‘चैत्रबन’ नाल्याचे पाणी झाले स्वच्छ

‘चैत्रबन’ नाल्याचे पाणी झाले स्वच्छ

सांगलीचं रूपांतर ‘इको-सिटीत’ करायचं तर फक्त अहवाल-फायलींचे ढिगारे उपयोगाचे नाहीत. ग्रासरूटला जाऊन प्रश्‍नांची उत्तरे शोधली पाहिजेत. तेच कृष्णा नदीच्या प्रदूषणाबाबतही लागू पडतं. नदीवर स्वच्छता मोहिमा करणे किंवा केवळ ओरड करून काही साध्य होणार नाही. नदीत सांडपाणीच मिसळणार नाही किंवा ते अशुद्ध असणार नाही याची दक्षत घेतली पाहिजे. त्यासाठी आम्ही सांगलीत चैत्रबन नाल्यावर पायलट प्रोजेक्‍ट केला. त्याचे निष्कर्ष उत्साहवर्धक आहेत. आता महापालिका आणि नागरिकांनी अशा प्रयोगांची पुनरावृत्ती केली पाहिजे तर कृष्णा नदी अशुद्ध केल्याबद्दल आपल्याकडे कोणी बोट दाखवू शकणार नाही.

काही वर्षांपूर्वी वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रसाद मोडक यांचं व्याख्यान ऐकलं. मी त्यांना भेटून  शेरी नाल्याचे रूपांतर पुण्यातील ओशो पार्क नाल्यासारखे करता येऊ शकेल का आणि सांगलीतील विहिरींचे पुनरुज्जीवन करून त्या पुन्हा वापरता येतील असे  दोन मुद्दे मांडले. त्यानंतर या संदर्भातील संस्था, व्यक्ती, सहकाऱ्यांशी माझा संवाद सुरूच होता. कुणीतरी हे नक्की करेल ही आशा होती. मग लक्षात  आलं, की हे आता आपणच केलं पाहिजे. 

मग बुधगावच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिकलेल्या हेमंत मोरे याने असं वाटणाऱ्या मित्रांची मोट बांधली. आधी शहरातील जुने ओढे, नाले यांचे सर्वेक्षण केलं. अभ्यासाअंती चैत्रबन नाला  निवडला. या कामात रवी आडकेंनी हात दिला. त्याच्यामुळे महापालिकेतील यंत्रणेचा हिरवा कंदील मिळाला. कॉमन सेन्सचा वापर करून संकल्प चित्र तयार केलं. नाल्यातून मोठ्या प्रमाणात वाहून येणारा प्लास्टिकसह वेगवेगळा कचरा जाळी लावून अडवला.

सफाई कर्मचारी नाल्यातील कचरा कसा कमी झाल्याने चकित झाले.’ वाहतं पाणी थांबवायचं...पोकळ बंधारा, त्याला खळाळून हसवायचं...ऑक्‍सिजनचं प्रमाण वाढविण्यासाठी... वेग कमी करायचा...गाळ, माती खाली बसते... पक्का बांध आणि मग त्याला झाडझुडपांमधून खेळवायचं... दगडगोट्यांची गाळणी... गाळणीत दुर्गंधी रोखण्यासाठी दगडी कोळशाचा एक थर... आणि त्यामध्ये आळू, कर्दळ आदी पाणवनस्पती... असं सारं लावलं. आलम तांबोळी याची या क्षेत्रातील कामगिरी कामी  आली. कल्पनांना त्यानं संकल्पचित्राद्वारे कागदावर उतरवलं. 
काम सुरू केलं. अडचणी आल्या, शंका, अडथळे दूर केले.

नासिर मिर्झा आमचा प्रमुख. सुनील गरडे आणि संजय वोरा यांनी बांधकाम पूर्ण केलं. इंद्रजित पाटील, प्रशांत शहा, चेतन चोपडे यांनी गाळणीची रचना केली. मनपा येथे अभियंता असणारा चेतन मोदी वेळोवेळी सोबत होताच. वालचंद महाविद्यालयातील स्थापत्य पदविका प्रमुख मित्र हर्षद कुलकर्णी यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी हा प्रकल्प निवडला. मनपा कर्मचारी, नागरिक, नगरसेवक यांच्या सहकार्यामुळे  बंधारा आणि अन्य अशी सारी कामे झाली. 

पर्यावरणप्रेमी डॉ. रवींद्र व्होरा अग्रणीच्या कामापासूनच या प्रकल्पाबाबत उत्सुक होते. स्वखर्चातून ‘स्पंदन’ने हा प्रकल्प पूर्ण केला. आता वेळ आली, की आपण जे केलंय ते कितपत यशस्वी झालंय. आपण  योग्य मार्गावर आहोत का? हे तपासायची.

निखिल लॅबोरेटरीचे डॉ. सुहास खांबे यांनी सांगलीच्या नाल्यांचा अभ्यास केलेला. त्यांनी जाळीमागचं पाणी आणि गाळणीच्या पुढील पाण्याचे नमुने घेऊन अहवाल दिला. त्याचं परीक्षण सांगत होतं, की हे पाणी शेतीसाठी उपयोगी आहेच पण नदीतही थेट सोडले जाऊ शकते. या प्रकल्पाचे तेच उद्दिष्ट होतं. ते साध्य झालं. आयुक्तांची प्रकल्प भेट झाली. त्यांनीही सांगलीच्या सर्वच नाल्यांचा अभ्यास करून हा प्रकल्प राबवण्याचा मनसुबा आमच्या समोर व्यक्त केला. आता वेळ पालिकेची आणि नागरिकांचीही. अशा प्रयोगांची पुनरावृत्तीची.

पुढची जबाबदारी पालिकेची
या बंधाऱ्याचा देखभाल खर्च शून्य आहे. गरज आहे ती फक्त बंधाऱ्याच्या आधी लावलेल्या जाळीतील कचरा नियमितपणे स्वच्छ करण्याची. हा कचरा बंधाऱ्यात जाऊन अडकणार नाही याची दक्षता घ्यायला हवी.  महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या नियमित कामाचाच हा भाग आहे. ते काम संबंधित नगरसेवक व अधिकाऱ्यांनी करावे एवढीच अपेक्षा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com