असे लय अधिकारी बघितले!; किणी टोल नाक्‍यावरील मुजोरी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

एक नजर

  • जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्यासह निवडणूक अधिकाऱ्यांना किणी टोल नाक्‍यावर ठेवले थांबवून
  • एका अधिकाऱ्यासही धक्काबुक्की 
  • सोमवारी रात्री अकराच्या सुमारास घटना
  • या प्रकरणी टोल नाक्‍यावरील दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

पेठवडगाव - जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्यासह निवडणूक अधिकाऱ्यांना किणी टोल नाक्‍यावर थांबवून ठेवून एका अधिकाऱ्यास धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला. इस्लामपूरहून निवडणुक कामकाज पूर्ण करुन सोमवारी रात्री अकराच्या सुमारास परतताना हा प्रकार घडला. या प्रकरणी टोल नाक्‍यावरील दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी विजय शामराव शेवडे (घुणकी) व आणखी एक अशा दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. 

मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, आकांक्षा नरोडे, अपूर्व पिरके, रोहिणी कळंबे इस्लामपूरला निवडणूक कामासाठी गेले होते. तेथून मोटार (एमएच 01 बीटी 9032) मधून कोल्हापूरला परत येत असताना किणी टोल नाक्‍यावर टोलसाठी मोटार अडविली. चालक इंद्रजित पाटील याने मोटारीस लावलेला शासनाचा बोर्ड दाखवला. बोर्ड चालत नाही कार्ड दाखवा, असे सांगितले. या वेळी श्री. मित्तल यांचे ओळख पत्र दाखवले. हे ओळखपत्रसुद्धा चालत नाही, असे कर्मचाऱ्याने सांगितले. नाक्‍याच्या सुपरवायझरनेही ओळखपत्र चालत नाही, असे सांगून टोल भरण्यास सांगितले.

यानंतर मित्तल यांनी सुपरवायरकडे ओळखपत्राची मागणी केली, त्याने ओळखपत्र दाखवले त्याची मुदत 31 मार्चला संपलेली होती. तरीसुद्धा तो कर्मचारी ओळखपत्र चालते असे म्हणून अरेरावी करू लागला. या वेळी उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम यांनी आयएएस अधिकारी आहेत. हुज्जत घालू नका, अशी विनंती केली; परंतु असे लय अधिकारी बघितले आहेत, असे म्हणुन अर्वाच्च शिवीगाळ करत धक्काबुक्की करून शिवीगाळ करू लागला. त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना फोनवरून माहिती दिली. त्यानंतर उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम यांनी पेठवडगांव पोलिसात फिर्याद दिली. यानंतर दोघांवर गुन्हे दाखल केले. 

Web Title: clash with Zhilla Parishad CEO and officer on Kini Toll Naka