मोहिद्दीन मुल्लाच्या मिरजेतील घरावर सीआयडीचा छापा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

सांगली - वारणानगर येथील शिक्षक कॉलनीतील घरातून कोट्यवधींची रोकड लांबवणाऱ्या मोहिद्दीन अबुबकर मुल्ला (मूळ रा. जाखले) याच्या मिरजेतील बेथेलहेमनगरमधील घराची "सीआयडी'च्या पथकाने मंगळवारी झडती घेतली. बेथेलहेमनगरमध्ये मोहिद्दीनची मेहुणी राहते. गायब असलेल्या मोहिद्दीनचा ठावठिकाणा तिला विचारला, तसेच सांगली "एलसीबी'च्या पथकाने केलेल्या कारवाईबाबत पथकाने माहिती घेतली.

वारणानगर येथे एका शिक्षण संस्थेतील संचालकांच्या गाडीवर चालक म्हणून काम करणाऱ्या मोहिद्दीन मुल्लाने गेल्या वर्षी बांधकाम व्यावसायिक सरनोबत यांच्या घरातून कोट्यवधींची रोकड लंपास केली होती. सांगलीत तो बुलेटवरून फिरताना पाहून काहींना संशय आला.

त्याच्या संशयास्पद हालचालींची टीप मिळाल्यानंतर "एलसीबी'च्या पथकाने 12 मार्च 2016 रोजी बेथेलहेमनगरमध्ये छापा टाकून तीन कोटी सात लाखांची रोकड जप्त केली. या कारवाईनंतर "एलसीबी'च्या पथकाने परजिल्ह्यात कारवाईसाठी परवानगी न घेता घरफोडी करून नऊ कोटी 18 लाखांची रोकड लंपास केल्याची फिर्याद तब्बल वर्षानंतर कोडोली पोलिस ठाण्यात दाखल झाली.

गुन्हा दाखल झाल्यापासून निरीक्षक विश्‍वनाथ घनवट, सहायक निरीक्षक सूरज चंदनशिवे, सहायक फौजदार शरद कुरळपकर, हवालदार दीपक पाटील, शंकर पाटील, पोलिस नाईक कुलदीप कांबळे, रवींद्र पाटील हे पसार झाले आहेत. त्यांच्या निलंबनाची नोटीस घरांवर चिटकवली आहे. "सीआयडी'कडे या गुन्ह्याचा तपास सोपविण्यात आला आहे.

अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी
फरारी अधिकारी व कर्मचारी अटकपूर्व जामीन घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सांगलीतील नामांकित वकिलांकडे काहींनी चाचपणी केली आहे. त्यापैकी हवालदार दीपक पाटील आणि एकाने अटकपूर्व जामिनासाठी कोल्हापूरच्या जिल्हा न्यायालयात वकिलांमार्फत अर्ज दाखल केला आहे. त्यावर बुधवारी (ता. 26) सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: cid raid on mohiddin mulla home