खंडपीठासाठीच्या आंदोलना दरम्यान पोलिस-वकील यांच्यात शाब्दिक चकमक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 मार्च 2019

‘‘वकिलांच्या भावना तीव्र आहेत. लोकअदालतीत वकिलांची असहकाराचीच भूमिका राहील. यापूर्वी घेतलेल्या निर्णयानुसार २५ मार्च ते १ एप्रिलअखेर वकील न्यायालयीन कामकाजापासून अलिप्तच राहतील. खंडपीठ कृती समितीची मंगळवारी (ता. १९) बैठक घेतली जाईल.

- ॲड. प्रशांत चिटणीस

कोल्हापूर - राष्ट्रीय लोकअदालतीच्या कामकाजाला असहकार्य करायचे, असा ठाम निर्णय काल जिल्हा बार असोसिएशनच्या सभेत वकिलांनी घेतला होता. त्यानुसार आज खंडपीठ कृती समिती व बार असोसिएशनने लोकअदालतीसाठी जाणाऱ्या पक्षकारांना विनंती करून रोखले. परंतु जिल्हा व सत्र न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोलिसांनी पक्षकारांना काही सूचना देऊन वेगळ्या मार्गाने प्रवेश करण्यास सांगितले. या पोलिसांच्या कृतीला बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत चिटणीस व त्यांच्या सहकार्यांनी विरोध केला. यातून पोलीस आणि वकील यांच्यात शाब्दिक चकमक झाली. 

दरम्यान आज सकाळपासूनच बार असोसिएशन व खंडपीठ कृती समितीचे सदस्य न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पक्षकारांना फुल देऊन आज जाऊ नये अशी विनंती करत होते. यावेळी  सुशांत गुडाळकर, आनंदराव जाधव , आर. बी. गावडे, अभिजीत कापसे, मनीष पाटील, युवराज शेळके, रणजीत गावडे, सचिन पाटील, ओंकार देशपांडे, नरेंद्र गांधी, पिराजी भावके, व्ही. आर. पाटील आदी उपस्थित होते.

दरम्यान काल राष्ट्रीय लोकअदालतीत  सुमारे ३५ हजार पक्षकारांना तडजोडीसाठी नोटिसा काढण्यात आल्या आहेत. हे राष्ट्रीय काम असून, याबाबत वकिलांनी फेरविचार करावा, यासाठी  प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. व्ही. न्हावकर यांनी बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश उमेशचंद्र मोरे, आठ न्यायाधीश आणि जिल्हा बार असोसिएशनच्या माजी अध्यक्षांसह कार्यकारिणी उपस्थित होती; पण बार असोसिएशनमध्ये घेतलेला निर्णय मागे घेता येत नाही, पण केलेल्या विनंतीला मान देऊन फेरविचार करू, असे वकिलांतर्फे सांगण्यात आले. त्यानुसार न्याय संकुलातील सभागृहात तातडीची सभा बोलविण्यात आली होती. 

‘‘वकिलांच्या भावना तीव्र आहेत. लोकअदालतीत वकिलांची असहकाराचीच भूमिका राहील. यापूर्वी घेतलेल्या निर्णयानुसार २५ मार्च ते १ एप्रिलअखेर वकील न्यायालयीन कामकाजापासून अलिप्तच राहतील. खंडपीठ कृती समितीची मंगळवारी (ता. १९) बैठक घेतली जाईल.

- ॲड. प्रशांत चिटणीस

Web Title: Circuit bench agitation in Kolhapur