गिरवलेंच्या पत्नीचा तक्रार अर्ज "सीआयडी'कडे वर्ग 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

नगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक कैलास गिरवले यांच्या पोलिस कोठडीतील मृत्यूप्रकरणी त्यांच्या पत्नी निर्मला यांनी दिलेला तक्रार अर्ज कोतवाली पोलिसांनी अखेर "सीआयडी' पाठविला. सीआयडीचे अधिकारी घटनेची शहानिशा करुन कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करतील, असे आश्‍वासन कोतवाली पोलिसांनी दिले. त्यानंतर गिरवले यांचा मृतदेह असलेली रुग्णवाहिका सुपे येथून नगरकडे रवाना झाली. 

गिरवले यांच्या मृत्यूस स्थानिक गुन्हे अन्वेशण शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार, उपनिरीक्षक श्रीधर गुट्टे, कॉन्स्टेबल काळे यांच्यासह सहा ते सात पोलिस अधिकारी व कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप निर्मला गिरवले यांनी तक्रार अर्जात केला आहे. 
दरम्यान, सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशन, पोलिस अधीक्षक कार्यालय येथील सीसी टिव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, त्याची तपासणी सुरु केली असल्याचे समजते. नातेवाईकांनी दिलेल्या तक्रार अर्जानुसार शहानिशा केल्यानंतर गुन्हे दाखल होणार आहेत. गिरवले यांच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी निर्मला गिरवले पोलिस ठाण्यात पोचल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार संग्राम जगताप, मनसेचे नगरसेवक गणेश भोसले अन्य पदाधिकारी नेते कोतवाली पोलिस ठाण्यात पोचले होते. 

आमदार जगताप यांनी गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आग्रही भूमिका घेतली. गिरवले यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल होत नाही, तोवर गिरवले यांच्यावर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय गिरवले यांच्या नातेवाईकांनी घेतला होता. गिरवले यांचे बंधू बाबासाहेब यांनी स्वत: त्या संदर्भात पुण्यातील बंडगार्डन पोलिसांत तक्रार अर्ज दिला होता. त्यासाठी गिरवले यांचा मृतदेह पुण्यातून घेऊन निघालेली रुग्णवाहिका नगर-पुणे रस्त्यावरील सुप्याजवळ एका खासगी हॉटेलसमोर थांबविण्यात आली होती. तेथे गिरवले यांचे नातेवाईक व कार्यकर्त्यांनी चर्चा करुन गिरवले यांच्या पत्नी निर्मला यांना कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी पाठविले होते. निर्मला यांची फिर्याद न घेतल्यास गिरवले यांचा मृतदेह पोलिस अधीक्षक कार्यालयात आणून ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. मात्र, निर्मला यांनी दिलेला तक्रार अर्ज सीआयडीकडे वर्ग करण्यात आल्यानंतर रुग्णवाहिका नगरच्या दिशेने रवाना झाली. 

Web Title: complaint application of girawales wife transfer to CBI