Belagum : रुंदीकरणाच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Belagum : रुंदीकरणाच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा

Belagum : रुंदीकरणाच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा

बेळगाव : पिरनवाडी नाका ते व्हिटीयु पर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार असल्याची माहिती मिळताच पिरणवाडी, ग्रामस्थामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच 110 फुटाचा रस्ता केल्यास व्यापारी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याने 60 फुटा चा रस्ता करावा अशी मागणी गावातून वाढू लागली आहे. तसेच रस्ता करण्याचा प्रयत्न झाला तर प्रसंगी रस्त्यावर उतरण्यास सह न्यायालयीन लढा देण्याची तयारी देखील करण्याचा निर्धार व्यापारी वर्ग व नागरिकांतून व्यक्त होऊ लागला आहे.

हेही वाचा: परमबीर सिंग फरार घोषित, न्यायालयाचा मोठा निर्णय

कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता आठ दिवसांपूर्वी पिरणवाडी येथे सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे पूजन करण्यात आले आहे. तसेच लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती परिसरातील व्यापारी व नागरिकांना देण्यात आली होती. त्यानंतर अधिक प्रमाणात रुंदीकरण करण्यास विरोध करीत या भागातील व्यापारी वर्गाने मंगळवारी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन 140 ऐवजी 70 फुटांचा रस्ता करावा अशी मागणी करण्यात आली होती. मात्र अधिकाऱ्यानी 140 ऐवजी 110 फुटांचा रस्ता करण्याबाबत विचार केला जाईल अशी माहिती व्यापाऱ्यांना दिली होती त्यामुळे व्यापारी वर्गातही भीतीचे वातावरण पसरले असून व्यापाऱ्याने 110 फूट रस्ता केल्यास किती नुकसान होईल त्याचा अंदाज घेतला असता दोन्ही बाजूची सर्व दुकाने काढावी लागणार असून रस्त्याला लागून असलेल्या अनेक घरांचे नुकसान होणार आहे. अधिक प्रमाणात रुंदीकरण करण्यास तीव्र विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबत लवकरच व्यापक बैठक घेऊन पुढील रूपरेषा ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा: राफेल विमान खरेदी प्रकरण; राहुल गांधी यांची मुंबई हायकोर्टात याचिका

"अधिक प्रमाणात रस्ता करण्याची काही गरज नाही. त्यामुळे 70 फुटांचा रस्ता करावा अशी मागणी केली असून सात वर्षांपूर्वी या रस्ताचे रुंदीकरण करण्यात आले होते. त्याच वेळी अजून काही प्रमाणात रस्ता वाढवला असता तर चालले असते मात्र आता रस्त्याचे मोठ्या प्रमाणात विक्री केल्यास व्यापाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागेल."

- मोहीन नमकवाले, व्यापारी

"आठ दिवसांपूर्वी कामाचे पूजन करुन अचानकपणे रुंदीकरण करण्यात येणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे. हे अतिशय चुकीचे असून 110 फुटांचा रस्ता केला तरी दोन्ही बाजूची दुकाने व अनेकांची घरे जाणार आहेत याचा विचार करून 60 फुटाचा रस्ता करावा अशी मागणी केली आहे."

- अतीफ मुजावर, व्यापारी

"खानापूर रोडचे रुंदीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे त्या मार्गावरून या भागातील वाहतूक वळविली तर कोणतीही अडचण येणार नाही. फक्त व्हिटीयुकडे जाणारा रस्ता आहे म्हणून रुंदीकरण करणे पूर्णपणे चुकीचे आहे. व्यापारी व नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दखल घ्यावी अशी मागणी आहे."

- कल्लाप्पा गोवेकर, व्यापारी


"सात वर्षांपूर्वी या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा रस्त्याचे रुंदीकरण करणे चुकीचे असून मोठ्या प्रमाणात रूंदीकरण केल्यास व्यापारी देशोधडीला लागेल याचा विचार होणे गरजेचे आहे अनेकांची घरे ही रस्त्याला लागून आहेत त्यांचेही नुकसान होणार आहे त्यामुळे साठ फुटांचा रस्ता करणे योग्य होईल."

- महादेव काळगे, व्यापारी

loading image
go to top