हायवेवर करणार हेल्मेटची सक्ती - नांगरे-पाटील

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 एप्रिल 2017

कोल्हापूर - वाढत्या रस्ते अपघातांचा विचार करून पहिल्या टप्प्यात हायवेवर ‘हेल्मेट सक्ती’ केली जाणार आहे. त्याची अंमलबजावणी लवकरच केली जाईल. दुसऱ्या टप्प्यात शहरात केली जाणारी हेल्मेट सक्तीही पोलिसांपासून सुरू केली जाईल, असे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. पोलिस अधीक्षक कार्यालयात ध्वजस्तंभाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

कोल्हापूर - वाढत्या रस्ते अपघातांचा विचार करून पहिल्या टप्प्यात हायवेवर ‘हेल्मेट सक्ती’ केली जाणार आहे. त्याची अंमलबजावणी लवकरच केली जाईल. दुसऱ्या टप्प्यात शहरात केली जाणारी हेल्मेट सक्तीही पोलिसांपासून सुरू केली जाईल, असे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. पोलिस अधीक्षक कार्यालयात ध्वजस्तंभाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

नांगरे-पाटील म्हणाले, ‘‘कोल्हापूर परिक्षेत्रात महिला संरक्षणाबरोबर वाहतूक शिस्तीला पोलिस प्रशासनाने अग्रक्रम दिला आहे. वाहतुकीला शिस्त, नियमांचे उल्लंघन, अल्पवयीन मुलांच्या हातात वाहने देण्याचे प्रमाण, ड्रंक ॲन्ड ड्राईव्ह, अशा विविध कारणाने रस्ते अपघातात मोठी वाढ झाली आहे.

याबाबत पोलिस प्रशासनाने यापूर्वी प्रबोधनात्मक उपक्रम राबवले आहेत. सध्या वाहतुकीसंदर्भात अभियांत्रिकी विद्यार्थ्यांकडून शहराचे दोनदा सर्वेक्षण झाले आहे. सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोमचीही त्यासाठी मदत घेतली गेली. वाहनचालकांचे प्रबोधन करूनही त्यांच्यात सुधारणा होत नाही.

त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरवात झाली आहे. त्यासाठी ट्रॅफिक ड्राईव्ह घेतला जात आहे. परिक्षेत्रात घेतलेल्या ट्रॅफिक ड्राईव्हमधून आतापर्यंत ५० हजार ३७९ जणांवर कारवाई करून १० लाखांहून अधिकचा दंड वसूल केला आहे. 

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने गतवर्षी पाच जिल्ह्यांत २८३० व्यक्तींना रस्ते अपघातात प्राण गमवावे लागले. दोन महिन्यांत त्याचे प्रमाण अवघ्या दोन अंकी संख्येवर आहे. अपघातांचा विचार करून वाहनचालकाने हेल्मेट वापरणे गरजेचे आहे, मात्र त्याचा वापर अवघे मोजकेच वाहनचालक  करतात. वाहनांच्या वेगांचा विचार करून पहिल्या टप्प्यात हायवेवर ‘हेल्मेट सक्ती’ केली जाणार आहे. त्याबाबतची अंमलबजावणी लकरच केली जाईल. त्यासाठी प्रत्येक हायवेवर पोलिसांचे एक पथकही तैनात केले जाईल. त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यात शहर व ग्रामीण भागातही हेल्मेटची सक्ती केली जाईल, मात्र त्याची सुरवात पोलिसांपासूनच केली जाईल.

सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करणार...
ड्रंक ॲन्ड ड्राइव्ह, चालक नशेत अशा अनेक कारणांनी अपघात होतात. त्यातील जखमी अगर मृताच्या कुटुंबाला त्याची झळ बसते. प्रत्येकाचे जीवन महत्त्वाचे आहे. रस्ते अपघातात एकाद्याच्या चुकीमुळे दुसऱ्याचा मृत्यू होतो, अशा संबंधित घटकावर मनुष्यवधासारख्या कलमाखाली कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी अपघातातील जखमी, मृतासह त्या ठिकाणच्या प्रत्येक घटकांच्या रक्ताचे आणि लघवीचे नमुने घेतले जाणार आहेत. वैद्यकीय अहवालानुसार मद्यप्राशन अगर अमली पदार्थ सेवन करून एखाद्याच्या मृत्यूस जबाबदार ठरणाऱ्या चालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्याची अंमलबजावणी सध्या परिक्षेत्रात सुरू असल्याचे नांगरे-पाटील यांनी सांगितले. अशा प्रकारचे आतापर्यंत १२ गुन्हे दाखल झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: compulsory helmet on highway