काँग्रेसने शेतकऱ्यांना 71 वर्षे वाऱ्यावर सोडले : मंत्री सुभाष देशमुख 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

स्वातंत्र्य मिळाल्यापासून गेली ७१ वर्षे काँग्रेसने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. अशी खरमरीत टिका पालकमंत्री तथा सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी केली.

विटा : शेतमालाला आधारभूत किंमत मिळावी, शेतकऱ्यांना मुबलक पाणी, वीज, खते, बियाणे मिळावे, यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे. मात्र स्वातंत्र्य मिळाल्यापासून गेली ७१ वर्षे काँग्रेसने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. अशी खरमरीत टिका पालकमंत्री तथा सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी केली. माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी वेळ न दवडता भाजपमध्ये प्रवेश करावा असे जाहीर आवाहन त्यांनी केले. विटा शहराच्या सुधारित पाणी पुरवठा योजनेचे भूमीपूजन मंत्री देशमुख यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. 

मंत्री देशमुख म्हणाले, मोदी सरकार शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून काम करत आहे. ठराविक गटाला कर्ज देण्याची काँग्रेसची दृष्टनिती आहे. उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची भूमिका मोदी सरकारने घेतली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सरकार आग्रही असल्याचा विश्वास लोकांना असल्याचे सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या निवडणूकीत सिध्द झाले आहे. विट्याचे वैभव वाढविण्यासाठी विटा पालिका काँग्रेसमुक्त करुया. 

तुमच्यामुळे टेंभुला गती मिळतेय, तुमचे प्रयत्न आहेत. आम्ही जाहीर मान्य करतो. पण माझ्यामुळेच काम होते असा आभास निर्माण करु नका असा टोला खासदार संजय पाटील यांनी आमदार अनिल बाबर यांचे नांव न घेता लगावत चौदा महिन्यात शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत टेंभूचे पाणी गेलेले दिसेल असे सांगितले. 

माजी नगराध्यक्ष वैभव पाटील म्हणाले, पाणी योजना सुरु झाल्यानंतर एक दिवसाआड मुबलक पाणी मिळेल. विकासकामांना सर्वाधिक निधी खासदारांनी दिला. अमरसिंह देशमुख, अशोक गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व स्वागत किरण तारळेकर यांनी केले. यावेळी नगराध्यक्षा प्रतिभा पाटील, उपनगराध्यक्षा प्रतिभा चोथे, सुहास शिंदे, सुशांत देवकर, अनिल म. बाबर, प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, तहसीलदार रंजना उबरहंडे, मुख्याधिकारी महेश रोकडे, जिल्हा माहिती अधिकारी संपदा बीडकर यांच्यासह नगरसेवक, अधिकारी, पदाधिकारी व नागरीक उपस्थित होते. 

आधी तिकिट द्या -
मंत्री देशमुख यांनी व्यासपीठावरून माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी भाजपामध्ये यावे, असे वाटते का असा प्रश्न कार्यकर्त्यांना केला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी आधी तिकिट द्या अशी मागणी केली. त्यावर मंत्री देशमुख यांनी कोणते रेल्वे, विमान, एसटी चे असे म्हणत कार्यकर्त्यांना उत्तर देणे टाळले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: co operative minister subhash deshmukh criticized congress for farmer issue