बिदालमध्ये बैलांची तोरण मारण्याची स्पर्धा उत्साहात संपन्न

रुपेश कदम
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

तोरण मारण्याच्या स्पर्धेला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून ग्रामस्थांनी पुढील वर्षाच्या स्पर्धेच्या बक्षिसांच्या रकमेत घसघशीत वाढ केली आहे. पुढील वर्षी प्रथम तीन क्रमांकांसाठी अनुक्रमे रुपये पन्नास हजार, रुपये पंचवीस हजार व रुपये पंधरा हजार अशा बक्षिसांची घोषणा करण्यात आली.
 

दहिवडी : हलगीचा कडकडाट, शौकिनांचा जल्लोष, समालोचकांचे बहारदार समालोचन सोबतीला पावसाची रिमझिम अशा जबरदस्त वातावरणात बिदाल (ता. माण) येथे बैलांची तोरण मारण्याची स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

या अनोख्या स्पर्धेबद्दल उत्सुकता वाटत असल्यामुळे वर्षागणिक या स्पर्धेची प्रसिद्धी वाढत आहे. सलग 38 वर्षे सुरु असलेल्या या स्पर्धेचे आयोजन नागपंचमीच्या दिवशी येथील भैरवनाथ मंदीरात करण्यात येते. बैलांच्या शिंगात सजविलेले टोप बसवण्यात येतात. त्या टोपांना लांब दोर्या लावलेल्या असतात. बैलांना तोरण बांधलेल्या ठिकाणी पळवत आणण्यात येते. यावेळी हलगीचा कडकडाट व शौकिनांकडून जोरदार जल्लोष करण्यात येतो. तोरण बांधलेल्या ठिकाणी बैल आला की तिथे तो उडी मारतो. त्यावेळी टोपाला बांधलेल्या दोरीने तोरणाला स्पर्श केला असता 'तोरण मारले' असे म्हणतात. सुरुवातीला 13 फुट उंचीवर तोरण बांधण्यात येते, त्यानंतर ते 15 फुट व शेवटी 17 फुटावर नेण्यात येते.

यावर्षी माण, खटाव, फलटण, माळशिरस आदी तालुक्यातील 73 बैलांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. दुसर्या फेरीत जाण्यात 18 बैल यशस्वी ठरले होते. तर अंतिम फेरीसाठी फक्त चार बैल पात्र ठरले होते. बाबूराव पिसाळ, शिवाजी जगदाळे, गुलाब वाघ व भिवा टेंबरे यांच्या बैलांनी अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. प्रथम तीन बक्षिसांची रक्कम या चौघांना विभागून देण्यात आली.

युवा नेते शेखर गोरे, पुणेकर मंडळ व बेंदुर कमिटी बिदाल यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांकासाठी रुपये पंधरा हजार, दहा हजार व रुपये सात हजार अशी बक्षिसे दिली होती. शिवाजी जगदाळे यांचेकडून प्रथम तीन क्रमांकासाठी चषक तर उत्तेजनार्थ हजारो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली होती.

धनंजय जगदाळे, सुरेश जगदाळे, किशोर इंगवले व एच. एन. टेलर्स यांचे बहारदार समालोचन यामुळे रंगतदार ठरलेली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बेंदुर समिती, स्वयंसेवक व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The competition of bulls in bidal was exciting