टार्गेट पूर्ण करण्यासाठी जबरदस्तीने केली नसबंदी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 डिसेंबर 2016

सोलापूर - दत्त चौकात कामाच्या शोधात थांबलेल्या तरुणाला काम देतो म्हणून नेऊन नसबंदीची शस्त्रक्रिया केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आली. हा प्रकार बुधवारी दुपारच्या सुमारास कोंडी (ता. उत्तर सोलापूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घडला. 

सोलापूर - दत्त चौकात कामाच्या शोधात थांबलेल्या तरुणाला काम देतो म्हणून नेऊन नसबंदीची शस्त्रक्रिया केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आली. हा प्रकार बुधवारी दुपारच्या सुमारास कोंडी (ता. उत्तर सोलापूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घडला. 

लक्ष्मण किसन चौगुले (वय 27, रा. शास्त्रीनगर, लोकसेवा शाळेजवळ, सोलापूर), असे जबरदस्तीने नसबंदी शस्त्रक्रिया केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्रास होऊ लागल्याने त्याला शुक्रवारी दुपारी उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची सिव्हिल हॉस्पिटल पोलिस चौकीत नोंद झाली आहे. 
लक्ष्मण हा बिगारी काम करतो. नेहमीप्रमाणे तो बुधवारी (ता. 30) दुपारी 12च्या सुमारास कामाच्या शोधात दत्त चौकात थांबला होता. दुचाकीवरून आलेल्या व्यक्तीने काम देतो असे सांगून त्याला कोंडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. कामाचे दोन हजार रुपये देतो असे त्याला सांगितले. इंजेक्‍शन देऊन त्याला भूल देण्यात आली. नसबंदीची शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याला सायंकाळच्या सुमारास एक हजार रुपये देऊन सोडून देण्यात आले. घरी आल्यानंतर त्याला त्रास सुरू झाला. लक्ष्मण याने गुरुवारी दुपारच्या सुमारास सामाजिक कार्यकर्ते विनायक विटकर यांची भेट घेऊन स्वत:बाबत घडलेली घटना सांगितली. विटकर यांनी कोंडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन माहिती घेतली. लक्ष्मणवर नसबंदीची शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे सांगण्यात आले. याबाबत शुक्रवारी सकाळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांची भेट घेऊन तक्रार करण्यात आली. त्यानंतर लक्ष्मणला दुपारी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

लक्ष्मणचे लग्न झाले असून त्याला दोन मुले आहेत. त्याच्यावर जबरदस्तीने नसबंदीची शस्त्रक्रिया केल्याने पोलिसात तक्रार देणार असल्याचे श्री. विटकर यांनी सांगितले. 

लक्ष्मण चौगुले यांच्यावर जबरदस्तीने शस्त्रक्रिया झाली नाही. त्याच्या संमतीनेच शस्त्रक्रिया केली आहे. कुटुंबीयांनी रागावल्याने तो घाबरला असावा. नसबंदीची शस्त्रक्रिया रद्द करावी, अशी त्यांची मागणी आहे. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. 
- डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी 

लक्ष्मण चौगुले हा अशिक्षित आहे. भोळेपणाचा फायदा घेऊन त्याच्यावर जबरदस्तीने नसबंदीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. नसबंदीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी हा प्रकार झाला आहे. याबाबत आम्ही पोलिसात तक्रार देणार आहोत. 
- विनायक विटकर, सामाजिक कार्यकर्ते 

काम देतो म्हणून मला दुचाकीवरून कोंडी येथे नेले. शस्त्रक्रियेनंतर एक हजार रुपये दिले. मला त्रास होत असल्याने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल झालो आहे. - लक्ष्मण चौगुले, पीडित

Web Title: To complete the target forced sterilization done