सोलापुरात नालेसफाईला मिळाला मुहुर्त 

solapur
solapur

सोलापूर : पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर नाले सफाईचे काम महापालिकेने शुक्रवारपासून सुरु केले. मान्सून जवळ आला असतानाही नालेसफाईचे काम सुरु न झाल्यासंदर्भात "सकाळ'मध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. दरम्यान, नालेसफाईचे काम आठवडाभरात पूर्ण होईल, असे नगर अभियंता संदीप कारंजे यांनी "सकाळ'ला सांगितले. 

पावसाळ्याचे वेध लागले, की शहरातील नालेसफाईच्या कामांना सुरवात होते. वास्तविक वेळोवेळी स्वच्छ करावेत, अशी या नाल्यांची स्थिती असते. मात्र, पावसाळ्यापूर्वीच सफाईचे काम होते. एखादा मोठा पाऊस झाला, की नाल्याची सफाई किती गांभीर्याने केली जाते, याचे उत्तरच मिळते. त्यामुळे अशी सफाई "फ्लॉप शो' ठरते, हा आजवरचा अनुभव आहे. या पार्श्‍वभूमीवर नियोजन आणि गांभीर्यपूर्वक नालेसफाई झाल्यास पावसाळ्यात प्रशासनाला करावी लागणारी धावपळ थांबेल, शिवाय नागरिकांनाही त्रास होणार नाही.या संदर्भात "सकाळ'मध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यावर आयुक्त दीपक तावरे यांनी नगरअभियंता व विभागीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि नालेसफाईचा आराखडा तयार करून वेळापत्रक निश्‍चित केले. त्यानुसार शुक्रवारपासून सफाईचे काम सुरु झाले. श्री. कारंजे यांच्यासह विभागीय अधिकारी मोहन कांबळे यांनी कामांची पाहणी केली. 

जुना पुणे नाका आणि कारंबा नाका येथील नाल्याचे काम प्राधान्याने सुरु करण्यात आले आहे. काही वर्षांपूर्वी पावसाच्या पाण्यामुळे हे नाले तुंबले होते, त्यामुळे आपत्कालीन स्थिती निर्माण झाली होती. या पार्श्‍वभूमीवर प्राधान्याने या नाल्यातील गाळ काढण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. गणेश पेठ, पंखा विहीर, कुंभार वेस, निराळेवस्ती परिसरातील नाल्यांवर मोठ या प्रमाणावर बांधकामे झाली आहेत. नाल्यावर बांधकामे करता येतात की नाहीत याबाबत मतभेद आहेत. मात्र, या बांधकामांमुळे नाले तुंबण्याचे प्रमाण मोठे आहे. 

शहरातल्या बहुतांश झोपडपट्ट्या नाल्यांच्या शेजारी असलेल्या जागेपासूनच विस्तीर्ण झाल्या आहेत. शास्त्रीनगर, दत्तनगर, दाजी पेठेतल्या झोपडपट्ट्यांमधून नाला वाहतो. त्याच्या लगतच घरे आहेत. काही घरांत जाणारा मार्ग हा नाल्यावरूनच आहे. अशा परिसरातील नाल्यांची नेहमीच सफाई होणे अपेक्षित आहे. मात्र, तसे होत नसल्याने झोपडपट्टीवासीयांना नेहमीच अनारोग्याचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात तर त्यांचे जगणे कठीण होते. महापालिकेच्या सफाई यंत्रणेने किमान या परिसरात तरी नियमित नाल्यांची सफाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. 

नाल्याच्या परिसरात असलेल्या पुलांच्या डागडुज्जीचे कामही हाती घेण्यात आले आहे. ते लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार आहे. पावसाळ्यात नाल्यातील पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल अशा पद्धतीने नियोजन केले आहे. 
- संदीप कारंजे, नगर अभियंता 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com