बालमृत्यूच्या प्रमाणात होतेय घट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

सातारा - गर्भवती महिला व माता कुपोषित राहिल्याने त्यांचे व त्यांच्या नवजात बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियान राबविले. त्याअंतर्गत पंतप्रधान मातृवंदना योजनेतून जिल्ह्यातील २० हजार ३८१ महिला लाभार्थ्यांना चार कोटी ७३ लाखांचे अनुदान देण्यात आले. त्यात सातारा जिल्हा राज्यात ‘टॉप’ राहिला. शिवाय, राज्याच्या तुलनेत जिल्ह्याचा बालमृत्यूदरही घटू लागला आहे. 

दारिद्य्ररेषेखालील आणि दारिद्य्ररेषेवरील अनेक गर्भवती महिलांना गरोदरपणात मजुरी करावी लागते. प्रसूतीनंतर शारीरिक क्षमता नसतानाही मजुरीसाठी कामावर जावे लागते. अशा गर्भवती महिला कुपोषित राहून त्यांचे व प्रसूतीनंतर त्यांच्या नवजात बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे देशात माता व बालमृत्यू वाढत आहेत. माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार देण्यासाठी केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने ‘प्रधानमंत्री मातृवंदना’ योजना एक जानेवारी २०१७ पासून संपूर्ण देशात लागू केली. राज्य शासनाने या योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय आठ डिसेंबर २०१७ रोजी घेतला. या योजनेतून गरोदरपणात १५० दिवसांत एक हजार, दुसऱ्या टप्प्यात दोन हजार, प्रसूतीनंतर दोन हजार रुपये दिले जातात. जिल्ह्यात ४६ हजार ७२० अर्ज नोंदणी केली. त्यातील २० हजार ३८१ लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून चार कोटी ७३ लाख ५५ हजारांचे अनुदान मिळाले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली. 

दरम्यान, यापूर्वीपासून पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियान राबविले जात असून, जिल्ह्यातील खासगी प्रसूतीतज्ज्ञ डॉक्‍टर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येक महिन्याच्या नऊ तारखेला जाऊन गर्भवतींची मोफत तपासणी करतात. त्याचा परिणाम म्हणून सुरक्षित मातृत्व वाढले असून, बालमृत्यूची संख्या कमी होत आहे, अशी माहिती उपाध्यक्ष वसंत मानकुमरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी दिली.

अर्भक मृत्यूचे प्रमाण जादा
बालमृत्यूमध्ये पहिल्या २८ दिवसांत होणाऱ्या मृत्यूला नवजात अर्भक मृत्यू, शून्य ते एक वर्षातील मृत्यूला अर्भक मृत्यू, तर शून्य ते पाच वर्षादरम्यानच्या मृत्यूला बालमृत्यू म्हणतात. पहिला तास, पहिला दिवस किंवा २८ दिवसांत अर्भकांचे मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. २०१४-१५ पासून जिल्ह्यात दोन हजार ३३ बालमृत्यू झाले असून, त्यात एक हजार ७०२ अर्भकांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Child Death Percentage less