सोलापूरच्या "एमआयडीसी'त व्यावसायिक दरानेच पाणीपुरवठा

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

औद्योगिक वसाहतीमध्ये (एमआयडीसी) बांधलेल्या निवासाला व्यावसायिक दरानेच (बिगर घरगुती) पाणीपुरवठा करणे योग्य असल्याचा अभिप्राय देत, घरगुती दराची मागणी आयुक्तांनी फेटाळून लावली आहे. 

सोलापूर- औद्योगिक वसाहतीमध्ये (एमआयडीसी) बांधलेल्या निवासाला व्यावसायिक दरानेच (बिगर घरगुती) पाणीपुरवठा करणे योग्य असल्याचा अभिप्राय देत, घरगुती दराची मागणी आयुक्तांनी फेटाळून लावली आहे. 

अक्कलकोट रस्ता औद्योगिक वसाहतीमध्ये देविदास जक्कन यांची मिळकत आहे. या मिळकतीवर 2001 पासून व्यावसायिक दराने पाणीपट्टी आकारली जात आहे. त्याऐवजी घरगुती दराने पाणीपट्टी घ्यावी, असा अर्ज जक्कन यांनी महापालिकेकडे केला होता. 2003 पासून पत्रव्यवहार करूनही प्रशासनाने काहीच कार्यवाही केली नाही. मागणीपत्रासोबत जोडलेली कागदपत्रे पाहता, संबंधित मिळकतदारांकडून घरगुती दरानेच पाणीपट्टी घेणे योग्य होईल, असा ठराव 7 एप्रिल 2018 रोजी महापालिका सभेत झाला होता. 

औद्योगिक वसाहतीमधील जागा ही केवळ व्यवसायासाठी असतानाही काहीजण व्यवसायाबरोबरच राहण्यासाठी जागेचा वापर करीत आहेत. अशा मिळकतदारांना पहिला नळ बिगर घरगुती दराने आणि मिळकतदार त्या ठिकाणी रहात असेल त्याने दुसरा नळ मागितल्यास तो घरगुती दराने देण्यात आला आहे. त्याची कल्पना वेळोवेळी जक्कन यांना देण्यात आली आहे. त्यानुसार त्यांनी आजतागायत मिळकत करासह खासगी नळाची रक्कम भरली आहे. 

या औद्योगिक वसाहतीमध्ये 730 मिळकती आहेत. जक्कन यांच्या मागणीनुसार कार्यवाही झाल्यास उर्वरीत मिळकतदारही घरगुती दराने पाणीपट्टीची मागणी करतील. त्यामुळे जक्कन यांना बिगर घरगुती दरानेच पाणीपट्टी घेणे उचित होईल, असा अभिप्राय हद्दवाढ विभागाने दिला होता. त्यास मंजुरी देत आयुक्तांनी प्रशासकीय प्रस्ताव मंजूर केला असून, तो माहिस्तव सर्वसाधारण सभेकडे पाठविला आहे. 

तर होऊ शकते अडचण 
एमआयडीसीतील जागा ही व्यवसायासाठीच वापरणे बंधनकारक आहे. मग जक्कन यांना निवासी बांधकाम करण्यास एमआयडीसीच्या प्राधिकृत यंत्रणेने मंजुरी दिली आहे का, याची तपासणी करण्याची सूचना आयुक्तांनी केली आहे. यंत्रणेने निवासी बांधकामास मंजुरी दिली नसेल तर ते मिळकतदाराच्या दृष्टीने अडचणीचे ठरणार आहे.

Web Title: commercial rates Water supply in solapur MIDC