'आधीची तहकूब सभा आधी पूर्ण करा, मगच दुसरी घ्या!' राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची मागणी! | Islampur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Islampur Nagarparishad

'आधीची तहकूब सभा आधी पूर्ण करा, मगच दुसरी घ्या!' राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची मागणी!

इस्लामपूर (जिल्हा सांगली) - पहिली विशेष सभा तहकूब असताना दुसरी विशेष सभा घेता येते का? असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसने 'आमचा विकासकामांना विरोध नाही; मात्र आधीची सभा पूर्ण करून मगच दुसरी कामे हाती घ्यावीत' अशी मागणी केली आहे. आम्ही पिठासन अधिकारी आणि मुख्याधिकारी यांच्याकडे खुलासा मागितला असून तो न मिळाल्याने सभेला गैरहजर राहिलो, असे राष्ट्रवादीने आज जाहीर केले. नगरपालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते संजय कोरे, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व नगरसेवक शहाजी पाटील, सभापती विश्वनाथ डांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडली. नगरपालिकेच्या सभागृहात आज ११ कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांना मंजुरी देण्यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते; मात्र राष्ट्रवादीचा एकही नगरसेवक या सभेला उपस्थित न राहिल्याने गणपूर्तीअभावी सभा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला.

त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, "२० मार्च २०२१ ला अशाच विकासकामांना मंजुरी देण्यासंदर्भात राष्ट्रवादीने वारंवार पाठपुरावा केल्यानंतर नगराध्यक्षांनी विशेष सभेचे आयोजन केले होते. या सभेतलेच विषय अद्याप अपूर्ण आहेत. त्यावर निर्णय झालेला नसताना दुसऱ्या विकासकामांच्या अनुषंगाने आज दुसरी विशेष सभा घेण्यात आली होती. आम्हाला या सभेचे पत्र परवा मिळताच काल आम्ही नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन देऊन खुलासा मागवला आहे. त्याचे उत्तर अद्याप आम्हाला मिळालेले नसताना आम्ही सभेला कसे हजर राहणार? आधीच्या तहकूब झालेल्या सभेमध्ये सुमारे पंधरा कोटी रुपयांच्या विकासकामांचे ८२ विषय होते. त्यावरच अद्याप निर्णय नाही. त्यातील अनेक विषय अडचणीचे आहेत. त्यावर निर्णय होणे आवश्यक होते. तो निर्णय झाला असता तर त्यातून मार्ग निघाला असता.

हेही वाचा: 'पक्या मुळीक गॅंग'वर 'मोक्का' अंतर्गत इस्लामपूर पोलिसांची कारवाई

पुढच्या कामांना सुरुवात करता आली असती. तीच कामे सुरू नाहीत आणि नव्याने कामे हाती घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा निधी महाविकास आघाडी सरकारने दिलेला असल्याने तो आम्हीच आणल्यासारखा आहे. त्यामुळे विकासकामे व्हावीत याला आमचा विरोध नाही. आधीचे प्रलंबित विषय मार्गी लागून मगच नव्या विकासाचे विषय हाती घ्यावेत, अशी आमची भूमिका आहे. विकासकामांना आमचा कसलाही विरोध नाही; मात्र गेले नऊ महिने जे विषय प्रलंबित आहेत त्यावर आधी निर्णय घ्यावा."

पवारांनी नाव जाहीर करावे!

पालिकेत सभा सुरू असताना मला राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी फोन केला होता आणि त्यांच्या मोठ्या नेत्याने या सभेला हजर राहू नका असे सांगितले असल्याचे मत मांडणाऱ्या आनंदराव पवार यांनी त्या नगरसेवकाचे नाव जाहीर करावे, म्हणजे आम्हाला झारीतील शुक्राचार्य कोण आहे हे तरी समजेल, असे आव्हान विश्वनाथ डांगे यांनी यावेळी दिले.

loading image
go to top