'त्या' बाऴाला जगण्यासाठी व्हेंटिलेटर नाही; मरणानंतर अॅम्ब्युलन्सही नाही!

सूर्यकांत वरकड
सोमवार, 16 जुलै 2018

नगर - जन्मानंतर लगेच "व्हेंटिलेटर'ची गरज असलेल्या बाळाला वाचविण्यासाठी एका पित्याने केलेली धडपड आणि व्हेंटिलेटर उपलब्ध न झाल्याने दगावलेल्या बाळाची मृत्यूनंतरही झालेली फरफट पुढे आली आहे. "शासकीय रुग्णालयेच व्हेंटिलेटर'वर असल्याचे त्यामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

नगर - जन्मानंतर लगेच "व्हेंटिलेटर'ची गरज असलेल्या बाळाला वाचविण्यासाठी एका पित्याने केलेली धडपड आणि व्हेंटिलेटर उपलब्ध न झाल्याने दगावलेल्या बाळाची मृत्यूनंतरही झालेली फरफट पुढे आली आहे. "शासकीय रुग्णालयेच व्हेंटिलेटर'वर असल्याचे त्यामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

शंकर अडागळे (भेंडे, ता. नेवासे) यांच्या गरोदर पत्नीचे येथील जिल्हा रुग्णालयात गुरुवारी (ता. 12) सिझेरियन करण्यात आले. प्रकृती नाजूक असलेल्या बाळाला "एनआयसीयू'मध्ये ठेवण्यात आले. पण, जिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटरची सोय नसल्याने शंकर व त्यांची बहीण बाळाला घेऊन "108' रुग्णवाहिकेतून औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात गेले.

तेथेही पहाटे तीन वाजता पोचल्यानंतर, "चार दिवस "वेटिंग' करावे लागेल. तुम्ही बाळाला कशाला आणले?', असा सवाल डॉक्‍टरांनी केला. त्यामुळे 108 रुग्णवाहिकेतून बाळाला पुन्हा नगरला नेण्याचा विचार शंकर यांनी केला; पण रुग्णवाहिकेचा चालक तयार होईना. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शिफारसपत्रही दिले नाही. दरम्यान, बाळावर "एनआयसीयू'मध्ये उपचार सुरू होते; पण वेळेत "व्हेंटिलेटर' न मिळाल्याने दुसऱ्या दिवशी (ता. 13) दुपारी बाळाचा मृत्यू झाला. मात्र, घाटी रुग्णालयाने मृत बाळाला पुन्हा नगरला नेण्यासाठीही रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली नाही.

मृत्यूनंतरही बाळाची फरफट
शंकर अडागळे यांच्या खिशात अवघे 70 रुपये होते. त्यामुळे त्यांनी मृत बाळासह औरंगाबाद ते मनमाड असा रेल्वेप्रवास केला. मनमाड बसस्थानकावर लोकांकडे पैसे मागितले आणि मृत बाळासह ते एसटीने नगरला येथे आले. सिद्धार्थनगरमधील स्मशानभूमीत रात्री उशिरा बाळावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आपले बाळ या जगात नसल्याचे जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आईला अजूनही माहिती नाही.

जिल्हा रुग्णालयात चार "व्हेंटिलेटर'ची गरज आहे. यापूर्वी कोणीही त्याची मागणी केली नाही. जिल्हा नियोजन समितीकडे व शासनाकडे "व्हेंटिलेटर'ची मागणी करणार आहोत. त्यानंतरच हा प्रश्‍न सुटेल. मृतदेह नेण्यासाठी शववाहिनी असते. रुग्णवाहिकेतून मृतदेह नेता येत नाही.
- डॉ. पी. एम. मुरंबीकर, जिल्हा शल्यचिकित्सक

Web Title: child death ventilator government hospital issue