा कयास व्यक्त होत आहे. धारणगाव येथील नीळू तात्याबा रणशूर यांनी पोलिसांना खबर दिली. पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सचिन इंगळे करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three of a family died in a car accident in kopargaon