खासदार संजयकाका पाटलांसह सात जणांचा "दर्जा' काढला 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

राज्यात भाजपला विरोधी बाकावर बसण्याचा वेळ आल्याने या मंडळींची महामंडळावरील नियुक्ती रद्द होणार, हे निश्‍चित झाले होते. त्याचा निर्णय आज घेण्यात आला. 

सांगली - राज्यातील भाजप सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या महामंडळावरील नियुक्‍त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रद्द केल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील खासदार संजयकाका पाटील यांच्यासह भाजप आणि जनसुराज्य शक्ती पक्षाच्या सात नेत्यांचा दर्जा आता काढून घेण्यात आला आहे. खासदार पाटील वगळता अन्य नेत्यांना "माजी' लावण्यापुरताच या नियुक्‍त्यांचा लाभ झाला. 

या यादीत माजी आमदार दिनकर पाटील, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, माधवनगरचे जिल्हा परिषद सदस्य शिवाजी डोंगरे, आष्टा येथील नेते वैभव शिंदे, इस्लामपूरचे नेते विक्रम पाटील आणि जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांचा समावेश आहे. राज्यात भाजपला विरोधी बाकावर बसण्याचा वेळ आल्याने या मंडळींची महामंडळावरील नियुक्ती रद्द होणार, हे निश्‍चित झाले होते. त्याचा निर्णय आज घेण्यात आला. 

हेही वाचा - VIDEO :  भारत मदने विरुद्ध विजय गुटाळ कुस्तीत जिंकले कोण ? पाहा 

नियुक्ती आता रद्द

खासदार संजयकाका पाटील यांचा सिंचन योजनांसाठीचा प्रचंड आग्रह लक्षात घेऊन तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन वर्षापूर्वी त्यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी केली. त्यावेळी या पदाला राज्यमंत्री दर्जा होते. वास्तविक हे पद शिवसेनेच्या कोट्यात होते, त्यामुळे सेनेने प्रा. नितीन बानुगडे पाटील यांनाही उपाध्यक्ष केले. अशावेळी आपला वरचष्मा दाखवण्यासाठी संजयकाकांना "कॅबिनेट'चा दर्जा देत फडणवीसांना कडी केली. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी तांत्रिक कारणाने संजयकाकांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. निवडणुकीत विजयानंतर पुन्हा त्यांच्याकडे पद आणि कॅबिनेटचा दर्जा कायम राहिला होता. ही नियुक्ती आता रद्द करण्यात आली आहे. 

हेही पाहा - रत्नागिरी नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत भाजपमध्ये बंडाळी 

पदक ठरले औटघटकेचे

नीता केळकर यांनी अन्य नेत्यांच्या तुलनेत थोडी आधी संधी मिळाली होती. त्यांच्याकडे वीज कंपन्यांच्या एकत्रित समितीचे महिलांसाठीचे राखीव संचालकपद सोपवण्यात आले होते. अन्य नेत्यांना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महामंडळावर नियुक्तीचा "लाभ' देण्यात आला. त्यात दिनकर पाटील यांना रस्ते विकास महामंडळाचे संचालकपद, शिवाजी डोंगरे यांना प्रदुषण नियंत्रण महामंडळाचे संचालक, समीत कदम यांना वस्त्रोद्योग महामंडळाचे उपाध्यक्ष, वैभव शिंदे यांना औद्योगिक विकास महामंडळाचे सदस्य तर विक्रम पाटील यांना म्हाडाचे उपाध्यक्षपद देण्यात आले होते. भाजप पुन्हा सत्तेत येणार आणि पाच वर्षे हे पद कायम राहणार, अशी सर्वांनाच अपेक्षा होती. ती फोल ठरली आणि हे पदक औटघटकेचे ठरले आहे. 
 

कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेत इच्छुक 

राज्यातील महामंडळाच्या नियुक्‍त्या रद्द झाल्यानंतर आता सत्ताधारी, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादीतील इच्छुकांच्या इच्छा जाग्या होणार आहेत. राज्यात सरकार सुराला लागल्यानंतर त्याची धामधुम होईल. त्याची सुरवात सांगलीतील कॉंग्रेस नेत्यांनी आधीच केली आहे. मदनभाऊ समर्थक नेत्यांनी बाळासाहेब थोरात आणि जयंत पाटील यांचा भेट घेऊन श्रीमती जयश्री पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवावी, त्यांना ताकद द्यावी, अशी मागणी केली आहे. अन्य पक्षांत लवकरच हे वारे वाहू लागेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM Cancels MP Sanjaykaka Patil Corporation Appointments