पुरग्रस्तांनो घाबरु नका, शासन तुमच्या पाठीशी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

कबनूर - "चंदूर गावावर महापूराचे मोठे संकट आले आहे. पण, पुरग्रस्तांनो घाबरु नका, शासन त्याचबरोबर सेवाभावी संस्था, संघटना तुमच्या पाठीशी आहेत. पुरग्रस्तांचे पुनर्वसन करण्यास शासन वचनबध्द आहे." असा विश्वास सहकार, पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी पुरग्रस्तांना दिला.

कबनूर - "चंदूर गावावर महापूराचे मोठे संकट आले आहे. पण, पुरग्रस्तांनो घाबरु नका, शासन त्याचबरोबर सेवाभावी संस्था, संघटना तुमच्या पाठीशी आहेत. पुरग्रस्तांचे पुनर्वसन करण्यास शासन वचनबध्द आहे." असा विश्वास सहकार, पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी पुरग्रस्तांना दिला. 

चंदूर (ता. हातकणंगले) येथील पुरग्रस्तांची मंत्री देशमुख यांनी भेट घेतली.  चंदूर येथील अरुण सेवा सोसायटीच्या सभागृहात पुरग्रस्तांच्या मदतीसंदर्भात आढावा बैठकीत ते मार्गदर्शन करीत होते.आमदार सुरेशराव हाळवणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.   
"पुरग्रस्तांना खऱ्या अर्थाने मदत पोहचवण्यासाठी नुकसानीचे पंचनामे करणाऱ्या अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत." असे सांगून मंत्री देशमुख म्हणाले,"महापूराच्या संकटाने घरे, उद्योग, शेती यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पण या संकटावर आपण मात करुया. "

आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले, "पुरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी शासनाकडून मदत आणण्यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करेन."  

चंदूरचे सरपंच माणिक पाटील यांनी स्वागत केले. नागेश पुजारी यांनी प्रास्ताविक केले.  प्रांताधिकारी समिर शिंगटे, श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे संचालक रघुनाथ पाटील, पंचायत समिती सदस्य महेश पाटील, सोलापूर सोशल फौंडेशनचे शीतल शहाणे उपस्थित होते. रघुनाथ पाटील यांनी आभार मानले.

प्रारंभी मंत्री देशमुख यांनी मागासवर्गीय वस्तीस भेट देऊन महापुराच्या संकटाने नुकसान झालेल्या घरांची पाहणी केली. पुरग्रस्तांशी संवाद साधला. त्यानंतर इचलकरंजी दिंगबर जैन समाजाच्यावतीने चंदूरमधील जैन बस्तीत आयोजित शंभर पुरग्रस्त कुटुंबांना प्रापंचिक साहित्याचे मंत्री देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मालेगाव को - अॉप मर्चंट बँकेच्यावतीने झालेल्या मेडिकल कँम्पमधील पुरग्रस्तांना औषधांचे वाटप मंत्री देशमुख यांच्या हस्ते झाले.

सोलापूर सोशल फाैंडेशनतर्फे चंदूर गाव दत्तक

चंदूर हे गाव पुनर्वसनासाठी सोलापूर सोशल फौंडेशनतर्फे दत्तक घेण्यात आले असल्याचे मंत्री देशमुख यांनी जाहिर केले. तसेच चंदूरमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी इचलकरंजीमधील मर्दा फौंडेशनने एकसष्ठ लाख रुपये मदत म्हणून देणार असल्याचे मर्दा फौंडेशनचे शामसुंदर मर्दा यांनी सांगितले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Co-operation, Relief and Rehabilitation Minister Subhash Deshmukh visit Chandur Village