घाटमाथा - कोकणातील पर्यटन वाढीसाठी सामूहिक प्रयत्नाची गरज

घाटमाथा - कोकणातील पर्यटन वाढीसाठी सामूहिक प्रयत्नाची गरज

कोल्हापूर - ‘घाटमाथा सुंदर, कोकण त्याहून सुंदर...’ असे आपणच किती पिढ्या म्हणत बसायचं? हा या परिस्थितीला पर्यटन व्यावसायिकांपुढील प्रश्‍न आहे. कारण गोव्याकडे पर्यटकांचा लोंढा आणि निसर्गसौंदर्याचे प्रतीक असलेल्या घाटमाथा आणि कोकणात जेमतेम पर्यटक अशा विसंगतीमुळे पर्यटनाला दिशाच मिळेनाशी झाली आहे. पर्यटन व्यावसायिक त्यांच्या परीने पर्यटकांना खेचून घेत आहेत; पण सामूहिक प्रयत्न झाले नाहीत तर घाटमाथा व कोकणाचे पर्यटन एका चौकटीत राहणार आहे. 

जिथे काहीही नाही; पण आभास निर्माण करणारी जाहिरातबाजी आहे, तेथे पर्यटकांची गर्दी वाढती आहे. त्यामुळे वेळेचे नुकसान, आर्थिक नुकसान आणि पर्यटनाचा आनंद नाही, अशी परिस्थिती आहे; पण उदाहरणच द्यायचे झाले तर कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा, पन्हाळा, विशाळगड, आंबा, फोंडा, दाजीपूर, पारगड, अणुस्कुरा ही अशी ठिकाणे आहेत की तिथले निसर्ग सौंदर्य बारमही आहे. जोडीला घनदाट जंगलं आहेत. वळणावळणाचे घाट आहेत. विस्तीर्ण जलाशय आहेत. वन्यप्राण्यांची रेलचेल आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे साक्षीदार असलेले गडकिल्ले आहेत; पण तुलनेने पर्यटक आणि पर्यटनापासून होणारी आर्थिक उलाढाल कमी आहे. 

उन्हाळ्यात थंडगार वारा, हिवाळ्यात धुके आणि बोचरी थंडी व पावसाळ्यात अंगावर पावसासोबत ढग असला तीन ऋतूतला वेगळा अनुभव घ्यायची संधी कोल्हापूर जिल्ह्यात आहे. गगनबावडा, चंदगड, पन्हाळा, राधानगरी, आजरा, शाहूवाडी हे सहा जिल्हे म्हणजे अशा निसर्ग सौंदर्याची खाण आहेत. पण त्याची दुर्गम अशी ओळख रुढ झाली आहे. या जिल्ह्यात बदली झाली तर तिकडे नोकरी नको असे म्हणणारे अनेक शासकीय कर्मचारी आहेत. मग अन्य जिल्ह्यातील, अन्य राज्यातील पर्यटकांसमोर कोल्हापूर जिल्ह्यांचे पर्यटन चित्र किती विचित्र असेल? आजही राज्यातील अन्य पर्यटनस्थळांच्या तुलनेने कोल्हापूर जिल्ह्यात जेवण, राहण्याची व्यवस्था स्वस्त आहे. सुरक्षितता आहे. पण त्याचे मार्केटिंग करण्यात आपण कमी पडत आहेत, ही वस्तुस्थिती आहे.

जिल्ह्याची एवढी नैसर्गिक संपदा पाहून महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाने काही वर्षांपूर्वी येथे विभागीय कार्यालय सुरू केले होते. पण सध्या ते पूर्ण बंद आहे. त्यामुळे कोल्हापूरचा पर्यटनाची कर्णोपकर्णी जेवढी माहिती बाहेर जाते, त्यावरच इथले पर्यटन चालू आहे. 

केरळ, गोवा जगाच्या नकाशावर
कोकणचीही साधारण अशीच स्थिती आहे. केरळ, गोव्याइतकाच कोकण समृद्ध आहे. पण पर्यटकांचा ओघ केरळ, गोव्याकडेच आहे. याला कारण मार्केटिंग आहे. केरळ, गोव्याला तिथल्या सरकारने जगाच्या नकाशावर नेले. कोल्हापूर मात्र जिल्ह्याच्या नकाशावर राहिले आहे. तेही जगाच्या पर्यटन नकाशावर गेले तरच पर्यटकांची पावले इकडे वळणार आहेत. नाही तर घाटमाथा सुंदर, कोकण त्याहून सुंदर, हे वर्षानुवर्षे आपणच म्हणत बसायची वेळ आपल्यावर आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com