कंत्राटी वीज कामगारांना कमिशनचा "शॉक' 

 Commission shock to contract electricity workers
Commission shock to contract electricity workers

सांगली : वीज वितरण कंपनीतील नियमित कामगारांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या कंत्राटी वीज कामगारांच्या वेतनात दुपटीने वाढ झाल्यामुळे अच्छे दिन आले आहेत. परंतू अनेक कंत्राटी कामगारांच्या वेतनाला दीड ते दोन हजाराची कात्री लावली जात आहे. रोजीरोटीचा प्रश्‍न असल्यामुळे तक्रारीचे धाडस केले जात नाही. 

महावितरण कंपनीकडे गेली 15 वर्षे हजारो कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांची संख्या जवळपास 1200 इतकी आहे. प्रामाणिक सेवेचा विचार करून कधीतरी सेवेत कायमस्वरूपी घेतले जाईल या आशेवर ते काम करत आहेत. काही महिन्यापूर्वी विद्युत सहाय्यक म्हणून भरती प्रक्रिया सुरू झाली होती. तेव्हा अनुभवी कंत्राटी वीज कामगारांना आरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आली. तसेच याबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. 

कंत्राटी कामगारांना ऑक्‍टोबर 2019 पर्यंत मिळणारे वेतन अतिशय कमी होते. आठ ते साडे आठ हजार होते. त्यातही कमिशन म्हणून कामगारांना हजार रूपये द्यावे लागत होते. भविष्य निर्वाह निधी, कामगार विमा, प्रोफेशनल टॅक्‍स वजा जाता जेमतेम साडे पाच हजार रूपये मिळत होते. किमान वेतनात वाढ करण्यात आल्यामुळे ऑक्‍टोबर 2019 पासून कंत्राटी कामगारांच्या वेतनात दुपटीने वाढ झाली आहे. भविष्यनिर्वाह निधी, कामगार विमा कार्यालयासाठी, प्रोफेशनल टॅक्‍स वजा जात शहरी विभागात 15 ते 16 हजार रूपये, ग्रामीण भागात 12 ते 14 हजार रूपये आणि नगरपालिका क्षेत्रात 14 ते 15 हजार रूपये हातात मिळतात. 

कंत्राटी कामगारांच्या वेतनात दुपटीने वाढ झाल्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. परंतू अनेक कामगारांच्या वेतनाला प्रति महिना दीड ते दोन हजार रूपयांची कात्री लावली जात आहे. त्यातून संबंधित मंडळी महिनाकाठी लाखो रूपये बसून कमवत आहेत. रोजीरोटीचा प्रश्‍न आणि सेवेत कायम केले जाणार असल्याच्या आशेमुळे कामगार तक्रार करत नाहीत. त्यामुळे संबंधितांचे चांगलेच फावले आहे. 

सात तारखेला वेतन
कंत्राटी कामगार कायदा 1970 आणि किमान वेतन कायद्यानुसार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराकडून प्रत्येक महिन्याच्या सात तारखेला वेतन व इतर देणी देणे आवश्‍यक आहे. अन्यथा मूळ मालक म्हणून कंपनीने ती रक्कम देऊन कंत्राटदाराच्या देय बिलातून वसुल करावे अशी तरतूद केली आहे. 

तक्रार केली तर बदली

कंत्राटी कामगारांची गेली 15 वर्षे पिळवणूक सुरू आहे. आज ना उद्या न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. कंत्राटी कामगारांना वेळेत वेतन मिळाले पाहिजे. काहींना कमिशनसाठी धमकी दिली जाते. तक्रार केली तर बदली केली जाते. त्यामुळे कामगार अधिकारी यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावे. 
- सुनिल वाघमारे, राज्य संघटक, कंत्राटी वीज कामगार युनियन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com