आघाडीतील बिघाडीचा फायदा कुणाला ? 

प्रकाश भालकर - सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

कुरळप - चिकुर्डे जिल्हा परिषद मतदारसंघात विकास आघाडीत बिघाडी झाल्याने आघाडीच्या मतविभाजनाचा फायदा राष्ट्रवादीला होण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादीला आव्हान ठरणाऱ्या विकास आघाडीपासून अलिप्त रहात शिवसेनेचे अभिजित पाटील यांनी पक्षाच्या चिन्हावर लढण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता या गटात राष्ट्रवादी, विकास आघाडी, शिवसेना व मनसे अशी चौरंगी लढत होत आहे. 

चिकुर्डे गटात अभिजित पाटील विकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादीला तोडीस तोड आव्हान देतील असे चित्र होते. मात्र त्यांनी विकास आघाडीत न जाता शिवसेनेच्या धनुष्य बाणाच्या चिन्हावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीकडून राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांचे चिरंजीव संजीव ऊर्फ बाळासाहेब पाटील हे रिंगणात आहेत. विकास आघाडीने यशवंत ग्लुकोजचे संचालक शहाजी पाटील यांना उमेदवारी दिली आहे. मनसेचे विजय भालकर रेल्वे इंजिन चिन्ह घेऊन उभे आहेत. परिसरातील बहुतांशी ग्रामपंचायती व विविध संस्थांवर राष्ट्रवादी व पी. आर. पाटील गटाची सत्ता आहे. विकास आघाडीचे उमेदवार शहाजी पाटील आमदार शिवाजीराव नाईक यांचे कट्टर समर्थक आहेत. शिवसेनेचे अभिजित पाटील यांनी या पूर्वी या गटात सदस्य म्हणून काम पाहिले आहे. शिवसेना व लोकनेते शिवाजीराव पाटील उद्योग समूहाच्या माध्यमातून ते कार्यरत आहेत. मनसेचे विजय भालकर यांनी परिसरातील विविध समस्या सोडवण्यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठवला आहे. चिकुर्डे या गटात चिकुर्डे व कुरळप हे दोन पंचायत समितीचे गण आहेत. चिकुर्डे गणात सर्वसाधारण स्त्री व कुरळपमध्ये सर्वसाधारण पुरुष असे आरक्षण आहे. चिकुर्डे गणात राष्ट्रवादी, शिवसेना व विकास आघाडी अशी तिरंगी तर कुरळप गणात या तीन मुख्य पक्षांसह मनसे व अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. 

निर्णायक गावे 
चिकुर्डे गटात एकूण सात गावे येतात. त्यापैकी कुरळप, चिकुर्डे व ऐतवडे खुर्द ही मतदारसंख्येच्या तुलनेत मोठी गावे आहेत. या गावातील मतदान सदस्य निवडीत महत्त्वाचे व निर्णायक ठरणार आहे. ऐतवडे खुर्द या गावात राष्ट्रवादीचेच दोन गट आहेत. या गावातून राष्ट्रवादीच्या उमेदवाला किती मतदान होते याचीही उत्सुकता आहे.

Web Title: chikurdi zp constituency