कडेगावात स्मशानभूमीसमोरील कचरा डेपोवर उभारले बालोद्यान 

संतोष कणसे
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

बालोद्यान उभारले जात आहे ती जागा चुकीची आहे. तेव्हा लोक भावनेचा आदर राखत सदर बालोद्यान सर्वानुमते योग्य ठिकाणी उभारले जाईल. तर चुकीच्या ठिकाणी होत असलेली बालोद्यानाची उभारणी तात्काळ रोखली असून तशी लेखी नोटीस संबंधित ठेकेदाराला दिली आहे. 
- आकांक्षा जाधव,
नगराध्यक्षा,नगरपंचायत कडेगाव

कडेगाव - नगरपंचायतीचा अजब कारभार चव्हाट्यावर आला असून नगरपंचायत प्रशासनाने चक्क स्मशानभूमीसमोरील कचरा डेपोवर बालोद्यानाची उभारणी केली आहे. त्यामुळे नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. याबाबत नगराध्यक्षा अनभिज्ञ असल्याचे तर येथे बालोद्यान उभारण्याबाबत मुख्याधिकारी यांनी सूचना दिल्याची सर्वत्र चर्चा आहे.

येथे नगरपंचायतीची स्थापन झाल्यानंतर येथील नागरिकांनी कोतमाई ओढा परिसराचे सुशोभीकरण करुन येथे दत्तनगर चौक व दत्तमंदीर नजीक बालोद्यान तसेच ओपन जिम सुरु करण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणे नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी या विकासकामांना सर्वानुमते तात्काळ मंजुरी दिली. तसेच त्यासाठी 14 लाख रुपयांच्या निधीचीही तरतूद केली.

त्यानंतर निविदा प्रकिया पार पडली. ठेकेदारही निश्चित झाले. ठेकेदाराने बालोद्यानासाठी लागणारे सर्व साहित्यही आणले. परंतु उभारणीच्या कामाला मुहूर्त लागला नसल्याने हे साहित्य नगरपंचायतीच्या आवारात अनेक महिने धूळ खात पडून होते.
अखेर नगरपंचयात प्रशासनाला बालोद्यान उभारण्याचा मुहूर्त सापडला. परंतु हे बालोद्यान उभारण्यासाठी स्मशानभूमीसमोरील कचरा डेपोची चुकीची जागा निवडली आहे. येथे पूर्वी नगरपंचायतीचा मिनी कचरा डेपो होता. संबंधित ठेकेदाराने येथील कचऱ्याचे सपाटीकरण करुन येथे बालोद्यान उभारण्यास सुरुवात केली आहे. येथे सर्वत्र घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य असून लहान मुले या बालोद्यानात खेळणे शक्य   नाही. तसेच त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याचा धोका आहे. त्यामुळे नागरिकांनी येथे बालोद्यान उभारण्यास तीव्र विरोध दर्शवून आक्षेपही घेतला आहे.

दरम्यान येथील सावली प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्षा आकांक्षा जाधव यांची भेट घेवून त्यांना स्मशानभूमीसमोरील कचरा डेपोवर बालोद्यान उभारणी करु नये. तर इतर ठिकाणी करावे, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा दिला. तसे निवेदनही नगराध्यक्षा यांना दिले.

स्मशानभूमीसमोर व कचरा डेपोवर बालोद्यानाची उभारणी करण्याचा आदेश देणारे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ निलंबित करावे. 

- माणिकराव देशमुख, सामाजिक कार्यकर्ते, कडेगाव

Web Title: Children Park on garbage depot in Kadegaon