धार्मिक द्वेष हेच मोठे आव्हान  - प्रा. डॉ. राम पुनियानी

धार्मिक द्वेष हेच मोठे आव्हान  - प्रा. डॉ. राम पुनियानी

कोल्हापूर - माणुसकीच्या आड येणारी धर्माची भिंत आणि राजकारणासाठी जाणीवपूर्वक पसरवला जाणारा धार्मिक द्वेष हेच लोकशाहीसमोरील सर्वात मोठे आव्हान असल्याचे स्पष्ट मत आज ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. राम पुनियानी यांनी व्यक्त केले. "सकाळ-कोल्हापूर'च्या 38 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज होते. 

दरम्यान, सध्या देशातील वातावारण अनेकांना आणीबाणीसदृश वाटते. मात्र, त्यापेक्षाही ते अधिक  भयंकर आहे. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर बहुविविधतेने नटलेल्या भारतीय समाजातील संवादाचे पूल अधिक घट्ट करणे, हीच काळाची गरज असल्याचेही प्रा. डॉ. पुनियानी यांनी सांगितले. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात हाऊसफुल्ल गर्दीच्या साक्षीने हा सोहळा सजला. 

"लोकशाहीसमोरील आव्हाने' या विषयावर संवाद साधताना डॉ. पुनियानी यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील राजेशाहीपासून ते अगदी अलीकडच्या "लगान' चित्रपटातील गीतांपर्यंतचे विविध दाखले दिले. भारताची सहिष्णू परंपरा, संविधानातील समतेच्या तत्त्वांचा जागर याबाबतची अगदी साधी व सोपी उदाहरणे सांगत त्यांनी 77 मिनिटांचा हा संवाद खुलवला आणि भारतीय लोकशाहीतील विविध प्रवाह व आव्हानांचा वेध घेतला. 

प्रा. डॉ. पुनियानी म्हणाले, ""गायीचा मुद्दा हा धर्माचा आहे की धर्माच्या नावावर चालणारा राजकीय मुद्दा आहे, हे समजून घेण्याची गरज आहे. गायीची सेवा हा धर्म आहे. पण गायीच्या नावावर दुसऱ्यांना मारहाण करणे हे राजकारण आहे. हे धर्माचे राजकारण समजून घेण्याची गरज आहे. आपल्या देशात पहिल्यापासून धार्मिक मूल्यांचं महत्त्व वरचढ राहिलं आहे. त्यामुळेच धर्माच्या मुद्द्याचा वापर राजकारणासाठी होत आहे. त्यातून माणूस मारला जात आहे. पण ही लोकशाहीची परंपरा नाही.''

ते म्हणाले, ""पंतप्रधान टीका करतात की, देश 1200 वर्षांपासून गुलाम आहे. त्यांचा संदर्भ मुस्लिम राजेशाहीबाबत असतो. मुस्लिम राजे बाहेरून आले. संपत्ती लुटली. पण इथली संपत्ती बाहेर नेली नाही. ते इथेच जगले आणि इथल्याच मातीत मरूनही गेले. पण मुस्लिम राजेशाहीचा प्रतीकात्मक वापर करून आजचे राज्यकर्ते त्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत.''

1992 मध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतर धार्मिक विद्वेषाची बीजे अधिक तीव्रतेने रुजत गेली. "बाबर की औलाद' हा शब्द विशिष्ट समुदायासाठी वापरला जाऊ लागला. राजेशाहीचा आधार धर्म नव्हता. राणा प्रतापच्या सैन्यात मुस्लिम सेनापती, तर अकबर स्वतः लढाईत नाही. त्याच्या सेनेचे नेतृत्व हिंदू सेनापती राजा मानसिंगने केले. ही धर्मासाठीची हिंदू विरुद्ध मुस्लीम लढाई नसून दोन राजांमधली सत्तेसाठीची लढाई आहे. इतिहासात राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांसारखे लोककल्याणकारी राजेही होऊन गेले. पण लोकांच्या मनात अनेक राजांविषयी विष पेरले गेले आहे, असेही ते म्हणाले.

ते म्हणाले, ""अकबराच्या दरबारातील नवरत्नांमध्ये हिंदू राजे होते. औरंगजेबची प्रतिमा सर्वात वाईट आणि हिंदूविरोधी राजा अशी केली गेली आहे. पाकिस्तानात मात्र औरंगजेबला चांगले मानले जाते. औरंगजेबचा भाऊ दारा शुकोह याच्याशी सत्तासंघर्ष झाला. सम्राट अशोकनेही त्याच्या भावांना ठार मारले. अलीकडच्या काळात नेपाळमध्येही असे घडले. दिल्लीच्या नॅशनल म्युझियममध्ये "बाबर की वसीहत' आहे. त्यात बाबरने त्याचा मुलगा हुमायूनला प्रजेच्या भावनेचा आदर करण्याबाबत लिहिले आहे. कारण इथली बहुसंख्य प्रजा हिंदू आहे. आज मात्र रस्त्यांची नावे बदलण्याचे प्रकार होतात.'' 

सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार म्हणाले, ""समाजातील सर्वच घटकांच्या विकासासाठी "सकाळ'ने आजवर पुढाकार घेतला. सरपंच परिषदेत सहभागी होणारा सरपंच आपल्या गावात जाऊन "तनिष्का'च्या सहाशे महिलांना एकत्रित करतो. त्यांच्या माध्यमातून गावात दोन तलाव बांधतो आणि पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न मिटतो. हाच सरंपच मुलींसाठी शाळा काढतो आणि पुढे जाऊन ई-एज्युकेशन संकल्पना यशस्वी करतो, असे अनुभव नक्कीच नव्याने पुढे जाण्याची प्रेरणा देतात. गणेशोत्सव, दिवाळीच्या काळात पुण्यासारख्या शहरात महिला एकत्रित येऊन एलईडी माळा तयार करतात आणि अशा माळांची साडेचार कोटी रुपयांची विक्री होते. ही काही प्रातिनिधिक उदाहरणं असली तरी लोकांच्या सहभागातूनच "सकाळ' विविध संकल्पना पुढे आणतो आहे आणि त्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडू लागले आहेत.'' 

सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार यांनी सकाळ माध्यम समूहाच्या वाटचालीचा आढावा घेतला. ते म्हणाले, ""समाजातील ज्याला आवाज नाही, त्याचा आवाज बनावं. माध्यमांनी वाचकांच्या मनाची मशागत केली पाहिजे,

हे सूत्र घेऊन सकाळ समूहाची वाटचाल सुरू आहे. एकीकडे समाजाचं भलं करण्यासाठी विविध संकल्पना राबवल्या जात असताना "सकाळ' समाजातील वाईट गोष्टी मोडण्यासाठी तितक्‍याच कणखरपणे उभा आहे. बातम्यापलीकडे जाऊन दुर्लभ योजकाची भूमिका बजावताना अनेक संकल्पना यशस्वी झाल्या. त्या "मॉडेल' म्हणून पुढे आल्या आणि लोकाभिमुख ठरल्या. बदलांवर स्वार होत येत्या काळातही "सकाळ'ची वाटचाल तितक्‍याच खमकेपणाने पुढे सुरू राहील.'' 

साहित्य अकादमीचा प्रतिष्ठेचा युवा पुरस्कारप्राप्त नवनाथ गोरे, एक हजारहून अधिक झाडे स्वखर्चाने शहरात लावून ती जतन करणारा प्रतीक बावडेकर, फुटबॉलपटू अंजना तुरंबेकर, रेशीम शेती तज्ज्ञ सल्लागार डॉ. ए. डी. जाधव, वाणिज्य शाखेच्या पदवीधर असूनही अत्याधुनिक फर्निचर मेकर म्हणून लौकिक मिळवलेल्या सरिता लोहार, स्वरतंतूच्या विकारावर जिद्दीने मात करणारे गायक विजय पाठक आणि गरजूंच्या मदतीसाठी स्वखर्चाने पुढाकार घेणारी बैतुलमाल समिती यांचा कार्यक्रमात गौरव झाला. "सकाळ'चे निवासी संपादक डॉ. श्रीरंग गायकवाड यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. जयश्री देसाई यांनी सूत्रसंचालन केले. 

दरम्यान, महापौर शोभा बोंद्रे यांच्या हस्ते "पोलिटिकल करेक्‍ट' या राजकीय व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले. प्रदर्शनात पन्नासहून अधिक व्यंगचित्रकारांच्या व्यंगचित्रांचा समावेश असून शुक्रवार (ता. 3) पर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल. दरम्यान, भारती पवार, सरोज पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. सकाळ माध्यम समूहाचे संचालक भाऊसाहेब पाटील, "पुणे - सकाळ'चे संपादक सम्राट फडणीस, समूहाच्या कार्यकारी संपादक शीतल पवार, "ऍग्रोवन'चे संपादक आदिनाथ चव्हाण, सरव्यवस्थापक (वितरण) सुनील लोंढे, उपसरव्यवस्थापक (जाहिरात) उमेश पिंगळे, उपसरव्यवस्थापक (वितरण) दिनेश शेट्टी, उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर यांनी शुभेच्छा स्वीकारल्या. 
 

