
चिक्कोडी : प्रकाश हुक्केरी यांचे जोरदार पुनरागमन
चिक्कोडी : एक दिग्गज नेते विस्मृतीत गेल्यासारखे वाटत असतानाच तीन वर्षांनी राजकारणात पुन्हा परतला आहे. पंच्याहत्तर वर्षांच्या आयुष्यातील पन्नास वर्षे राजकारणात सक्रीय राहून अलीकडच्या काळात राजकीय विजनवासात गेलेल्या प्रकाश हुक्केरी यांनी पुन्हा जोरदार पुनरागमन केले आहे. त्यामुळे चिक्कोडीतील काँग्रेस कार्यकर्ते ‘चार्ज’ झाले आहेत.
विधान परिषदेच्या वायव्य शिक्षक मतदार संघाची निवडणूक यंदा राज्यात गाजली, ती केवळ प्रकाश हुक्केरी यांच्या उमेदवारीमुळे. चर्चेत नसलेली निवडणूक एकदम ‘हाय व्होल्टेज’ बनली. या निवडणुकीने राज्याचे, जिल्ह्याचे राजकीय चित्र बदलेल अथवा न बदलेलही. यापेक्षा तीन वर्षांपासून राजकीय विजननवासात असलेल्या प्रकाश हुक्केरी यांनी भरारी घेतली हे महत्वाचे.
हुक्केरी तीन जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या शिक्षक मतदारसंघात बाजी मारून राज्याच्या राजकारणात आजही मी कमी नसल्याचा संदेश दिला आहे. गतवेळी लोकसभेच्या निवडणुकीतील पराभव वगळता हुक्केरी यांनी राजकारणात निवडणुकीत कधीही हार मानलेली नाही. एकसंबा गावातील पंचायत सदस्यापासून सुरू झालेले त्यांचे राजकारण आजही थांबलेले नाही. मंडल पंचायत, जिल्हा पंचायत, विधान परिषद, पाचवेळा विधानसभा व एकदा लोकसभा सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीत हुक्केरी अलीकडे राजकारणातून बाजूला जातील, असा दावा अनेकांचा होता.
पण हुक्केरी यांना पुन्हा प्रवाहात यायचे होते. मुलगा गणेश याला दोन वेळा आमदार केल्यानंतरही ते अधिक सक्रीयपणे पुन्हा चर्चेत येत राहिले. त्यातून चिक्कोडी-सदलगा मतदारसंघ सोडून कागवाड विधानसभेसाठी चाचपणी केली. तेथे अडचणी येत असल्याने दुसऱ्या मतदारसंघांचीही चाचपणी केली. बेळगाव लोकसभेसाठीही पक्षाकडे उमेदवारी मागितली. अलीकडे झालेल्या स्थानिक स्वराज संस्था गटातून विधानपरिषद निवडणूक लढविण्याची तयारी केली. पण, श्रेष्ठींनी ‘वेट अँड वाॅच’ असा संदेश दिला. उमेदवारी मिळेल की नाही, याची पर्वा न करता वायव्य शिक्षक मतदार संघासाठी तयारी करून दोन महिने आधीच प्रचार सुरू केला होता. येथे आधीच्या इच्छुकाने बंडखोर म्हणून अपक्ष निवडणूक लढविली. त्याचा फटका बसण्याची भीती होती, पण तसे झाले नाही. प्रकाश हुक्केरी यांचे जिल्हा व राज्याच्या काँग्रेस कमिटीत मोठे नाव आहे. त्याचेच फळ त्यांना मिळाले.
Web Title: Chikkodi Prakash Hukkeri Strong Comeback
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..