डॉ. पुनियानी सांगतात...
- भारतातील लोकशाही कोणत्याही एका धर्मावर आधारलेली नाही. देशाला स्वातंत्र्यलढ्याचा मोठा इतिहास आहे आणि या लढ्यात देशातील बहुविविधतेने नटलेला सारा समाज भारतीय म्हणून अग्रभागी होता.
- राजेशाही कधीच कुठल्या एका धर्माची नव्हती. हिंदू राजांकडे मुस्लिम तर मुस्लिम राजांकडे हिंदू सेनापती होते. त्यांच्या ज्या काही लढाया झाल्या त्या धर्मासाठी नव्हे तर सत्ता आणि संपत्तीसाठी झाल्या. 
- इंग्रजांनी आपल्या सत्तेसाठी जाणीवपूर्वक हिंदू आणि मुस्लिम असा भेदभाव सुरू केला आणि त्यातून धार्मिक तेढ वाढवण्यात ते यशस्वी झाले.
- कबीर, महात्मा गांधी यांचा राम स्वीकारावा लागेल. मात्र धनुष्य हाती घेऊन अल्पसंख्याकांना मोडून काढणारा सध्याचा राम समाजाच्या भल्याचा नाही.
- "वसुधैव कुटुंबकम्‌'च्या नावाखाली देशात संकुचित राजकारण सुरू आहे आणि ते भारतीय लोकशाहीला घातक आहे. 
- दंगली घडत नसतात. त्या घडवल्या जातात.
- स्वातंत्र्य, समता, बंधुता मूल्यांवर आधारित संविधानातूनच लोकशाही अधिक बळकट. "मनुस्मृती'वर आधारित संविधानाचा डाव वेळीच मोडून काढला पाहिजे. 

आजच्या मुसलमानांचा काय दोष?
औरंगजेबने भलेही वाईट कामे केली असतील तर त्यासाठी आजचा मुसलमान जबाबदार आहे का? याचा विचार केला पाहिजे. ज्या लोकांना औरंगजेबची अडचण होते त्यांनी एच. जी. वेल्सच्या कादंबरीत सांगितल्याप्रमाणे टाईम मशिनद्वारे इतिहासाच्या त्या काळात जाऊन औरंगजेबला पकडावे आणि त्याला जी शिक्षा द्यायची आहे ती द्यावी. पण औरंगजेबला आजच्या मुसलमानांशी जोडू नका, असे आवाहनही प्रा. डॉ. पुनियानी यांनी केले. 

इस्लामची स्थापना सातव्या शतकातली
औरंगजेबने मंदिरे तोडल्याची उदाहरणे आहेत तसेच त्याने मंदिरांना दान दिल्याचीही उदाहरणे आहेत. मंदिर तोडणे, लुटणे हे संपत्तीसाठीचे कृत्य होते. पराभूत राजांना अपमानित करण्यासाठी ते केले गेले. हिंदू राजांनीही मंदिरे पाडली आहेत. प्राचीन काळात मंदिरे पाडल्याचे काहीजण सांगतात. पण इस्लामची स्थापना 7 व्या शतकातली आहे. यावरून हा मुद्दा सत्ता आणि संपत्तीचा होता हे स्पष्ट होते. 

पोस्टर्सवरून धार्मिक द्वेष 
राजेशाहीच्या मुद्द्यावरून इतिहासाचा दुरुपयोग केला गेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा काहीजण मुस्लिमविरोधी करतात. पण अफजलखानाला भेटायला जाताना ज्याने शिवाजींना वाघनखे दिली त्याचं नाव होतं रुस्तुमे जमाल. रायगडावर मंदिर आहे. पण तिथे शिवरायांनी मस्जिदही बांधली. मात्र, सध्या भगव्या वेशातील शिवाजी महाराज आणि हिरव्या वेशातील अफजलखान अशी भव्य पोस्टर्स उभारून धार्मिक द्वेष पसरवला जात असल्याचेही प्रा. डॉ. पुनियानी म्हणाले. 

"सकाळ' आणि कार्टुन
सकाळ माध्यम समूहाच्या एकूणच वाटचालीबद्दल प्रा. डॉ. पुनियानी यांनी गौरवोद्‌गार काढले. वर्धापन दिनाच्या निमित्ताने भरवलेल्या व्यंगचित्र प्रदर्शनातील व्यंगचित्रेही चांगली असून वर्ल्डकप जिंकणारा इम्रान खान आणि सध्या त्याच्यावर असलेल्या आर्मीच्या नियंत्रणावर आधारित व्यंगचित्र खूप भावल्याचेही ते म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com